आंधळे प्रेम भाग ४ - मराठी कथा

आंधळे प्रेम भाग ४ - मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा.
आंधळे प्रेम भाग ४ - मराठी कथा

मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा

दुसरा दिवस उजाडतो. अमेय गिटार क्लास घेत असतो. तेवढयात मृण्मयी त्या क्लासरुममध्ये येते. अमेय त्याच्या विद्यार्थ्यांना एक लॉंग रिदम शिकवित असतो. मृण्मयी त्याला हात उंच करून ‘मी आले आहे’ हे सांगते. अमेय तिला पाहतो व तिच्या हातात ती गिटार असते. आज मृण्मयीही खूप छान आवरून आलेली असते. ब्लॅक जिन्स पँट, एक मऊ ब्लॅक चेन असलेला कोट तिने परिधान केलेला असतो. क्लासमधील सर्व मुले तिच्याकडे पाहात असतात. ती अमेयकडे येत असते. अमेय तिला थांबवून ‘मी तिथे येतो’ असे खुणेने सांगतो. अमेय मृण्मयीजवळ जातो व तिला इथे येण्याचे कारण विचारतो. मृण्मयी त्याला म्हणते, “मलाही गिटार शिकायची आहे. मला तुमची विद्यार्थीनी बनवाल का?” यावर “हो का नाही? तुम्ही प्रथम तुमचे रजिष्ट्रेशन करा इथे. उद्यापासून या क्लासला.” अमेय तिला म्हणतो. “का? उद्यापासून का? आज का नाही?” असे हटवादी प्रश्न मृण्मयी अमेयला विचारू लागते. “अं... आता क्लासची वेळ संपत आली आहे सो उद्या या तुम्ही.” अमेय मृण्मयीला समजावून सांगू लागतो. “तुम्ही प्रायवेट क्लास घेत नाही का?” मृण्मयी अमेयला एकदमच हा प्रश्न विचारते. यावर अमेय आपले बोलणे थांबवतो. “मॅडम प्लीज तुम्ही उद्या या, आज नको.” असे बोलून तो पुन्हा स्टेजवर जातो. यावर मृण्मयीच थोडा हिरमोड होतो व ती तशीच तिथून बाहेर पडते.

अचानक बाहेर पाऊस सुरू होतो. अमेय ही आपले बॅगेजेस घेऊन खाली येतो. मोठा पाऊस सुरू असतो. मृण्मयी बेसमेंटमधेच गिटार घेऊन उभी असते. आज कोणतेही वाहन सोबत आणलेले नसते. अमेय आपली कार घेऊन एक्झिटकडे येत असतो. त्याला उभी असलेली मृण्मयी दिसते. अमेय तिच्याजवळ जाऊन गाडी थांबवतो. गाडीचा मिरर खाली करून तिला लिफ्ट हवी आहे का? असे विचारतो. मृण्मयी ‘sure’ असे म्हणून त्याच्या गाडीत बसते. तिलाही हेच हवे असते. मृण्मयी त्याला पाहून खूप लाजत असते. लाजून नजर चोरणे, आपले केस बाजूला करणे इत्यादी प्रकार मृण्मयी करीत असते. तेवढयात तिचे घर येते. मृण्मयी गाडीचे दार उघडून पटकन घरात जाते. अमेय ही आपली गाडी लगेच घराच्या दिशेने घेतो. तो ही पटकन घरात जातो. अमेयला शिवानीसोबत व्यतीत केलेला वेळ आठवतो. तो त्या रात्री पक्के करतो कि येत्या दोन दिवसांत शिवानीला आपल्या मनातील प्रेम सांगायचेच, पण इथे नाही तर एका निसर्गरम्य वातावरणात मला माझी ही इच्छा व्यक्त करायची आहे, असे म्हणून अमेय एक छोटा टूर प्लान तयार करतो. मोबाईलमधील व्हॉट्स अ‍ॅप उघडून शिवानीला ‘हाय’ असा मेसेज पाठवितो.

