बुद्धा तु एक भीषण थंड भगवंत, पद्मास्थवून का बसलास छाताडावर
बुद्धा तु एक भीषण थंड भगवंतपद्मास्थवून का बसलास छाताडावर
माझ्या धगधगत्या विद्रोहाची माती करुन
नुकत्याच उमलल्या विजेरी झाडाला
तुझ्या करुणेचा डंख का चालवलास
माझा नेणिवेतला स्पर्श गोठवून
तुझ्यातली भुती माझ्यात उतरवून
जे साधायचे असेल ते
व्हायचे नाही माझ्याने ते
जे तुला हवे असेल ते
तुझ्या ‘त्रयींचा’ मोरपंखी झुला नको झुलवूस
मला विपश्यनेच्या गोत्यात अडकवून
माझ्यातल्या दरेक अग्नी पोकळीची किंमत चुकवलीए मी
तुझ्या शून्याला साक्षून, त्रशा-करुणेला स्मरुन
तरीही का थंडावतोस माझ्या ज्वालेला घट्ट धरुन !
तू आलास कुठुनही बुद्धा, मातीतून, देशातून
काळातून वा सांगितलेल्या अवतारातून
तर -- तर घुमजाव करुन डोळा चुकवणार मी तुझ
तुझ्या स्वर्गीय दर्शनाची आस सोडून ।
कारण माझ्या संतापाची पालं ठोकायचीएत मला
त्यांच्या परंपरागत निष्ठूर वसुंधरेवर
तुझ्याच लेकरांना त्रिशंकू पिडेवर हलवून
सवलतींच्या स्वर्गाची दारे झुलवून
तुझा हा फसवा जयजयकार बुद्धा !
तिरंग्यावरच्या चक्रांकित समतेला खिजवून
म्हणून मी ठिक चाललोय बुद्धा
माझ्या मशाली बरोबर घेऊन
तू आलास की लाद्या सरकावशील बर्फाच्या
मणामणाच्या न पेलवणाऱ्या माझ्या नसानसातून
तू आलास तर परत जा विपश्यनेच्या अंधारातून
क्षमा भगवन ! सांगतांना मी जातोय काळवंडून
माझी सुक्ते संतापाची रचून होईंतो
तुझ्या ‘त्रयी’च झाड नको हलवूस
आणि वेदना माझी पुरी मिटतो
विपश्यनेला तू नको खिळवूस.