एक बामण ढसाळलेला - मराठी कविता

एक बामण ढसाळलेला, मराठी कविता - [Ek Baman Dhasalalela, Marathi Kavita] हृदयाच्या कप्पेबंद पिंजऱ्यात फुले नी आंबेडकर ठासून भरला.
एक बामण ढसाळलेला - मराठी कविता | Ek Baman Dhasalalela - Marathi Kavita

हृदयाच्या कप्पेबंद पिंजऱ्यात फुले नी आंबेडकर ठासून भरला, शरीरातली प्रत्येक पेशी आंबेडकरी जाणीवेत तळून काढली

हृदयाच्या कप्पेबंद पिंजऱ्यात फुले नी आंबेडकर ठासून भरला
शरीरातली प्रत्येक पेशी आंबेडकरी जाणीवेत तळून काढली
आंबेडकरी जाणीव बॅरीस्टरी वाणीतून प्रकटली तेव्हा
माझे काही मित्र चमकले, काहीजण मुद्याम थबकले
‘मान्या दलितांचा हा पुळका
केव्हापासन आला?’ एक जीवघेणा सवाल!
जबाब माझा, गुजरात दंगल पेटली तेव्हा!
पुढे सर्जनी थाटात संस्कृतीची चिरफाड
अथपासून इतीपर्यंत करायला लागलो
होता होता छत्रपतीचं एक ‘बेणं’ अंगारुन बरसलं
‘तुम्हीच लेहून ठेवेल ना रे
आता का तुम्ही बदलता रे!’
‘बा’ च्या खारट इहिरीच पानी आता कधी मी पिनार न्हाई
चुकलो, माकलो सांगून ठिवतो पुन्हा कधि आम्ही लिहीणार न्हाई
पोस्टमार्टेम पुरं व्हायच्या आत ते बेणं पुन्हा वराडलं
‘खरं खरं सांग मान्या तू बेट्या भटाचा का!
का तू आहेस धेडाचा, की आई तुझी...’
हादरलो, पिसाटलो अन्‌ मी ढसाळून उठलो
उभा नी आडवा मी खोल गर्तेत फेकला गेलो
वाचलेले माने, पवार, सपकाळे
आणि ढसाळ सारे पेटून उठले
जाब चुकता करायचा होता
सपकाळेचा ‘सुरुंग’ पेटवायचा होता
चेंदवणकराचं ‘ऑडीट’ बाकी
‘ढसाळ’ न बकोट पकडून माझं
सांगून सवरून उभं केलं
तीच जाणीव ‘ढसाळ स्पिरीटात’ बुचकाळून काढली
आणि प्रचंड ढसाळून मी बोलून उठलो
‘तुमची संस्कृती म्या मारली ह्याच्याव!’
हेलपाटून भोवंडून ते बेणं गपगार पडलं
भुंड्यात तंगडी घालून सालं कुत्र्यागत पळत सुटलं
नसा झालो मी, एक मान्या ढसाळलेला
एक बामण ढसाळलेला


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.