थोड्या वेळाने शिवानी ऑनलाईन येऊन ‘हॅलो’ असा मेसेज पाठविते. आज कशी आठवण काढली मिस्टर फोटोग्राफर? हा प्रश्नही सोबत ती त्याला विचारते. तेव्हा अमेय धाडसाने तिला म्हणतो की “दोन दिवसानंतर आपण महाबळेश्वरला जाऊया का?” यावर शिवानी “आपण दोघं? आपण दोघंच का?” असा प्रश्न विचारते. यावर अमेय ‘हो’ असे तिला म्हणतो. यावर शिवानी थोडे गंभीर होऊन त्याला म्हणते, “मिस्टर फोटोग्राफर, तुम्ही मला डेटसाठी विचारत आहात का?” अमेय तिला “नाही डेट नाही. फक्त तुम्हाला भेटायचे आहे मला.” “पण का?” शिवानी त्याला कारण विचारते. “आता भेटायलाही कारण लागते का?” अमेय तिला प्रतीप्रश्न करतो. “मग नको. असंच कस भेटायचे?” शिवानी अमेयला प्रश्न करते. “मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.” अमेय शिवानीला उत्तर देतो. “बरं ठिक आहे. उद्या सांगते.” म्हणून शिवानी अमेयला ‘good night’ असा मेसेज पाठविते.

दुसरा दिवस उगवतो. अमेय क्लास घेण्यासाठी जातो. मृण्मयी ही वेळेवर आलेली असते. अमेयला पाहून मृण्मयी खूष होते. ती त्याला ‘गुड मॉर्निंग’ असे विश करते. अमेय ही तिला ‘मॉर्निंग’ विश करतो. दोघेही क्लासरूममध्ये जातात. अमेय मृण्मयीला गिटार कशी धरायची, तिचे तार कसे छेडायचे हे सर्व काही शिकवू लागतो. हे सर्व शिकवित असताना अमेय मृण्मयीच्या कधी जवळ तर कधी दूर जात असे आणि मृण्मयी हे सर्व रोमँटिक पद्धतीने फिल करत होती. “सर एखादं लव्ह म्युझिक शिकवाल का?” मृण्मयीच्या प्रश्नावर तिथे उपस्थित सर्व स्टुडंट्स तिच्याकडे पाहू लागतात. अमेय आपले म्युझिक बुक उघडून एक रिदम पाहतो व आजचा लॉंग रिदम काय आहे हे त्यांना टास्क देऊन सांगतो. आज मृण्मयीचा पहिला दिवस म्हणून अमेयचे जास्त लक्ष हे मृण्मयीवर असते आणि मृण्मयी या घटनेला प्रेमाच्या नजरेने पाहू लागते. क्लास संपतो. मृण्मयी अमेयला बाय म्हणून क्लासच्या बाहेर पडते. त्या रात्री अमेय शिवानी कधी ऑनलाईन येते याची वाट पाहात असतो. रात्रीचे १२:०० वाजतात पण शिवानी काही ऑनलाईन आलेली नसते. शेवटी अमेय झोपी जातो.

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते. अमेय लवकर ऊठुन आपले वर्कआऊट वैगेरे आवरून व्हॉट्स अ‍ॅप उघडतो पण त्यावर ही शिवानीचा काही मेसेज आलेला नसतो. अमेय आपल्या बेडरूममध्ये जाऊन शिवानीला थेट कॉल करतो. दोन - तीन रिंग झाल्यावर शिवानी कॉल उचलते. “हॅलो, मी अमेय बोलतोय.” “हां बोला.” शिवानी अमेयला म्हणते. “मॅडम कशा आहात तुम्ही?” अमेय शिवानीला विचारतो. “मी बरी आहे. का?” शिवानी त्याला विचारते. “काय नाही. “आ... आ... आपण...” अमेयचे अपूर्ण बोलणे शिवानी पूर्ण करते. “महाबळेश्वरचे ना.” अमेय तिला ‘हो.’ असे म्हणतो. “बरं. उद्या संडे आहे सो उद्या आपण जाऊया.” असे शिवानी अमेयला म्हणते. हे ऐकून अमेयला खूप आनंद होतो. तो ‘येस’ असे म्हणून जागेवर उडी मारतो. अजून फोन सुरू असतो. शिवानी गालातल्या गालात हसून फोन कट करते. आता अमेयला फक्त उद्याचा दिवस कधी उजाडतो व तो आणि शिवानी महाबळेश्वरला कधी जातात याची उत्सुकता लागलेली असते.

क्रमशःआंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)इंद्रजित नाझरे | Indrajeet Nazarer
इचलकरंजी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.