स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती?
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
(Swatantryacha Amrut Mahotsav) एखादया राष्ट्राच्या जीवनात ७५ वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे.
एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!
- कुसुमाग्रज
कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला पक्षी पिंजर्यातुन उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्रातुन मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता-बघता स्वातंत्र्याचा प्रवास ७५ वर्षाचा होत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. एखादया राष्ट्राच्या जीवनात ७५ वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडुन आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या? आज सत्य काय आहे? कुठे होती आपण आणि आता कुठे आहोत? उणिवा काय राहील्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील? याचा विचार आपल्याला करायला लागेल. स्वातंत्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमवाले आणि काय गमवाले? याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहचले आहोत.
भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे, पायी सागराच्या लाटा लोळण घालत आहे, देशातून गंगा, गोदावरी, ब्रम्हपुत्रा सारख्या रक्त वाहीन्या वाहत आहेत. निजीत पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालुन देशाची सिमा रक्षण करत आहेत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुलु मनाली, उटी सारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकुणच आपला भारत देश “सुजलाम् सुफलाम्” आहे.
आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांच्यासारख्या थोर संताची भुमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्मात आणि विज्ञानातही अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली १५ वर्ष साहित्य, कला, क्रिडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखक, साहित्यिक व कलावतांनी आपला ठसा उमटवला आहे.
पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूर वीरांनी ऐन तारुण्यात बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी रक्ताचा सडा सांडला. पण आम्ही मात्र रक्ताचा घाऊक बाजार मांडला असं कधीकधी उगाचच वाटते. आज चीन, पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात, उरी, पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात.
या देशातल्या शेतकर्याला आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते. अनेक गरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही, स्वर्ग सारखा काश्मिर गुलाबाच्या सुगंधाने दरवळत रहाण्याऐवजी रक्तात रंगताना पाहायला मिळतो. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात, तेव्हा स्वातंत्र्याच्या ठिकर्या उठतात. भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे पडतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील तर... त्या आईची काय अवस्था होत असेल? या सार्या आक्रमणामध्ये अतिशय सामान्य माणुस भरडला जातो.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खुप काही दिले आहे. परंतु जो असमाधानाचा, असंतोषाचा सूर निघत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत. आपली आर्थिक, सांस्कृतिक, औदयोगिक प्रगती झाली पण मूल्यांचा र्हास होत गेला. म्हणुनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने झपाट्याने परिवर्तन करीत आहोत, परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजुने वेगाने वाढणाच्या भौतिक व अभौतिक समस्याच्या दृष्ट विळख्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय, अशी अवस्था झाली आहे म्हणुनच स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील जनतेला हे एवढेच आव्हान करतो.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संबंधी महत्त्वाचे दुवे:
- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन एक पर्व (मराठी लेख)
- भारतीय प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी)
- १५ ऑगस्ट दिनविशेष
- सुरज पवार
अभिप्राय