आंधळे प्रेम भाग २ - मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा.
मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा
मृण्मयी आपल्या बेडवर एक मऊ पांघरूण अंगावर घेऊन आपले इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असते. अचानक तिचे लक्ष तिने खरेदी केलेल्या गिटारकडे जाते व तिला अमेयची आठवण येते. ती इन्स्टाग्रामवर अमेय देशमुख हे नाव सर्च करते.
अमेय०००३ असा आयडी तिला दिसतो. ती त्या आयडीवर क्लिक करते. पण इन्स्टाग्रामवरची अमेयची पॉलिसी प्रायवेट असते. मृण्मयी फेसबूकवर त्याचे नाव सर्च करते. फेसबूकवर देखील त्याची प्रायवसी पॉलिसी ही प्रायवेट असते. मृण्मयी शेवटी वैतागून लॅपटॉपचे डेस्कटॉप बंद करते व गॅलेरीत येऊन थांबते. तेवढयात तिला समोरच्या मॉलमधून अमेय सारखा एक मुलगा दिसतो. अमेयच असेल म्हणून ती त्याला भेटायला खाली येते.
अमेय सुप्रिम कॉम्पलेक्समधून त्याचा क्लास आटोपून बाहेर पडत असतो. तो त्याची गाडी स्टार्ट करीत असतो तोच त्याला मागून “Excuse me” अशी हाक ऐकू येते. अमेय मागे वळून पाहतो. मागे मृण्मयी उभी असते. ती त्याला एका विशिष्ट स्टाईलने “हाय” असे म्हणते. “अं... तुम्ही इथे कसे?” मृण्मयी अमेयला प्रश्न विचारते. माझा क्लास या सुप्रिम मॉलमध्ये आहे. अमेय मृण्मयीला उत्तर देतो. “ओह ग्रेट! माझे घरही इथेच आहे.” ती अमेयला बोट दाखवून सांगू लागते. “या ना! एक कॉफी होऊन जाऊ दे.” ती अमेयला कॉफीसाठी विचारते. अमेय आपले घड्याळ पाहतो. “अं... आत्ता! आत्ता नको. नेक्स्ट टाईम नक्की कॉफी घेऊया.” अमेय मृण्मयीला हसत सांगतो. यावर मृण्मयीचा चेहरा थोडा उतरतो. मृण्मयी थोडी ड्रामेबाज मुलगी असते. ती ओठ बाहेर काढून अमेयला ‘ओके’ असे म्हणते.
अमेयला तिचा नाराजपणा प्रकर्षाने जाणवतो. अमेय थोडा भावनिक असल्याने तिला म्हणतो की “काय झालं...! नाराज झालात का?” यावर मृण्मयी त्याला म्हणते की “फक्त एक कॉफीच तर घ्यायची होती. त्याकारणाने तुमचे पाय आमच्या घरी पडले असते आणि मला खूप छान कॉफी बनवता येते.” एवढं आग्रहाचे आमंत्रण अमेयला मिळाल्यावर तो मृण्मयीला ‘बरं ठिक आहे, चला’ असे म्हणतो. यावर मृण्मयी खूप आनंदीत होते. मृण्मयीच्या घरी तिचे आई वडील व तिची लहान बहीण तेजा असते. मृण्मयी अमेयला आपल्या घरी घेऊन येते.
