थडग्यातल्या क्रुसांनो, कफनीतल्या प्रेतांनो, स्मशानातल्या भूतांनो धावत या!, आमंत्रण देतोय नाकारु नका
थडग्यातल्या क्रुसांनो, कफनीतल्या प्रेतांनोस्मशानातल्या भूतांनो धावत या!
आमंत्रण देतोय नाकारु नका
नाकारलंच तर तुमचीच छीऽ थू होईल
देशभक्त म्हणून उरली सुरली तुमची ‘ती ही’ जाईल
कारण स्वातंत्र्याचं शिंगरु अजून तरी यायचं आहे!
म्हणून म्हणतो अस्साल तस्से या - धावत या!
मुर्दाड माती - मुर्दाड मने आणि मुर्दाड मी
मुर्त मुडद्यांनो, मुडद्यांच्या देशात लवकर या
शंभर कोटींची मुर्दाड पिलावळ व्हायच्या आत या
‘बच्चे भगवान की देन होती है’
‘बच्योको रोकना खुदाको नामंजूर!’
तुम्हीही त्यांच्यात सामील व्हा
दबकू नका - गचकू नका - तुम्हालाही कोणी टरकणार नाही
कारण स्वातंत्र्याचं शिंगरु अजून तरी यायचं आहे!
सोनचमचे तोंडात चवाळणाऱ्या गाढवीपोट गुंडांनी
आमच्या दारिद्र्याची लक्तरे अवघ्या नकाशावर टांगली
लोकशाहीने समाजवादाची मुंडीच छाटली
त्यांच्या इमले हवेल्यांच्या दारा - खिडक्यात मुक्काम ठोका
धुत्कारासारखी झडप टाकुन त्यांची चांगली नरडी घोटा
कारण स्वातंत्र्याचं शिंगरु कधी जनलच नाही