समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या एकुन २०५ मनाचे श्लोक या मानवी मनास मार्गदर्शन करणाऱ्या पद्य स्वरूपाच्या श्लोक मालिकेतील श्लोक १२, मना मानसीं दु:ख आणूं नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे
मनाचे श्लोक - श्लोक १२मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥
- समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक - श्लोक १२ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
मनो दु:खजालं समस्तं विसृज्य ।
तथा शोकचिंते विनाशैकमूले ॥
ततो देहबुद्धिं परित्यज्य दूरात् ।
विदेहस्थितौ सर्वदा संरमस्व ॥१२॥
मनाचे श्लोक - श्लोक १२ - अर्थ
इथे श्रीसमर्थ मनाला सांगत आहेत की -
ते चि काया मी आपण ।
हें देहबुद्धीचें लक्षण ।
विवेकाच्या आधाराने ही देहबुद्धी त्यागता आली पाहिजे. ही बुद्धी जो पर्यंत आपल्यात जागृत आहे, तोवर मुक्ती नाहीच. कारण, हीत आहे देहातीत ॥ हा विवेक कसा करावा ? तर समर्थ यावर सांगतात -
पाहातां देहाचा विचार ।
अवघा तत्त्वांचा विस्तार ।
तत्त्वें तत्त्व झाडिता सार ।
आत्मा च उरे ॥
बांधली आहे तों गांठोडी ।
जो कोणी विचारें सोडी ।
विचार पाहातां ही गांठोडी ।
आडळेना ॥
तत्त्वांचें गांठोडे शरीर ।
याचा पाहातां विचार ।
येक आत्मा निरंतर ।
आपण नाहीं ॥
देहबुद्धीनें बांधला ।
तो विवेकें मोकळा केला ।
देहातीत होतां पावला मोक्षपद ॥
समर्थांना सांगायचं आहे की, उपासना करता करता आधी विवेक जागृत होतो. विवेकाच्या निरंतर अभ्यासाने ही दुःख देणारी देहबुद्धी आपण नष्ट केली पाहिजे. ती एकदा नष्ट झाली की, देहात राहूनच मुक्तीचा आनंद आपण घेऊ शकतो.