मृण्मयीचेही छान टुमदार असे बैठे घर असते. तिच्या घरी तिचे वडील असतात. “बाबा, हे माझे मित्र मिस्टर अमेय देशमुख.” हे नाव ऐकून मृण्मयीचे वडील सोफ्यावरून उठतात. “तुम्ही अनिल देशमुख यांचे चिरंजीव का?” ते अमेयला प्रश्न विचारतात. अमेय ‘हो’ असे म्हणून त्यांना उत्तर देतो व अमेय त्यांच्या पाया पडतो. “अरे वा...! तुमचे वडील पुण्यातील खूप मोठे बिल्डर आहेत.” “आणि बाबा हे देखील खूप चांगले गिटार वादक आहेत.” मृण्मयी सोबतच तिच्या वडिलांना अमेयबद्दल सांगते. “अरे वा! छान, छान.” मृण्मयीचे वडील उत्तरतात. “मग एखादे म्यूझिक ऐकवून दाखवा ना?” तेजा अमेयकडे पाहून बोलते. “इथे आत्ता...!” अमेय तेजाच्या प्रश्नावर व्यक्त होतो. तो आपली बॅग चाचपत “पण गिटार?” असे दबक्या आवाजात बोलत असतो. “हो आहे ना तुम्ही मला दिलेली.” मृण्मयी लगेच बोलते. “मी कॉफी बनवते. तुम्ही म्युझिक ऐकवा.” असे म्हणून मृण्मयी धावत तिच्या बेडरूकडे जाते. सोबत तेजाही तिच्या मागे धावत जाते. तेजा मृण्मयीला विचारते, “दिदी, अं हा तुझा फ्रेंड आहे की बॉयफ्रेंड?” यावर मृण्मयी तिला “तू अजून लहान आहेस. यात पडू नको” असे म्हणून तेजाच्या डोक्यात टपली मारून ती खाली जाते. अमेय सोफ्यावर बसलेला असतो. मृण्मयी त्याच्या हातात गिटार सोपवते व किचनमध्ये कॉफी बनविण्यासाठी जाते. जाता जाता अमेयकडे एका विशिष्ट नजरेने ती पाहात जाते.
अमेय ‘युवराज’ या हिंदी चित्रपटातील “आजा मै पनाहोंपे बिठाके ले चलू तु ही तो मेरी दोस्त है...!” या गाण्याचे संगीत तेथे सर्वांना ऐकवितो. मृण्मयी त्याच्या संगीतावर गुणगुणत कॉफी बनवत असते. मृण्मयी ट्रेमधून सर्वांसाठी कॉफी घेऊन येते. अमेयसाठी खास बदामच्या आकाराचा कप असतो. तो कप मृण्मयी अमेयच्या हातामध्ये देते. अमेय ती कॉफी संपवतो व तिथून सर्वांचा निरोप घेऊन निघतो. मृण्मयी त्याला गेटपर्यंत सोडायला येते. “पुन्हा या हं तुम्ही. तुमची उपस्थिती मला खूप आवडते. आय मिन यू आर सो क्यूट अँड स्विट बॉय.” मृण्मयी च्या वाक्यावर अमेय अलगद स्माईल देतो व तिथून बाहेर पडतो. “अरे अरे अरे, एक मिनिट. इफ यू डोन्ट माईंड तुमचा नंबर मला द्याल का तुम्ही?” मृण्मयी लगबगीने अमेयला विचारते. अमेय तिला आपला नंबर देतो व आपल्या घरी जातो. तो गेल्यावर मृण्मयी ‘येस...!’ असे मोठ्याने ओरडून उडी मारते.
अमेय आपल्या घरी पोहोचतो. तेव्हा अमेयचे डॅड एका मोठ्या प्रोजेक्टवर दोन इंजिनियरांशी बोलत असतात. अमेयही त्यांच्या चर्चेत सहभागी होतो. डिनरच्या टेबलावर अमेयची आई त्याच्या लग्नाचा विषय काढते. “मॉम प्लीज. तू पुन्हा नको सुरू होऊ.” अमेय आपल्या आईला म्हणतो. “अरे, असे कसे. तुझं लग्न करायला नको का?” अमेयची आई त्याला म्हणते. “आणि आता आम्ही तुझा बायोडेटा ही दिला आहे तुझ्या काकांकडे. ते पाहतील तुझ्यासाठी योग्य जोडीदार. हो ना हो.” अमेयची आई अमेयच्या डॅडला कोपराने खुणवून म्हणते. “अमेय, तु लग्नाचा विषय काढला की असा नर्वस का बरं होतो?” अमेयचे डॅड त्याला म्हणतात. “तुझ्या मनात कोणी आहे का?”
क्रमशः
आंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)
- आंधळे प्रेम भाग १
- आंधळे प्रेम भाग २
- आंधळे प्रेम भाग ३
- आंधळे प्रेम भाग ४
- आंधळे प्रेम भाग ५
- आंधळे प्रेम भाग ६
अभिप्राय