आज मी गद्दार झालोय तुमच्या विध्वंसक वेदांशी, भंडाफोड गीतेशी आणि पाणवट पुराणांशीही
आज मी गद्दार झालोय तुमच्या विध्वंसक वेदांशीभंडाफोड गीतेशी आणि पाणवट पुराणांशीही
हजारो नर्क कोसळले तरी ना हरकत!
अशा अंशाने चुकता करणार मी हिशोब
संस्कृतीतल्या हरेक दलालीचा!
मनूच्या वारसदारांनो बुब्बुळे बाहेर काढू नका
घामेजलेले टाचा तळवे उगा उराशी बडवू नका
तुमच्याच अवलादीतलं नव बेण
(तिन्ही लोकातला श्रेष्ट ब्राम्हण?)
नवी स्मृती घडवीत आहे
मानुस्मृती सांगत आहे... घ्या लिहून!
इथून पुढे विषमतेच्या साक्षीला
परमात्मा तुमचा धावणार नाही
अन्यायाच्या उद्यापनाला
सत्यनारायण पावणार नाही
माणसाला मारुन
कुठलाही प्राणी भजणार नाही
वसुधैव कुटुंबकम सांगून
‘राजवाडा’ मांडणार नाही
चातुर्वर्ण्याला मान तुकवून
खोटं समर्थन सांगणार नाही
माणूसकीची पिंड, न्यायाचा अभिषेक आणि समतेचे स्तोत्र
उद्या जगाल आणि लावाल ‘मानुस्मृतीचं’ नवं गोत्र