शिपी आमटी (कर्जत - राशीन स्पेशल) - पाककृती

शिपी आमटी (कर्जत - राशीन स्पेशल) - [Shipi Aamti] अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि राशिन येथील प्रसिद्ध स्पेशल शिपी आमटी.
शिपी आमटी (कर्जत - राशीन स्पेशल) - पाककृती

शिपी आमटी ही अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि राशिन येथील प्रसिद्ध स्पेशल आमटी

‘शिपी आमटी’साठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी मुगाची व तुरीची डाळ (एकत्र)
 • २ टेबल स्पून धणे
 • ३ - ४ तमालपत्र
 • १ टीस्पून दगड फुल
 • १ बादल फुल किंवा चक्री फुल
 • ३ - ४ काळी वेलची
 • ४ - ५ हिरवी वेलची
 • ५ - ६ छोटे तुकडे दालचिनी
 • ३ - ४ लवंगा
 • १ टीस्पून काळी मिरी (१० - १२)
 • १ टीस्पून शहाजीरे
 • २ मोठे कांदे
 • १२ - १५ लसूण पाकळ्या
 • १ ते २ इंच आलं
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी खोबर्‍याच्या काचऱ्या/अर्धा गोटा
 • तेल
 • अर्धा टी मोहरी
 • अर्धा टी जीरे
 • कडिपत्ता
 • हिंग
 • चवीनुसार मीठ
 • अर्धा टी स्पून हळद
 • २ टीस्पून लाल तिखट
 • ४ ते ५ टीस्पून काळा मसाला किंवा चवीनुसार

‘शिपी आमटी’ची पाककृती


 • सर्वप्रथम डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून पाणी घालून शिजवून घ्याव्यात.
 • आता कांदे फोडून गॅसवर भाजून घ्यावे व त्यानंतर चिरून घ्यावे.
 • कढईत तेल टाकून भाजलेला कांदा परतून घ्यावा.
 • खोबर्‍याच्या काचऱ्या करून तेलात परतून घ्याव्यात.
 • नंतर बाकीचा गरम मसाला परतून घ्यावा.
 • हिरवी मिरची देखील तेलात भाजून घ्यावी.
 • खोबरे जरा जाडसर मिक्सरला फिरवून घ्यावे.
 • त्यातील थोडे जाडसर खोबरे बाजूला काढावे व बाकीचे जे खोबरे आहे त्यात भाजलेला गरम मसाला, भाजलेला कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून थोडेसे पाणी घालून वाटून घ्यावे.
 • एका मोठ्या भांड्यात नेहमीपेक्षा जरा जास्ती तेल घालून घ्यावे. (शिपी आमटीला थोडे जास्ती तेल वापरावे.)
 • तेल गरम झाले की त्यात मोहरी व जीरे घालावे.
 • आता त्यात कडीपत्ता घालावा ते छान तडतडले की त्यात हिंग घालून जो मसाला वाटला होता तो घालून घ्यावा.
 • मसाला चांगला परतून घ्यावा. आता त्यात थोडीशी हळद, लाल तिखट व काळा मसाला घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा.
 • आता त्यात थोडेसे पाणी घालावे व जे जाडसर खोबरे वेगळे ठेवले होते ते घालावे.
 • त्यानंतर त्यात शिजवलेली डाळ घालून घ्यावी. (तुम्ही नुसतीच तुरीची, मुगाची किंवा दोन्ही एकत्र डाळ वापरू शकता.)
 • आता त्यात पाणी घालून तुम्हाला पाहिजे तेवढे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता.
 • शक्यतो शिपी आमटी थोडीशी पातळसर छान लागते.
 • त्यानंतर चवीनुसार मीठ घालून चांगली उकळून द्यावी.
 • शिपी आमटी छान उकळल्यावर कोथिंबीर घालावी व सर्व्ह करावी.
 • शिपी आमटीत पोळी किंवा चपाती कुस्करून जास्त छान लागते.

आमटी वाढण्याची (सर्व्ह करण्याची) खास पद्धत


शिपी आमटी वाढण्याची (सर्व्ह करण्याची) खास पद्धत
शिपी आमटी वाढण्याची (सर्व्ह करण्याची) खास पद्धत
 • एका ताटात जरा जाडसर लाटलेल्या पोळ्या किंवा चपात्या कुस्काराव्यात. (१ किंवा २)
 • आता त्यावर गरमागरम शिपी आमटी व आवडत असल्यास त्यावरचा कट टाकावा.
 • आमटीत पोळ्या चांगल्या कुस्करून घ्याव्यात.
 • सोबत कांदा, लिंबू, कोशिंबीर, खारे शेंगदाणे द्यावेत.
 • शिपी आमटीचा झणझणीत बेत तयार आहे.

- वृषाली काकडे

जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.