एक बामण ढसाळलेला - ज्येष्ठ कवी मुकुंद शिंत्रे यांचा एक बामण ढसाळलेला हा कवितासंग्रह [Ek Baman Dhasalalela - Kavita Sangrah, Mukund Shintre].

ज्येष्ठ कवी मुकुंद शिंत्रे यांचा एक बामण ढसाळलेला हा कवितासंग्रह
एक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह (मुकुंद शिंत्रे)
कवितेसंबंधी कवीनं बोलणं म्हणजे घटपटात गुंतलेल्या पंडीत समीक्षकांसमोर लाजवंतीनं ओठंगुन उभं राहण्याचाच प्रकार नव्हे काय? तरीही स्वस्थ बसवेना म्हणून सांगतोय! (Ek Baman Dhasalalela - Kavita Sangrah, Mukund Shintre)
‘एक बामण ढसाळलेला’ या शिर्षकावरून नामदेव ढसाळांच अनुकरण किंवा प्रभाव असली बेगडी भुल कोणा समीक्षकानं माझ्या कवितेवर केली तर ते केवळ अन्यायीच नव्हे तर दोषास्पद ठरेल कारण ‘ढसाळ’ नावाच्या कवीचा अंशात्मक ऋणबोजा उचलूनही मी माझी कविता स्वतंत्र आणि केवळ माझीच मानतो. आत्ता आत्ता माहित पडलेल्या ‘नाम्या मठात’ मी कधी भजनालाही गेलो नाही आणि ढसाळ पंचाशी चुंबाचुंबी करण्याचा सोसही बाळगला नाही. ‘संताप’ हा भाव मला समर्थ शब्दातून व्यक्त करायचा होता परंतु संतापाची तिरपागडी झूल मला कवीतेला डकवायची नव्हती. ‘संताप’ या शब्दाबरोबर येणार ‘सात्वीक’ हे फुटकळ बिरुद लागोलग त्याच्या मागे लागायच अर्थात मी या शब्दाला हद्दपार करण्याचा माझ्या नकळत प्रयत्न केला तरी तो आलाच. ‘संताप’ व्यक्तविण्यासाठी ‘ढसाळ-ढसाळलेला’ हे शब्द समर्थ वाटले.
‘मुंडा’ म्हणजे ओरीसातील जास्पुररोडनजीक आणि कटकच्या आसपासच्या प्रदेशात वावरणारी अर्धनग्न, कंगाल जमात आपल्याइथले दलितही त्यांच्यासमोर सावकार ठरतील एवढी दरिद्रता दशांगुळे व्यापुन राहिल्यासारखी ते उरीपोटी खेळवतात. तिथे माझं बालपण गेलं आणि नकळत माझ्यातही भिनलं. मग ते कवितेतून व्यक्त न झालं तर नवलच! जन्म पुण्याचा, नाव कानडी मानाप्पा, त्याचं लाडीक रुप मानु आणि बालपण ओरीसातलं, हे सगळं वडिलांच्या सततच्या बदलीमुळे!
बालपणाच्या मुशाफिरीमुळे मी माझ्या मराठी आईला ‘आम्मा’ हे कानडी संबोधन लावतो. ‘आई’ पेक्षा तेच जवळचं वाटतं. तिनेच सगळं बालपण भळाभळा पुढ्यात ओतलं. त्यातला ‘परबाळ - पोकळ भाताचा’ संदर्भ हृदय आतून हलवण्यासारखा जीवघेणा!
‘परबाळ भात’ म्हणजे रात्रीचा उकडून ठेवलेला भात, त्यातलं पाणी सकाळी पिणं आणि तो दुपारी खाणं. ‘पोकळ भात’ म्हणजे त्यात पुन्हा पाणी टाकून शिजवणं संध्याकाळी पुन्हा तोच प्रकार, रात्री खातात तोच हा भात! चवीला मिरचीचा तुकडा असला तर आभाळभर येळकोट करुन स्वर्ग मिळाल्याचा आनंद मोहाच्या दारुत ओथंबून, ढोलकीच्या तालावर बेभान होऊन नाचणं हा त्यांचा दरिद्री पुनवेचा उत्सव! त्यांच्याच लयीच्या तोलात भिजलेली माझी दुधभाताची अस्मिता, त्यांची वेदना (की माझी?) शब्दांकित करते. तेव्हा ऋण चुकतं केल्याचं फसवं समाधान देऊन जाते. प्रबोधनाची रुळलेली पाऊलवाट तुडवतांना आलेल्या अनुभवांचे संमेलन म्हणजे कविता नव्हे हे मी जाणतो. परंतु हृदय भेलकांडविणारे अनुभव शब्दांना सारुन कवितेत उतरले. त्यांना माझा नकार लटका पडला म्हणूनच त्यांच्या कविता झाल्या एवढे मात्र नमूद करतो.
सुशिक्षित हिंदू मनाचा परंपरागत अस्पृश्य द्वेष अजूनही शाबूत आहे. किंबहुना तो घाणेरडं रुप धारण करतोय हे पाहून स्वतःलाच काळवंडल्यासारखे होते. त्यातुनच ‘बी. डी’ची संकल्पना फेसाळत बाहेर निघते. मग आगरकर आणि सावरकरांची वेदना माझीही होते. अपमान आणि निंदा या भोवऱ्यात अटकलेल्या मला, कविता ही ‘उताऱ्यासारखी’ बाटली यात मी समाधानी आहे.
मुंबईला झालेल्या ‘युवक बिरादरी ८६’च्या राज्यस्तरावरच्या काव्यस्पर्धेत संग्रहातील ‘मी चित्तपावन’ ही कविता पहिली आली आणि चेव आला. मित्रांच्या वेगवेगळ्या कंपूत माझ्या कविता मी सादर केल्या आणि त्यांनी उत्कटपणे (हाय! कलीजा खलास झाला. अशी लटकी नव्हे) दाद देऊन संग्रह प्रसिद्ध करण्याचा लकडा लावला. एवढेच नव्हे तर हार्दिक आणि आर्थिक धक्का देऊन हा प्रसिद्ध करण्यास उद्युक्तही केले. त्यांचे ऋण मी मोकळ्या मनाने स्विकारतो. त्यांनी नामोल्लेखाची अट घातली नाही तरी ती करणे कर्तव्य समजतो.
घोटीची कला-क्रीडा क्षेत्रातली ‘आझाद हिंद मंडळ’ ही संस्था सर्वश्री रामनाथ शिंदे, इंदरचंद सुराणा, भवरीलाल मोदी, नंदकुमार खंदारे, अशोक कुमठ, श्रीकांत सोनवणे, आनंद दळवी, आमदार शिवराम झोले या मित्रांनी सहकार्य केले म्हणूनच या कविता आपल्या हाती देता येतात. श्री. मुरलीधर ढाके व सौ. पुष्पावहिनी यांनी दिवसरात्र मेहनत करुन, आपलेचे काम समजून छपाईचे काम जल्दीने आटोपले अर्थात त्यांचा निर्देश करणे अगत्याचे आहे. प्रकाशक श्री. सुरेश गोठी यांनीही माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे सौजन्य दाखविले त्यांचाही मी आभारी आहे. चित्रकार श्री. सुदाम वाघमारे यांचे आभार मानले तर त्याला खचितच रुचणार नाही म्हणून थांबतो.
- मानु शिंत्रे
दिनांक ५ मे १९८७
इराणी चाळ, श्रीरामवाडी
मु. पो. घोटी, जि. नाशिक.
एक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह (मुकुंद शिंत्रे)
- [col]
अभिप्राय