आमची पहिली स्पर्धा

आमची पहिली स्पर्धा - जुळ्या मुलींसह आम्ही अनुभवलेली आमची पहिली गणेशोत्सव स्पर्धा.
आमची पहिली स्पर्धा

पुढच्या महिन्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी जशी सुरू झाली, तशी मला दोन वर्षांपूर्वीची आमची पहिली स्पर्धा आठवली...


गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची दोघींची ती पहिलीच वेळ होती. आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता. यापूर्वी तशी संधी आली होती काहीवेळा, पण ह्या दोघी जोपर्यंत स्वतःहून तयार होत नाहीत तोपर्यंत त्यांना ढकलायचं नाही; निदान लहान असेपर्यंत तरी हे ह्या मुलींच्या stage performance बाबतीत मी ठरवलेलं होतं. तसंच यावेळेस श्लोक म्हणून दाखवायची (ठराविक पाठांतराची नाही, generalच अगदी) स्पर्धा होती, म्हणून विचारून पाहिलं दोघींना.गंमत म्हणजे, प्रत्येकवेळी दोघींनी वेगवेगळं उत्तर दिलं. पहिल्यांदा म्हणाल्या, “हो! म्हणू की, फक्त तू हात धरून उभी रहा.” त्यानंतर एकदा, “नाही”, एकदा “हो”, एकदा “मला असलं आवडत नाही”... असं बरंच काय काय सांगून झालं त्यांचं. शेवटी, म्हणजे अगदी कार्यक्रमाला जाताना एकदा शेवटचं म्हणून मी विचारून पाहिलं. तशी एक रडू लागली आणि दुसरीने साफ “म्हणणार नाही” असं सांगितलं. तरी यावेळेस मी दोघींची नावं स्पर्धक म्हणून दिली होती. त्यांचा मूड सोडला, तर तयारीची काही आवश्यकता नव्हती; कारण रोज संध्याकाळच्या शुभंकरोतीला तालीम आपोआपच व्हायची. तरीही मूड बरा असताना एकीने ‘शुभंकरोती’ आणि दुसरीने ‘गणपती तुझे’ म्हणायचं ठरवून घेतलेलं आधीच. नाव पुकारल्यावर ऋषिकाने (माझा एक हात धरून) खणखणीत आवाजात समोर बघत 'शुभंकरोती आणि दिव्या दिव्या' म्हटलं. राधिकाने तिच्या सर्दाळलेल्या आवाजात 'गणपती तुझे' सुरू केलं.

तिचा आवाज नीट यावा म्हणून मी एकसारखा माईक तिच्या तोंडाच्या अगदी जवळ धरत होते, आणि ते न आवडून ती सारखं तोंड दुसरीकडे फिरवायची. त्यामुळे असावं, 'मोरया मोरया' आणि मग 'नेत्री दोन हिरे' म्हणताना एक दोनदा पुढचा शब्द तिला सांगावा लागला. माझा एक हात धरून पूर्ण श्लोक म्हणणाऱ्या ह्या छोटुश्या स्पर्धकांचं सर्वांनाच कौतुक वाटत होतं; किंवा एक आई म्हणून उगाच मला ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यामध्ये भासत असावं! झालं. दोघींचा निर्भीड performance हाच माझ्या विजयाचा मापदंड होता. तरी त्यात भर म्हणजे एकीला, राधिकाला एक बक्षीस मिळालं! मला पहिले आनंद आणि मग लागलीच शंका आली, कारण... अगदी परीक्षण करायचं झालं तर माझ्यासाठी ऋषिकाने जास्त व्यवस्थित म्हटलं होतं आणि परीक्षकांनाही मी मुद्दाम दोघींचं नाव दोनदा सांगितलं होतं, कारण ते दोघींच्या परीक्षणामध्ये घोळ करू शकतील ह्याचा अंदाज मला होता.

तसंही सामान्यतः बक्षीस, ह्या गोष्टीला मुळातच जास्त महत्त्व न देण्याकडे माझा कल असतो. तेच ह्यांच्याबाबतीत करायच्या प्रयत्नात मी होते, पण डोक्यातून काही ते जात नव्हतं. हां, माझ्या डोक्यातला हा किडा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये ही खबरदारी मी घेत होते. त्यात झालं असं, की सर्व स्पर्धकांना आयोजकांनी चॉकलेट्स वाटली. त्यामुळे ह्या दोघींच्या मते तेच त्यांचं बक्षीस होतं.

पुढे उत्सवाचा शेवटचा दिवस होता, त्यादिवशी सर्व स्पर्धांची बक्षीसं वाटली गेली. श्लोक स्पर्धेतील बक्षिसासाठी राधिकाचं नाव घेतलं, तशी मी तिला “जा जा” म्हणून स्टेजवर ढकलू लागले. पण ही काही हलेना. मग विचारल्यावर म्हणाली, “मी एकटी नाही, ऋषिका बरोबरच वर जाणार.” मग काय! ऋषिकालाही पाठवलं तिच्यासोबत! दोघी अश्श्या एकमेकींचे हात धरून चालत चालत वर गेल्या आणि सर्टिफिकेट्स एकत्रपणे हातात घेऊन, हात धरून चालत चालत खाली आल्या!

माझ्या आनंदाबद्दल काय सांगू? पण हा नक्कीच त्यांच्यातला निरागसपणा होता! तो असाच कायम राहणं, हे जेवढं त्यांच्यातील समजूतदारपणा, एकी दाखवतो; तेवढाच भविष्यात त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला मारकही ठरू शकतो. एकमेकींशी स्पर्धा करायला लावण्याचं बीज अजूनपर्यंत तरी आम्ही आईबाबांनी successfully ह्या जुळ्या मुलींच्या डोक्यात रुजू दिलेलं नाही आणि ह्या पुढील प्रवासात त्याचा परिणाम कसा दिसेल, ह्याचीही काहीच ग्वाही आम्ही देऊ शकत नाही. तरीही ह्या प्रचंड स्पर्धात्मक जगात, दोघींना स्वतंत्र नि सक्षम बनवण्याचा प्रयत्न आमच्या परीने आम्ही करत राहू. बाकी सारं, श्रीकृष्णार्पणमस्तु।


प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure
बंगळूर, कर्नाटक (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बिझीनेस मॅनेजमेंट विषयात पदविधर असलेल्या प्रज्ञा यांना लहान मुंलांविषयीच्या लेखनात रस आहे त्यावर त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.