अंत क्रांतीचा - मराठी कविता

अंत क्रांतीचा, मराठी कविता - [Anta Kranticha, Marathi Kavita] दुष्ट शातकातल्या हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी लिहिला आणि संस्कृतीचा मुडदा धाडकन कोसळला.
अंत क्रांतीचा - मराठी कविता | Anta Kranticha - Marathi Kavita

दुष्ट शातकातल्या हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी लिहिला आणि संस्कृतीचा मुडदा धाडकन कोसळला

दुष्ट शातकातल्या हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी लिहिला
आणि संस्कृतीचा मुडदा धाडकन कोसळला
चातुर्वर्ण्याच्या मस्त व्यवस्थेची क्षणात माती झाली
हिंदुस्थानी काया भ्रष्ट होताच तीच त्यांची नीती बनली
शिवशाही आणि पेशवाई, आणि इंग्रज आप्त
सगळेच आमचे बाप बनले
विजेची एक तार झणाणून उठली
ती तार थरथरणारी आणि पेटवणारी
आश्चर्य! तरीही कोमल आणि सुखावणारी
इथले काही भेकड उगाच हादरले
काही मात्र खरेच ओशाळले
काहींचा तर तिळपापड झाला
ज्वालेचा दाह आणि विजेचा शॉक
साऱ्यांना फरक वाटतच नव्हता
ती तर ५०० व्होल्ट घेऊन फिरतच राहीली
मेनस्विच फुटायची वाट बघत फिरली
थोडी थोडकी नव्हे - २० वर्षे!
तारेला गरजही नव्हती एवढं थांबण्याची
शक्तीचा साठा पुढ्यात असताना
उगाचच भीक मागण्याची
ती तार हिंदुस्थानी खास!
शक्ती असताना गोंजारणारी
न्याय नसताना अपमान सोसणारी
पृथ्वीराजही फिका पडावा एवढा अधिक्षेप वागवणारी
क्रांतीगर्भ अजून फुलायचा म्हणून
आपल्याच शक्तीला थोपवित बसली
मेनास्विच फुटला अन्‌ पाच लाखांवर लोकांनी
एका रात्रीत ‘राम राम’ करणं बंदिस्त केलं
कित्येक कोटी थरारले, कित्येक कोटी संतापले
कित्येक कर्माला अक्षम्य दोष देत स्वतःतच आक्रंदले
काहींनी डोळे लख्खकन मिटले
काहीजण गुलामीतून सुटले
क्रांतीगर्भ फुटला पण दाता निर्वर्तला
आणि इथेच क्रांतीचा अंत झाला.


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.