मनाचे श्लोक - श्लोक ११

मनाचे श्लोक - श्लोक ११ - [Manache Shlok - Shlok 11] जनीं सर्वसूखी असा कोण आहे, विचारें मना तुंचि शोधुनि पाहे.
मनाचे श्लोक - श्लोक ११ | Manache Shlok - Shlok 11

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या एकुन २०५ मनाचे श्लोक या मानवी मनास मार्गदर्शन करणाऱ्या पद्य स्वरूपाच्या श्लोक मालिकेतील श्लोक ११, जनीं सर्वसूखी असा कोण आहे, विचारें मना तुंचि शोधुनि पाहे

मनाचे श्लोक - श्लोक ११
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे ॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥
- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ११ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
समस्तै: सुखै: संयुत: कोऽस्ति लोके ।
मन: सद्विचारै: शनैर्निश्र्चिनु त्वं ॥
मनो यत्त्वया संचितं कर्म पूंर्व ।
तदेवेह भोग्यं शुभं वाऽशुभं वा ॥११॥

मनाचे श्लोक - श्लोक ११ - अर्थ
इथे श्रीसमर्थ मनाला विचारत आहेत की, हे मना, सर्व जनांमध्ये पूर्ण सुखी असलेली व्यक्ती तू कधी पाहिली आहेस का ? पूर्ण सुखी व्यक्ती तुला शोधूनही कधी सापडणार नाही. प्रत्येकाला कुठल्या तरी गोष्टीचं दुःख असतंच. आणि जर दुःख किंवा संकटे जीवनात टाळणे अशक्यच आहे तर त्याबद्दल सतत चिंता तरी का करावी? जे पूर्वसंचित घेऊन आलेलो आहोत त्याप्रमाणे सुखदुःखे भोगावीच लागणार आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवून निःशंकपणे मनाला श्रीरामाच्या भजनात लीन करावे. ही गोष्ट अंगिकारली की मग समर्थ म्हणतात तशी अवस्था प्राप्त होईल.

ते म्हणतात
आतां होणार तें होयेना कां ।
आणि जाणार तें जायेना कां ।
तुटली मनातील आशंका ।
जन्म-मृत्याची ॥

समर्थांची यासंबंधी अजून एक सुंदर ओवी आहे. ती अशी
जनीं संचितें पिंड निर्माण जाला ।
जनीं तें चि भोगावया जीव आला ।
शुभाशूभ होणार काही कळेना ।
पुढें प्राप्त ब्रह्मादिकां ही टळेना ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.