घर म्हणजे सुंदर स्वप्न - मराठी कविता

घर म्हणजे सुंदर स्वप्न, मराठी कविता - [Ghar Mhanje Sundar Swapn, Marathi Kavita] घर म्हणजे केवळ घर नसतं, असल्या जरी चार भिंती.
घर म्हणजे सुंदर स्वप्न - मराठी कविता | Ghar Mhanje Sundar Swapn - Marathi Kavita
घर म्हणजे केवळ घर नसतं
असल्या जरी चार भिंती
तरी जगण्यासाठी विणलेलं
सुंदर स्वप्न असतं
आपुलकीच्या झरोक्यातून इथे
प्रेमाचं वारं वाहत असतं
वाड - वडिलांच्या आशीर्वादाचं इथे
डोक्यावर छप्पर असतं
सुखी समाधानी आयुष्याचा प्रकाश
इथल्या दिव्यांत तेवत असतो
भावा - बहिणीच्या नात्यातला गोडवा
इथल्या चुलीवरच्या धुरात दरवळत असतो
दुःख पचवायची ताकद इथल्या
नात्यांच्या खांबांना असते
संस्कृतीच्या मजबूत पायावरच
ही इमारत उभी असते
इथे आलिंदचा मोकळेपण जरी
तरी कुंपणाचं बंधन आहे
इथं पायर्‍यांची उंची जरी
जमिनीचा सहवास आहे
खेळण्यास आंगण जरी
फुलांचा सुवास परसात आहे
आई बाबांच्या कष्टाचा ओलावा
कुठंतरी या मातीत मुरला आहे
म्हणूनच घर म्हणजे केवळ घर नसतं
असल्या जरी चार भिंती
तरी जगण्यासाठी विणलेलं
सुंदर स्वप्न असतं

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.