आंधळे प्रेम भाग ३ - मराठी कथा

आंधळे प्रेम भाग ३ - मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा.
आंधळे प्रेम भाग ३ - मराठी कथा

मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा

डॅडच्या या प्रश्नावर अमेयच्या मनात नकळत ती धबधब्यात संपूर्ण भिजून थरथरत असणारी आणि त्यातही चुलबूलीपणाने खोड्या करणारी ‘शिवानी’ ह्या मुलगीचा चेहरा दिसतो. अमेय डिनर आटपून त्या दोघांना काही न बोलता तसाच आपल्या रूममध्ये जातो. ‘याला काय झालं?’ असे अमेयची आई अमेयच्या वडिलांना विचारते. ‘समथिंग वेंट अ राईट अवे’, असे बोलून ते ही डिनर टेबलवरून उठतात. यावर अमेयची आई डोक्याला हात लावून घेते व आपल्या घरच्या नोकराला हाक देऊन बोलावते. अमेय आपल्या बेडरूममध्ये जातो. रात्रीचा ब्रश करून बेडवर लॅपी ठेवून आपले सोशल मिडिया अकाऊंट ओपन करतो व त्यावर ‘शिवानी’ हे नाव सर्च करतो. एक दहा-बारा अकाऊंट्स चेक केल्यावर त्याला त्या शिवानीचे अकाऊंट मिळते.

तिचे पूर्ण नाव शिवानी मधुसूदन पाटील असते व तिने `हायवे' या हिंदी चित्रपटातील `ओ जुगनियो पटाखा गुड्डीयो' या छोट्याशा थीमवर आंबोली येथील धबधब्यातील एक व्हिडीओ बनवलेला असतो. तो व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर अपलोड केलेला असतो. अमेय तो व्हिडोओ पाहतो. त्याला तो खूप आवडतो अमेय त्या व्हिडिओवर एक कमेंट आणि एक इमोजी टॅग देतो व टेबल लँप ऑफ करून झोपी जातो.

इकडे मृण्मयीच्या मनात अमेय विषयी प्रेमाच्या भावनेने जन्म घेतलेला असतो. तशी मृण्मयी ही हुशार मुलगी असते. पुणेस्थित भारती विद्यापीठात ती शास्त्र शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत असते. परंतु तिला अजून एवढी समज आलेली नसते कि तिच्या मनात आलेली भावना ही निव्वळ एक आकर्षण आहे खरे प्रेम नाही. “आज खूप खूष दिसत आहेत मॅडम?” शितलने मृण्मयीला प्रश्न केला. मृण्मयी तोंडातील च्यूंगम बाहेर टाकत शितलला म्हणाली की मग घटनाच तशी घडली आहे तर. त्या दोघीही कॉलेजच्या पोर्चमधून लॅबोरेटरीकडे जात असतात. “काय घडले आहे? मला नाही सांगणार.” शितल मृण्मयीला म्हणाली. “हो सांगते ना!” असे म्हणून मृण्मयीने तिला काल घडलेला सर्व घटनाक्रम सांगून टाकला कि कसे तिने काल अमेयला आपल्या घरी बोलावले, कॉफी दिली व त्याने कसे एक सुंदर संगीताचे वादन तिच्यासाठी केले. आणि कसा तिने त्याचा फोन नंबर घेतला हे सांगत असताना तिचे दोन्ही गाल लाजून लाल झालेले असतात. “अरे वा! इतके सगळे झाले. हुशार आहे पोरगी” शितल मृण्मयीला म्हणाली. “मग आता पुढे काय?” हा प्रश्न ही तिने मृण्मयीला विचारला. “उफ! आता काय सांगू हा अमेय मला खूप आवडतो गं. त्याची पर्सनॅलिटी, हँडसमपणा मला खूप आवडतो.” “मग सांगून टाक ना त्याला.” शितल तिला एकदमच बोलून गेली. यावर आपले दोन्ही गाल फुगवत मृण्मयी “ओके” असे म्हणाली व लॅबोरेटरीमध्ये तिने प्रवेश केला पाठोपाठ शितल तिच्या मागे गेली.

