
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
माझा महाराष्ट्र - (Majha Maharashtra) ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?
छायाचित्र: महाराष्ट्रातील नारायणगाव जवळील प्रसिद्ध निमगाव दावडी येथील गुलाबी फेट्यातील वृद्ध महाराष्ट्रीय व्यक्ती, माझा महाराष्ट्र (महाराष्ट्र), छायाचित्रकार: हर्षद खंदारे.
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जें तुझ्या अंतरीं
निशाणावरी,
नाचतें करीं;
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्थासी
वैभवासि वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा
ठायीं ठायीं पांडवलेणीं सह्याद्रीपोटीं
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडचाही
लढवय्या झुंझार डोंगरीं तूंच सख्या पाहीं
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल
ध्येय जे तुझ्या अंतरी...
तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा
वहाण पायीं अंगिं कांबळी उशाखालिं धोंडा
विळा कोयता धरी दिगंबर दख्खनच हात
इकडे कर्नाटक हांसतसे, तिकडे गुजरात
आणि मराठी भाला घेई दख्खन-कंगाल
इकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल
ध्येय जे तुझ्या अंतरी...
- गोविंदाग्रज (संगीतकार: वसंत देसाई, मूळ गायक: जयवंत कुलकर्णी व समूह)
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा (व्हिडिओ)
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका ‘पोराने’ पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली!
हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे!
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!
इथला कोकण किनारा, इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये...
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!
हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!
इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!
भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला! अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!
मराठी साहित्य म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!
विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक... जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!
७०० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!
महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.
मुंबईचा वडा पाव, नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण, वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, सातारी कन्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आणी मालवणी जेवण....अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!
तर असा आहे आपला महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सर्वांस माया लावणारा आणि जपणारा!
- प्रांजल वाघ
ताजे लेखन
या आठवड्यात प्रकाशित झालेले महाराष्ट्र या विभागातील नवीन लेखनसर्व विभाग / महाराष्ट्र / माझा महाराष्ट्र
विभाग -
माझा महाराष्ट्र · महाराष्ट्र राज्याची माहिती · महाराष्ट्राचा इतिहास · मराठी लोक · सैरसपाटा · मराठी संस्कृती · मराठी साहित्य · महाराष्ट्रीय कला · महाराष्ट्रीय खेळ · महाराष्ट्रीय पदार्थ · महाराष्ट्र फोटो
विषय -
मुंबई · महाराष्ट्राचा इतिहास · महाराष्ट्र · सैरसपाटा · संस्कृती · मराठी साहित्य · महाराष्ट्रीय खेळ · महाराष्ट्रीय पदार्थ · मराठी लोक · महाराष्ट्र फोटो