लहुजी साळवे (मातीतले कोहिनूर) - पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ गावात जन्मलेले भारतीय क्रांतिकारक मातीतले कोहिनूर लहुजी साळवे [Lahuji Salve].

भारतीय क्रांतिकारक क्रांतिपिता लहुजी साळवे (१७ फेब्रुवारी स्मृतिदिन विशेष)
लहुजी साळवे
बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी देह झिजविणारे खरे स्वातंत्र्यवीर आणि देशभक्त गुरुवर्य वस्ताद लहुजी साळवे आहेत.
(छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह)
लहुजी साळवे / लहु राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ (नाशिक जिल्हा) या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते.
वस्ताद लहुजी साळवे बुवा हे वंदनीय जोतीराव फुले यांचे व्यायाम गुरु होते. ब्राह्मणाघरी लिहिणं, कुणब्याच्या हाती रुमणं आणि अतिशुद्राघरी गाणं अशा कुविचारांची हुकूमशाही असलेल्या काळात ते केवळ व्यायामाचे धडे देत बसले नाहीत. तर बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. अनेक मुला - मुलींना जोतीरावांच्या विद्यालयात दाखल केले. बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी देह झिजविणारे ‘खरे स्वातंत्र्यवीर’ आणि देशभक्त गुरुवर्य वस्ताद लहुजी साळवे आहेत.
५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते.
दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रांबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ. स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
आजही कित्येकदा सत्य सांगणे गुन्हा ठरते. लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या काळी सत्य सांगू इच्छिणाऱ्यांना संरक्षण दिले. पण त्यांच्या कार्याची आज समाजाला फारशी जाणीव नाही. एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी येऊन जाते हे लक्षात ही येत नाही.
असेच एक महान राष्ट्रपुरूष आहेत लहुजी राघुजी साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७७४ रोजी झाला. लहुजी वस्तादांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रक्षण करणारे होते. त्यामुळे त्यांना लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रविद्येचे शिक्षण मिळाले होते. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, भाला फेकणे यात लहुजी साळवे निपुण होते. पुण्यात बुधवारपेठेतील गंजपेठेत त्यांची तालीम होती . याच तालमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले व दिले.
१८१७ मध्ये झालेल्या घनघोर युद्धात इंग्रज सेनेने मराठी सैन्याचा पराभव केला. या लढाईमध्ये लहुजींचे वडील राघोजी मारले गेले. स्वातंत्र्यासाठी वडिलांचे बलिदान पाहून लहुजी पेटून उठले. पुणे इंग्रजांच्या ताब्यात गेले. शनिवारवाड्यावरचे भगवे निशाण उतरवून युनियन झेंडा चढवला गेला. त्याच वेळी लहुजी साळवे यांनी इंग्रजांचा बदला घेण्याचे ठरवले होते.
पुणे येथील बजाज कंपनीसमोर लहुजींच्या वडिलांची समाधी आहे. लहुजींनी संपूर्ण युद्धशास्त्राचे ज्ञान अवगत केल्यानंतर गंजपेठेतील व्यायामशाळेत देशप्रेमाने भारावलेल्या तरुणांना ते शस्त्रविद्येचे प्रशिक्षण देत व मार्गदर्शन करीत असत. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही.
- कुणाल लोंढे
अभिप्राय