त्यादिवशी सायंकाळी अमेय एका मॉलमधील मुफ्ती या कपड्याच्या शोरूममध्ये आपल्यासाठी बुट व शर्ट - पॅंट आणण्यासाठी आलेला असतो. योगायोगाने त्याच शोरूममध्ये शिवानी देखील शॉपिंगसाठी आलेली असते. अचानक अमेयची नजर तिच्यावर पडते. तो तिच्या जवळ जातो. शिवानी त्याला पाठ करून एक लेगिन्स खरेदी करत असते. तो तिला ‘Excuse me’ असे म्हणतो. शिवानी त्याला मागे वळून पाहते. तो तिला हसत विचारतो, “ओळखला का?” शिवानी गालावरील केस कानाच्या मागे सरकवत “अं... फोटोग्राफर” असे त्याला म्हणते. “तुम्ही इथे कसे?” त्याला विचारते. “मी इथेच राहतो सिंहगड रोडला. पण तुम्ही इथे कश्या?” अमेय शिवानीला प्रश्न विचारतो. “मी ही इथेच पाषाणरोड जवळ राहते. मी मुळची वेंगुर्ल्याची पण इथे आता आज्जीकडे आली आहे.” शिवानी अमेयला उत्तर देते व पुन्हा लेगिन्स काऊंटरकडे वळते.

“ओह ग्रेट!” अमेय आपले घड्याळ पाहात तिला म्हणतो. “इफ यू डोन्ट माईंड कॅन व्ही टेक अ कॉफी?” शिवानी आपल्या हातातील लेगिन्स काऊंटरवर ठेवत एका खट्याळ मुद्रेने अमेयकडे पाहते व त्याला म्हणते की, “सेकंड मिटिंगमध्ये लगेचच कॉफी शॉप.” अमेय आपली नजर चोरत तिला दबक्या आवाजात ‘सॉरी’ असे म्हणतो. यावर शिवानी मोठ्याने हसू लागते आणि त्याला “इट्स ओके. मी जस्ट जोक केला. चला.” असे म्हणून ते दोघेही जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये जातात. कॉफी घेत घेत दोघेही बरेच काही बोलत असतात. अमेय पहिल्यांदाच स्वतः हून कोणत्यातरी मुलीच्या इतक्या क्लोज गेलेला असतो. “मग तिथून पुढे तुम्ही कुठे गेला?” शिवानीने अमेयला प्रश्न विचारला. “गोवा.” अमेय तिला म्हणाला. “बरं आणि तुम्ही?” अमेयने शिवानीला विचारलं. “अं... आम्ही काय गोवा वैगेरे नाही फिरलो बाबा.” कॉफीचा एक घोट घेत शिवानी अमेयला चिडवून बोलू लागली. अमेयने ही तिला हसून दाद दिली.

“आपली अजून ओळख झाली नाही.” अमेय तिला म्हणाला. “हो. माझे नाव शिवानी मधुसूदन पाटील.” अमेयने तिला हस्तांदोलनासाठी हात पुढे करून आपली ओळख सांगितली. दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर देखील घेतले. एकंदरीत ही दुसरी भेट अमेयसाठी खूप सुंदर ठरते. नंतर दोघेही आपआपल्या घरी निघाले. रात्रीच्या डिनरनंतर अमेय लॅपीवर आपले सोशल अकांऊट पाहात असतो. शिवानी ने तिचा एक ट्रिपमधील फोटो सोशल मिडियावर अपलोड केलेला असतो. त्या फोटोमध्ये तिने एक संपूर्ण लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेला असतो व ती एका कारमध्ये बसलेली असते तिच्या भुवया एकदम डार्क व जाड अशा असतात. पांढरा शुभ्र चेहेरा व त्यावरील जाड काळ्या भुवया तिला उठून दिसत असतात आणि त्या पोजमधील तिची एक हलकी सुंदर स्माईल तर खूपच सुरेख दिसत असते. अमेय तर फोटो एकटक लावून पाहात असतो. त्याच्या मनात एक विचार येतो कि आता तसेही घरचे लग्नासाठी घाई करीत आहेत मग शिवानी सारखी सुंदर मुलगी त्यांच्यासाठी सून म्हणून व माझ्यासाठी एक खोडकर बायको किती छान कॉम्बिनेशन होईल हे.

अमेय तिचे बाकीचे फोटोही पाहू लागतो. त्यावरून त्याला समजते की शिवानी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करते. अमेयच्या मनात तिला मॅसेज करू कि नको? असा प्रश्न येतो व तो स्वतः शीच समजूत काढतो की नको इतक्यात नको. उद्या पाहू म्हणून लॅपी बंद करून झोपी जातो.

क्रमशःआंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)इंद्रजित नाझरे | Indrajeet Nazarer
इचलकरंजी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.