मातृभाषा - मराठी लेख

मातृभाषा, मराठी लेख - [Matrubhasha, Marathi Article] मातृभाषा म्हणजे नक्की काय हो?

मातृभाषा म्हणजे नक्की काय हो?

मातृभाषा म्हणजे नक्की काय हो? तर ज्या भाषेचे आपल्यावर लहानपणापासून संस्कार झालेले आहेत, ज्या भाषेचा जन्मापासून आधार घेत आपण ज्ञान प्राप्त करत आहोत, ज्या भाषेच्या आधाराने आपल्या आई-वडिलांनी आपल्याला घडवलं, ज्या भाषेतून आपण सतत एकमेकांशी संवाद साधतो, भांडतो, गप्पा मारतो इत्यादी गोष्टी करतो ती आपली ‘मातृभाषा’ होय.

मातृभाषेला ‘आईच’ म्हटलेलं आहे...

हल्लीच्या काळात इंग्लिश भाषेचा वापर आपल्याला पदोपदी करावाच लागतो. जागतिक स्तरावर इंग्लिशलाच प्राधान्य आहे हे आपल्याला माहित आहे. इंग्लिश चांगलं बोलता, लिहिता, वाचता आलंच पाहिजे. त्यासाठी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्लिश वाचन-लिखाण करणे, इंग्लिश गाणी ऐकणे, इंग्लिश फिल्म्स बघणे, एकमेकांशी इंग्लिशमधून संवाद साधणे अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. पण हे सगळं करताना आपण आपली मातृभाषा विसरतोय का हो? इंग्लिश भाषेचा प्रभाव आपल्यावर जसा जसा वाढत जातो, तसं तसं आपण सगळ्याच ठिकाणी इंग्लिश बोलायला सुरुवात करतो. मग समोरची व्यक्ती मराठी भाषिक जरी असली तरी आपण इंग्लिशमध्येच फाडफाड बोलतो आणि आपल्या मातृभाषेचा वापर आपण कमी करतो. मग ते आपल्या घरात असो, मित्र-मैत्रिणींशी असो किंवा नातेवाईकांशी असो. का बरं आपण असं करतो? आपली मूळ ओळख जपण्यासाठी आपण प्रयत्नशील का नाही आहोत? मातृभाषेत बोलताना आपण अनायासे काही इंग्लिश शब्द वापरतोच कारण काही प्रमाणात संवाद साधायला ते शब्द सोपे जातात. त्यानंतर Facebook, WhatsApp, Instagram इत्यादी अशा Apps वर सुद्धा अनेक वेळेला आपण इंग्लिशनेच Chatting करतो कारण इंग्लिश टायपिंग करणं खूप सोपं जातं. तिथपर्पंत ठीक आहे. आपण परदेशात टूर वर जातो, तिथे शिक्षणासाठी काही काळ जातो किंवा स्थायिक व्हायला तरी जातो. आता आपण ज्या ठिकाणी जास्त काळ राहतो तिथल्या अनेक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यात तिथल्या प्रांतातल्या भाषेचा सुद्धा आपल्यावर प्रभाव पडत असतो. मग हळूहळू आपल्याकडून मातृभाषेचा वापर कमी होत जातो आणि आपण सर्व काळ इंग्लिशमध्येच बोलू लागतो. एवढंच नाही, तर तिकडची माणसं ज्या प्रकारे शब्द उच्चारतात तसाच उच्चार आपणही नकळतपणे करू लागतो. ते वाईट आहे असं नाही, पण एखाद्या गोष्टीचा आपल्यावर किती प्रभाव पडतोय, याचा नीट विचार आपण केलाच पाहिजे. जेव्हा परदेशातली माणसं भारतात येतात, तेव्हा ती माणसं आपापसांत मराठी, हिंदी, गुजराती, तमीळ, तेलुगु या भाषेत बोलतात का ? तर नाही, ती माणसं एकमेकांशी बोलताना फक्त त्यांच्या मातृभाषेतच बोलतात! एकदा जयपूरला असताना हवा महाल बघायला गेलो होतो. तिथले फोटो काढत असताना जाणवलं की आपल्या शेजारी परदेशातल्या दोन वयस्कर बायका महालाचं सौंदर्य बघून आपापसांत चर्चा करत आहेत. पण त्या बायका कोणत्या भाषेत चर्चा करत होत्या? तर फ्रेंच भाषेत! इंग्लिश सुद्धा नाही! आणि आपण मात्र निर्लज्जपणे आपली माती विसरून परदेशातले होऊनही जातो.. आज आपल्याला नोकरी मिळवायची असल्यास किंवा परदेशात जायचं असल्यास इंग्लिश अस्खलीत बोलता आलं पाहिजे, ही भीती कायम आपल्या मनात असते. हरकत नाही, इंग्लिश चांगलं बोलता आलंच पाहिजे पण, आपण जरा हा विचार करूया की, परदेशातल्या माणसांना ही भीती कधी असते का की मी जर उद्या भारतात गेलो आणि मला हिंदी नाही आलं तर लोकं मला काय म्हणतील? नाही.

मग परदेशातली माणसं जर कुठेही गेल्यावर बिनधास्तपणे त्यांच्या माणसांशी त्यांच्याच भाषेत बोलतात, तर मग आपण आपल्या मातीशी एकनिष्ठ का राहू नये?

