निरोप सरत्या वर्षाचा (मराठी लेख) - [Ekvisavya Shatakatil Stri,Marathi Article] सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

कॅलेंडरप्रमाणे बदलणारे मानवी जीवन
निरोप सरत्या वर्षाचा (मराठी लेख)
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कॅलेंडरप्रमाणे बदलणारे मानवी जीवन
खरंच काळ किती गतिमान आहे ना. तो कोणाकरिता थांबत नाही आणि कोणी पळ म्हटलं म्हणून पळत नाही. काळाच्या या घडीत कॅलेंडरप्रमाणेच गतवर्ष फस्त झालं. त्यापूर्वी किती वर्ष फस्त झाली असतील, त्याचा हिशोब कोणी ठेवलेला नाही. माणसाचा मेंदू जेव्हा काम करायला लागला, त्यातून माणसाच्या बुद्धिमत्तेने अनेक शोध लावले आणि जगाच्या व्यवस्थेकरिताच ही बुद्धिमत्ता वापरली. त्यातूनच ३६५ - ३६६ दिवसांचे वर्ष तयार झाले. १२ महिन्यांचे वर्ष ठरले. ३० - ३१ दिवसांचा महिना ठरला. ७ दिवसांचा आठवडा ठरला, १२ तासांचा दिवस ठरला, ६० सेकंदाचे मिनीट आणि ६० मिनीटांचा तास हे गणितही माणसाने ठरवले. हे गणित ठरवण्यापूर्वी सूर्य उगवतही होता आणि मावळतही होता. त्या काळात काळ - काम - वेगाचे गणित नव्हते. त्या वेळचे जग कसे असेल याची कल्पनाही करता येणार नाही.
माणसाच्या बुद्धीने हे कॅलेंडर तयार केले. त्यातून काही शब्दरचना आली. सूर्य उगवतो आणि मावळतो अशी परिभाषा तयार झाली. सूर्य उगवतही नाही आणि सूर्य मावळतही नाही. तो जिथे आहे तिथेच आणि त्याच तेजाने आहे. त्याला साप्ताहिक सुट्टी नाही, कुठल्याही सणाची, जयंतीची सुट्टी नाही अथवा रजेवर जात नाही. तो मावळला, उगवला हे सगळे माणसाच्या बुद्धीचे खेळ आहेत. मावळतो आपण आणि उगवतोही आपण. आपण झोपलो की मावळतो आणि उठलो की उगवतो. ही पृथ्वी सूर्याभोवती फिरली नसती तर जगात केवढा हाहाःकार झाला असता.
सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन असा शब्दप्रयोग आपण करतो. पण ते सूर्याचे असते का? ते पृथ्वीचे असते? जग निर्माण होऊन किती वर्षे झाली याची नोंद नेमकी कुणाजवळही नाही. पण रोजची सकाळ प्रसन्न वाटावी असा हा निसर्गाचा चमत्कार काय आहे? ती सकाळ पारोशी का वाटत नाही? या सगळ्या निसर्गचक्रात हजारो वर्षे गेली. फस्त झाली. माकडाचा माणूस निसर्गचक्रानेच होत गेला. माणसाचा पूर्वज माकड होता, असे तत्वज्ञान डार्विनने शोधून काढले. परंतु आजच्या समाजजीवनात आम्ही माणसेच अश्या पद्धतीने वागत आहोत की, आमचा पूर्वज माकड होता हे सांगायला डार्विनची गरज पडत नाही. असा हा काळ - काम - वेगाचा रेटा वर्षानुवर्षे चालू आहे. एक साल संपले, अशीच वर्षे सरकत जातील. विज्ञानाने उत्क्रांती खूप केली. संगणकीय क्रांतीने तर माणसाच्या बुद्धीची झेप किती प्रचंड आहे हे दाखवून दिले. जगाच्या स्पर्धेची गोष्ट सोडा. शंभर वर्षापूर्वी हा देश कसा होता, आज कसा आहे? कोणाच्या घरी तार आली तर ‘काय झालं?’ असा प्रश्न विचारला जाई आणि बाजारातून पिशवीत बाजार घेऊन जाणार्याला ‘घरी कोण आजारी आहे?’ ‘सर्वांची तब्बेत चांगली आहे का?’ असे प्रश्न विचारले जाई.
