विद्रोहदान - मराठी कविता

विद्रोहदान, मराठी कविता - [Vidrohadan, Marathi Kavita] विद्रोहाची कवचकुंडलं दिली जाताहेत छिनाऊन, माझ्या सोलावल्या पिसाळल्या मनावरून.
विद्रोहदान - मराठी कविता | Vidrohadan - Marathi Kavita

विद्रोहाची कवचकुंडलं दिली जाताहेत छिनाऊन, माझ्या सोलावल्या पिसाळल्या मनावरून

विद्रोहाची कवचकुंडलं दिली जाताहेत छिनाऊन
माझ्या सोलावल्या पिसाळल्या मनावरून
कुठला माईचा लाल हरीश्चंद्र देतोय मान
तंगडीखाऊ विश्वामित्राला माझं विद्रोह्यदान
कुणाची कोशीस सोलतेय मला
करुणेचं अंथरुण पांघरुन
कोण कुठला अनाम आत्मा
पोखरतोय मला भुसभुशीत करुन
बुद्धकौशिकाला पडलेलं आध्यात्मिक स्वप्न - रामरक्षा
की बुद्धाची करुणा ढकलतेय मला कवितांच्या ओळीओळीतून
तुमची करुणा भाकून नाही म्हणांयच मला
‘पराधिन आहे जगती’
वेदनेची एक लाळीव इच्छा फुटतेय माझ्या नसानसातून
झोपडीतल्या वखवखलेल्या भाकरी कोल्ड्यासची
हुंदकतोय माझा गिळला जाणारा घास
टाळूला चिकटून जातेय शिसारी
पेट और पेटके निचेका, म्हणणाऱ्यांची
वेदनेला लडबडलेली काळी फुलं कोण खुडतंय
मला जास्वंदी ओठांचं आमिष दावून
जास्वंदी पायाखाली चिरडली तरी ना हरकत!
ही काळी फुलं कवीतांच्या झुबक्यात फेकायचीत
तारुण्याच्या धुक्यात माझी वाट नाही हरवायची
मोहोरबंद लिफाफ्यात मला कविता नाही झोकायची
प्रतिभा माझी पैशाच्या पासली नाही पाडायची
ही मनगट चावून-चावून झिजवलीत
नी भागवलीत तुमची धार्मिक देणी!
आता तरी एकदा ‘राम’ म्हणाना
स्वतःला शरमाऊन तिरडीवर झोपून!
बापजादी आत्मे भुंकू देत लूत भरल्या कुतरड्यागत
ऐकू नका त्यांचं तुम्ही वेदोक्त भुंकणं,
पण हा विद्रोह कोण गाढवाच्या पाठुंगळी बांधला जातोय
कुठल्या ‘कॅथर्सिस’च्या प्रपातात बुचकाळला जातोय
वेदनेची ही खोल जखम मागे ठेऊन
कोण पळवतोय माझा भरती विद्रोह
करुणेच्या अंबराला लगावलेली ही लफ्फेदार फुले नकोएत मला
माझा माझा विद्रोह वापीस द्या मला!
कोण हरी खाटल्यावर बसून गातोय अभंग
अठ्ठावीस युगवाल्या विठ्ठलाला आळवून
कोणत्या भटबेण्याला व्हायचंय इथं तुणतुणं लाऊन
छपरी लावणी गाणार रामजोशी
करायचे नाहीत माझे ओठ मला श्रीखंडी
नी गायची नाहीत मला ईश्वराची गाणी
तारुण्यी इच्छांचा सुकाळ कोसळला होता माझ्यावर
झोपडीतल्या पटकुरी दारिद्र्यात गुंडाळून त्यांना मी
केव्हाच मूठमाती दिलीए!
विद्रोहाचं दान बळजोरी घेणाऱ्या कलंकी
ही वेदनाही एकदाची गोठवून टाक
क्लांतता माझी झडवून टाक
नी कर मला बुद्धाच्या शून्यागत निःशब्द निचेष्ट!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.