एक प्रचंड शून्य - मराठी कविता

एक प्रचंड शून्य, मराठी कविता - [Ek Prachand Shunya, Marathi Kavita] एक प्रचंड शून्य, बुद्ध, लाओत्से आणि महावीर, जीझस, शंकर आणि महंमद.
एक प्रचंड शून्य - मराठी कविता | Ek Prachand Shunya - Marathi Kavita

एक प्रचंड शून्य, बुद्ध, लाओत्से आणि महावीर, जीझस, शंकर आणि महंमद

एक प्रचंड शून्य
बुद्ध, लाओत्से आणि महावीर
जीझस, शंकर आणि महंमद
पोहोचले नव्हते तिथे. पण ओझरती कल्पना होती बुद्धाला
म्हणुन बुद्ध वेगळा वाटला मला
शून्याची भयकारी वास्तवता
पण बुद्धाचा शून्य वेगळा होता
हे या जन्मी कळले मला
हिंदूंच परमतत्व - ब्रम्हतत्त्व झिडकारलं बुद्धानं
वास्तवता आणि तर्कशास्त्र काखेत धरणारा बुद्ध
इथल्या ब्राम्हणानं सरासर झूट ठरवला
ब्रम्हाला शून्य म्हणणारा बुद्ध वाळीत टाकला गेला
अतीपूर्वेला हे बीज फोफावलं तेव्हा
हा अशरीरी आत्मा अंतराळी भ्रमत होता
त्यावेळी बुद्धाची स्पष्ट कल्पना आली मला
हे जग - हे जीवन का? हा ‘का’ चा भयकारी प्रत्यय
अनुभवत होतो तेव्हा
त्याचवेळी हे जग त्या चराचराला व्यापुन राहीलेल्या तत्त्वाच्या जवळ
अगदी जवळ सरकत होतं
वाटलं, वाटलं पुन्हा शरीर धारण करावं
अन्‌ त्या शून्यात विरुन जावं
बस! फक्त तीच साधना करावी
आत्मा आणि त्यावरची आदरण यानं मला झुकवलं
वाळवंटातल्या यावनी राज्यात जन्मलो मी
मुस्लीम राजपुत्र असलेल्या मला पाजताना
ती बेगम विलक्षण थरारली
पुरे वक्त नमाज पढणारी बेगम सद्गदीत झाली
मी मात्र तितकाच थंडा होतो
आकाशी हात फैलावून आरोळी घुमली अंतराळात
‘अल्लाहकी देन हातमें आयी’
माझे उसासे समजत नव्हते त्यांना
बाल्यावस्थेतच घरातूस धुम ठोकली
अंगावरची राजपुत्री झूल उतरवली
साधना चालू होती - पथ सत्य होता
रस्त्यावरचे काटे हसत - हसत झेलले मी
तोच सत्याच्या जवळ पोहचणारा मी अंतराळ्यात फेकला गेलो
‘अल्लाह’तला ‘अ’ भावत होता मला
पण उरलेला ‘लाह’ अंगाची लाही करत होता
म्हणून बंड पुकारलं मी कोरड्या वाळवंटात
घुमला त्यावेळी एक प्रचंड नाद!
हजारो शिष्यांसहीत बळी गेला माझा
जीझसच्या शांततेनं सुळावर चढलो मी
या जगातल्या यातना सरासर खोट्या - साफ खोट्या
एवंच सुळावर सुद्धा माझ हास्य आकाशाला भेदून गेलं
पुन्हा तोच प्रवास - प्रवासातला प्रवेग तोच!
ब्रम्हांडात असलेलं माझं अस्तित्व स्थिर झालं
पण बुद्धाची जाणीव झाली तेव्हा
‘इथं जगाचा अंत आहे
पुढे जाल का?’
हा सतावणारा ‘का’ स्वस्थ बसू देत नव्हता
तीच भिती भिनली
शुन्यात झाकणारा मी क्षणभर थरारलो
थबकलो तिथेच मी संपलो!
मागचा मार्ग थिजला कुजला आणि कोसळला
त्रिशंकुची अवस्था माझ्यापेक्षा बरी होतो
उडी घ्यायचं धाडस ‘लुप्त’ झालं
चक्र घुमली डोक्यात भिनली
मी वेडा झालो आणि बंड पुकारलं
बंड करणारे नेहमीच खड्यात जातात - मी ही गेलो
पुन्हा तोच प्रवास - प्रवासातला प्रवेग तोच
अंतराळात आल्यानंतर पृथ्वीवर एक मार्क्स जन्माला आला
अधिभौतिकतेत सामावलेलं भौतिकत्व
अव्यवस्थेत सुद्धा चांगली व्यवस्था असते
हेच त्यानं भौतिकात घालवलं
मार्क्स मात्र नास्तिक ठरला
मार्क्सचा आत्मा भावला मला
जगातला सगळ्यात मोठा अस्तिक तोच होता
हे साऱ्या जगानंच नाकारलं
पण तो मेला तेव्हा माझ्यासारखाच शांत होता
माझ्यासारखाच तो हसत - हसत अंतराळात आला
मार्क्सनंतरचं जग मला हवं होतं
बुद्धाच्या पुढचं एक पाऊल म्हणजे मार्क्स!
पण मार्क्स तिथेच का थांबला हे मला कळलं नाही
त्यानंतरच्या मार्गाची पूर्ण जाणीव आहे.
तो मार्ग मात्र कुठे थडकणार हे मला ठाऊक नाही.


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.