आणि अगदीच चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर ते दक्षिण भारतीयांचं देता येईल. काहीही होवो, ते लोकं आपली भाषा अजिबात सोडत नाहीत. एक तर मातृभाषेतच बोलायचं आणि समजा समोरच्या माणसाला जर नाहीच समजलं तर इंग्लिश. मग ना तिथे मराठी, ना हिंदी किंवा अन्य कुठल्याही भाषा नाहीत. दक्षिण भारतातली लोकं इतकी कट्टर असल्यामुळेच त्यांची संस्कृती आजपर्यंत टिकून आहे. आणि मुळातच आपण एखाद्या गोष्टीचं अनुकरण का करतो? तर त्या गोष्टीला पण आपल्या नजरेत श्रेष्ठ मानत असतो आणि मग आपल्यालाही ते श्रेष्ठत्व प्राप्त करायचं असल्यामुळे आपण आपलं ‘स्वत्व’ सोडून दुसऱ्या मार्गाला लागत असतो. म्हणजे याचा अर्थ इंग्लिश भाषेला आपण आपल्या सर्व भारतीय भाषांपेक्षा आणि आपली मातृभाषा विसरून जे सतत विनाकारण आपल्या माणसांशी इंग्लिश बोलत असतात, यांना जर आपण श्रेष्ठ मानून त्यांचं अनुकरण केलं तर तो आपला अंधळेपणाच सिद्ध होतो. थोड्क्यात आपण भेदाभेद किंवा उच-नीच करत आहोत. म्हणजे इंग्लिश भाषा ही अत्यंत Standard आणि आपली मातृभाषा व त्यात बोलणारे लोकं खालच्या दर्जाचे किंवा गौंढळ असा आपण भेद करत आहोत. असा भेदाभेद आपण कायम करत राहिलो तर ‘माणूस’ म्हणून आपली बुद्धी प्रगल्भ कधी होणार? कारण बुद्धी प्रगल्भ होण्यासाठी विचारांची झेप लागते आणि भेदाभेद केल्याने आपले विचार झेप घेत नाहीत तर आणखी खाली घसरतात. आणि आपणही ही भीती मनात बाळगत असतो की माझ्या मातृभाषेत मी बोललो तर ते खालच्या दर्जाचं होईल, त्यापेक्षा इंग्लिश बोलून लोकांची प्रशंसा मिळवू. हा खोटा अहंकार नाही का? उलट आपण छातीठोकपणे म्हटलं पाहिजे की माझी मातृभाषा सुद्धा समृद्ध आहे आणि काहीही झालं तरी माझी मातृभाषा मी सोडणार नाही!

त्यामुळे, जर परदेशातली माणसं कुठेही गेलीत तरी एकमेकांशी त्यांच्या मातृभाषेतच बोलतात, जर ती माणसं त्यांच्या तत्त्वांना धरून आहेत, तर मग आपण एका परदेशी भाषेमुळे आपली मूळ ओळख, आपलं ‘स्वत्व’ का सोडतोय? आपली मूळ ओळख काय मग? आपणही त्यांच्यातलेच होऊन जाऊ. आपल्यातलं वेगळेपण असं काही राहणारंच नाही. असं करणं चुकीचं आहे...

आपण असा ठाम निश्चय केला पाहिजे की जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी माझ्या माणसांशी बोलताना मी माझ्या मातृभाषेतच बोलणार! असं जर आपण ठरवलं तरंच आपल्या भाषेला काही किंमत राहील आणि तरंच ती टिकून राहील. आपणच आपली संस्कृती टिकवायची नाही तर मग कोणी टिकवायची? आपल्याला आपले नातेवाईक कितीही आवडले तरी आपण लगेच आपल्या आईला विसरतो का हो? नाही! मग एका भाषेसाठी आपण आपल्या मातृभाषेला विसरणं कितपत योग्य आहे? आपली मातृभाषा टिकवून ठेवणं ही आपलीच जबाबदारी आहे!

इंग्लिश भाषा वाईट आहे किंवा इंग्लिश बोलणाऱ्यांचा द्वेष करावा, इंग्लिश बोलूच नये असं अजिबात नाही. इंग्लिश आलंच पाहिजे. आज कित्येकांना इंग्लिश बोलता येत नाही तर नोकरी मिळत नाही. त्यामुळे इंग्लिश ही काळाची गरज आहे. पण इंग्लिश इंग्लिशच्या ठिकाणी आणि आपली मातृभाषा तिच्या ठिकाणी. त्यामुळे, जिथे इंग्लिश बोलायची गरज आहे तिथे अस्खलीत इंग्लिश बोलावं पण जिथे सहज संवाद होऊ शकतो, ज्या ठिकाणी आपल्या मातृभाषेत आपण बोलू शकतो तिथे आपण इंग्लिश बोलण्याचा खोटा अभिमान न मिरवता स्वाभिमानाने आपण आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे.

कारण इथे ना कोणी श्रेष्ठ आहे, ना कोणी कनिष्ठ. इथे सर्व ‘समान’ आहेत...

विराज काटदरे | Viraj Katdare
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी लेख या विभागात लेखन.

२ टिप्पण्या

  1. Matrubhashevar yethe lekh lihinaryanchi mule konatya madhyamachya shalet jatat kinvaa jat hoti hay kalel ka amha marathmolya vachaakana ?
    1. नमस्कार. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मुळात इथे कोणत्याही भाषेचा विरोध करण्यात आलेला नाही. परत एकदा नीट वाचल्यास आपल्याला हे नक्की लक्षात येईल. या लेखातून एवढंच आम्हाला एवढंच सांगायचं आहे की, काळाची गरज जपताना आपण आपलं ‘स्वत्व’ आपली ‘मूळ’ ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आणि तसंही, अविवाहित असल्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही.. :)!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.