समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या एकुन २०५ मनाचे श्लोक या मानवी मनास मार्गदर्शन करणाऱ्या पद्य स्वरूपाच्या श्लोक मालिकेतील श्लोक १३, मना सांग पां रावणा काय जाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले
मनाचे श्लोक - श्लोक १३मना सांग पां रावणा काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥
- समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक - श्लोक १३ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
मनो ब्रूहि तच्चेच्छुतं रावणस्य ।
क्षणेनैव राज्य समस्तं विनष्टं ॥
त्यजातोऽशुभां वासनां दु:खदात्रीं ।
बलैनैति कालो हठात् पृष्ठलग्न: ॥१३॥
मनाचे श्लोक - श्लोक १३ - अर्थ
या श्लोकात श्रीसमर्थ मनाला रावणाचे उदाहरण देऊन सावध करत आहेत की, बघ मना रावणाचंच काय झालं ! रावणाने कुडी म्हणजे दुष्ट वासना धरल्यामुळेच शेवटी स्वतःच्याच हाताने स्वतःचाच नाश ओढवून घेतला. म्हणून तू देखील सर्व वाईट वासनांचा तत्काळ त्याग कर. इथे समर्थ मनाला अजून एक गोष्ट सांगत आहेत. सर्व देवांना बंदीशाळेत टाकून राबावयास लावणारा एवढा चौदा चौकड्यांचा राजा
मज रावणासारिखा कोण आहे ।
समरंगणी काळ भीडों न राहे ॥
असा ज्याला गर्व तो रावण सुद्धा दैववशात काळमुखी निमाला तेथे इतरांनी आपल्यातील सामर्थ्याची घमेंड व वैभवाची शाश्वती काय मानावी !
वाईट वासनांमुळे मनुष्य काळाला लवकरच आपल्याकडे बोलवून घेतो. असा बोध करुन समर्थ मनाला काळाचे महत्त्व सांगत आहेत.