काळाच्या ओघात कसा बदल होत गेला. माणूस बदलला, त्याची जीवनशैली बदलली. आचार - विचार बदलले, पोशाख बदलले, दळणवळणाची साधने बदलली. केवळ एका वर्षात हे घडले नाही. अशी अनेक वर्षे येतात आणि जातात. बदल एथेच ठेवून जातात, बरोबर घेऊन जात नाहीत. या सगळ्या बदलामध्ये शंभर वर्षापूर्वीचे जग असे हातावर आल्यासारखे वाटत आहे. एक काळ होता की, गावात गॅसबत्ती आली तर ती बत्ती पेटवणारा माणूस गावातला कौतुकाचा विषय होता. गावात पहिल्यांदा धान्य दळणारी गिरणी आली तेव्हा अर्धे गाव धान्य कसे दळले जाते हे बघायला जमला होता आणि त्या लोकांना इकडे दळायला टाकलेले धान्य दुसर्या बाजूने पीठ होऊन बाहेर येते ही गोष्ट जणू जादूच वाटायची. काळाच्या या अफाट वेगात ही जुनी चित्रे अस्पष्ट झाली. जुन्या संकल्पना बदलल्या. सारवलेल्या मातीच्या चुली गेल्या. सगळी जीवनशैली बदलली. अगदी खेड्यातसुद्धा ते दिवस राहिले नाहीत.
१०० वर्षापूर्वी रेडिओ आला तेव्हा ज्यांच्या घरात रेडिओ आहे, ते घर किती मोठे समजले जायचे. दूरदर्शन आलेले. तेव्हा १५ ऑगस्ट १९७२ साली लाल किल्यावर इंदिराजींनी राष्ट्रध्वज फडकवून जे भाषण केले होते, ते सकाळी आठला झालेले भाषण संध्याकाळी सात वाजता दाखवले गेले. आजच्या तरूण पिढीला या सगळ्या गोष्टीची गंमत वाटेल. खरेही वाटणार नाही. आज फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम याने माणसे गुदमरून गेलेली आहेत. उत्क्रांतीच्या परिसीमेला आपण पोहोचलो आहोत. माणसे चंद्रावर चालली, मंगळावर चालली. सुनीता विल्यम तर आपल्या कल्पनेत असलेल्या अतिभव्य जगाच्या पलीकडे विश्वाच्या पलीकडच्या रणात सहा महिने संचार करून आल्या. आपण ज्याला जग म्हणतो ती आपली पृथ्वी या अनंत विश्वाच्या रणात केवढी छोटी आहे, असे सुनीता विल्यमना वाटत असेल.
पण आपण साधी माणसे आहोत. आपल्याला आपले स्वतःचे असे एक जग आहे. या जगात आपण खूश आहोत. ज्या माणसांनी विमान या वस्तूची कल्पना केलेली नव्हती ती सामन्य माणसे आता विमानाने फिरू लागली आहेत. विमानतळाचे स्वरूप एस. टी. स्टॅण्डसारखे झाले आहे आणि यातून प्रवास करणारे टाटा, बिर्ला, अंबानी नाहीत. सामान्य लोकांचे हात आता खूप उंच पोहोचू लागले आहेत, त्यांची झेप मोठी होऊ लागलेली आहे. त्यांची बुद्धी विलक्षण प्रभावी झाली.
शिक्षणाच्या सगळ्या संकल्पना रुंदावल्या. आज या देशातली ग्रामीण भागातली कोणी २० - २२ वर्षाची मुलगी मुंबई - दिल्ली, दिल्ली - मुंबई एअर बस ३२० आत्मविश्वासाने टेकऑफ करून तेवढ्याच आत्मविश्वासाने ते सुरक्षितपणे उतरवते हे ५० वर्षापूर्वी कोणाच्या कल्पनेत तरी होते का? किती झपाट्याने आपण पुढे चाललो आहोत. विज्ञानाच्या या जगात उगवलेला प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन आला आणि जे नवे म्हणून आले ते वर्ष संपेपर्यंत जुने कधी झाले हे कळलेच नाही.
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
- अर्जुन फड
अभिप्राय