माझा जन्मदिन - मराठी कविता

माझा जन्मदिन, मराठी कविता - [Majha Janmadin, Marathi Kavita] क्रांतीदिनापूर्वीचा ‘ढसाळी दिन’ माझा जन्मदिन, दि. ३० एप्रिल १९६२, मु. पो. पुणे.
माझा जन्मदिन - मराठी कविता | Majha Janmadin - Marathi Kavita

क्रांतीदिनापूर्वीचा ‘ढसाळी दिन’ माझा जन्मदिन, दि. ३० एप्रिल १९६२, मु. पो. पुणे, ससून हॉस्पीटल

क्रांतीदिनापूर्वीचा ‘ढसाळी दिन’ माझा जन्मदिन
दि. ३० एप्रिल १९६२
मु. पो. पुणे, ससून हॉस्पीटल
जनरल वार्ड, वेळ ३ वाजून ५४ मिनिटे
सुस्तावणारी एक सुन्न दुपार - आत्मा - अनात्म्यात दंगल माजली
म्हणून थरथरली - भयचकीतून भुतळी प्रवेशणाऱ्या बेफाम
आत्म्याची वाट बघत आवेगांसह समाधिस्त होऊन थांबली
बहुधा चित्रागुप्ताचे All Assistants बेवडा पेऊन तर्रऽऽ असावेत
पगारवाढ व्हावी म्हणून बैठा संप घडवित असावेत
किंवा चित्रगुप्तानेच टाळेबंदी डिक्लेअर केली असेल
त्याच्या डाव्या कपाटात, अतीडाव्या खणात वास्तवणाऱ्या
कम्युनिस्टी आत्म्याने गर्जुन चित्रगुप्ताला गचांडी दिली
बेधुंद बेफाट होत त्याने साऱ्यांना मुक्तीची हाक दिली
जन्ममृत्यूच्या नोंदबुका - पापपुण्याच्या एंट्रीज जर्नल्स
क्षणार्धात त्याने पेट्रोल टाकून चेटवून दिल्या
स्वलोकीचे ‘क्लीअरींग हाऊस’ पळापळीत गुंगून गेले
अंधारल्या गर्भाशयीच्या कारागृहात
एक अनाम बेबंद बेफाट आत्म्याने
दलित क्रांती झिंदाबाद ची घोषणा दिली
अंतराळी भ्रमणारा भीमात्मा सुखावला
‘आगे बढो’ आशिर्वादून पुढे निघाला
पुण्यपतनस्थ नगरीत प्रवेशु इच्छिणाऱ्या
अनंत सोवळेखानी भटाळ आत्म्यांनी
गुलाबी पितांबरी पाचुंदाभर कुल्हे थयथयवून
‘वेद प्रामाण्याचा’ अनिर्बंध नंगानाच घातला
वेद गीता पुराणे इत्यादींची तमा न बाळगणाऱ्या
ढसाळलेल्या एका भटाळ आत्म्याला ताळ्यात आणण्याचा
निष्प्राण, निष्प्रेम प्रयत्न केला
त्याचवेळी मनूच्या अवलादींनी बांधलेली संस्कृती बाग
शिलगाऊन - भडकावण्याचा मी निश्चय केला
गर्भकारागृहाच्या नाजूक भिंती
माझ्या बेलाग घोषणेने ठण्ण खणाणल्या
रुपेरी साखळदंडी जंजीरबेडी छनाऊन
लिलये हातांवर पेलून मँडेला व्हायची मी
स्वतःच स्वतःला किंकाळून जाग दिली
सुरकुतलेले, पछाडलेले, पिसाळलेले, गोंधळलेले
असंख्य अवतरणी मनुमात्म्यांनी भुंडाळलेले होऊन
संस्कृतीची मेहेरनजर राखायला सांगितली
निःशब्द गंभीर आनंद मुद्रेने
साखळदंड उडवित मी क्रांतीची बांग दिली
‘संस्कृतीच्या षंढछाप कस्तुरी भाटांनो
तुम्ही कहीही करा, कितीही कोकला
तुमच्या संस्कृतीचं हवाई धरण
आता पुरेपूर फुटणार आहे
उसळणार आहे, कोसळणार आहे
कारण आपल्याच धर्मात आता
वॅगनभारुन ‘ढसाळ’ जन्म घेणारेत
सलामी माझी झडली आहे
विवेकाची झोप मोडली आहे
सांभाळून असा!
कित्येक मागून येताहेत।
मी तर केवळ नांदीची एक रुपरेखा।’


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.