आंधळे प्रेम भाग १ - मराठी कथा

मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा म्हणजे इंद्रजित नाझरे यांची मराठी कथा आंधळे प्रेम भाग १.
आंधळे प्रेम भाग १ - मराठी कथा

मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा आंधळे प्रेम

(आंधळे प्रेम भाग १) आज अमेयचे गिटार एक्झिबिशन आहे. अमेय देशमुख हा पुण्यातील एक उच्चपदस्थ बिल्डर अनिल देशमुख यांचा मुलगा. पुण्यातील सिंहगड रोडवर त्यांचा अलिशान बंगला. आज त्याचे तुळशीबागेच्या जवळ असणाऱ्या कुमठेकर कॉप्मलेक्समध्ये गिटार एक्झिबिशन आहे. तो एक उत्तम गिटार वादक. तो गिटार वादनाचे क्लासेस ही घेतो आणि आज त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या पप्पांनी गिटार एक्झिबिशन भरवलेले आहे. तसा अमेय खूप संस्कारी व खूप चांगला मुलगा. सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणारा, श्रीमंतीचा थोडासुद्धा गर्व त्याच्या वागण्या बोलण्यात दिसून येत नसे. “हे बड्डे बॉय, लेट अराईवल?” असे म्हणत अमेयच्या वडिलांनी अमेयचे स्वागत केले. अमेयला पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

अमेय आज थ्रीपीस सूटमध्ये खूप प्रोफेशनल व हॅंडसम दिसत होता. त्याच्या समोर त्याच्या मित्रांनी एक खूप सुंदर दोन थरांचा चॉकलेट केक आणला. अमेयच्या आईने त्याचे औक्षण केले. खूप जल्लोषात त्याचा वाढदिवस सिलिब्रेट होत असतो. केक कट होतो व एक्झिबीशनची लाल फित अमेयच्या हातून कट होते व एक्झिबीशनला सुरूवात होते. एक्झिबीशनमध्ये खूप किंमती अशा गिटार ठेवलेल्या असतात. मंद आवाजात अमेयने गिटार वादन केलेले संगीत सुरू असते. त्या एक्झिबीशनमध्ये एक काळ्या रंगाचा वनपीस परिधान केलेली मुलगी आपल्या एका मैत्रीणीसोबत येते. “वॉव! किती सुंदर गिटार आहेत इथे. पण मी ही गिटार घेऊ कि ही?” हातवारे करून बोलत असताना “Excuse me, मी तुमची मदत करू का?” हे वाक्य त्या दोघींना मागून ऐकू येते. त्या दोघीही मागे वळून पाहतात.

मागे अमेय उभा असतो. तो त्या दोघींच्या जवळ येतो. “हाय, मी अमेय. अमेय देशमुख.” “ओह, तुम्ही अमेय देशमुख का? हॅलो, मी मृण्मयी गोडबोले आणि ही माझी मैत्रीण शितल.” “मी तुमचे confusion दूर करतो. तुम्ही ही गिटार घ्या वादनासाठी आणि मॉडेलही खूप सुरेख आहे हे.” अमेय हातात गिटार घेत मृण्मयी व शितलला सांगतो. “पण मृण्मयीला गिटार थोडीच वाजवता येते ती फोटोसेशनसाठी गिटार घेत आहे.” शितल अचानक बोलून गेली. मृण्मयीने शितलचा हात आपल्या हाताने जोरात दाबला. आऊच..! शितल ओरडली. यावर अमेय हसत बोलला की “इटस् ओके. तुम्ही घ्या ही गिटार.” तेवढयात अमेयला साहीलने हाक दिली. अमेय मृण्मयीच्या हातात गिटार सोपवून साहीलजवळ गेला. मृण्मयी त्याला एका विशिष्ट नजरेने एकटक पाहू लागली. तिला त्याचा प्रोफेशनलपणा खूप आवडला होता. गिटारचे बिल क्रेडिट कार्डने दिल्यावर मृण्मयी व शितल तिथून निघाल्या. एक्झिबीशनही संपले.

दुसऱ्या दिवशी अमेयचे मित्र एका ट्रिपचे आयोजन करतात. गोवा हे लोकेशन ठरते. ठिक सकाळी १०:३० वाजता अमेय व त्याचे तीन मित्र राकेश, आकाश व जय हे सर्वजण मुंबई - पुणे द्रूतगती महामार्गावर जमतात. जिप्सी हे प्रवासी वाहन असते. तिथून पुढे ते मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा या राज्यात जायला निघतात. वाटेत त्यांना आंबोली हे कोल्हापूर जिल्ह्यातील धबधब्याचे ठिकाण लागते. पावसाळ्याचे दिवस असल्याने धबधबा ही खूप मनमोहक पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. राकेश रस्त्याच्या डाव्या बाजूला जिप्सी पार्क करतो. तिथे आधीच एक ट्रिप दाखल झालेली असते. थोडी गर्दीही जमलेली असते. अमेय बाकीच्या मित्रांसोबत धबधब्याच्या ठिकाणी जातो.

अमेय एका स्पॉटवर गिटार हातात घेऊन धबधब्याच्या पाण्यात उभा राहून एक फोटो घेत असतो. तेवढयात त्याला मागून "Excuse me, आम्ही इथे ग्रूप फोटो घेत आहोत. तुम्ही थोडे बाजूला जाऊन फोटो काढता का?” हे वाक्य ऐकू येते. अमेय मागे वळून पाहतो. तर मागे एक चार मुलींचा घोळका उभा असतो. तर एक मुलगी हातात कॅमेरा घेऊन अमेयशी बोलत असते. त्या मुलगीचे सगळे कपडे हे पाण्याने भिजलेले असतात आणि बोलता बोलता ती थंडीने थरथर कापत असते. अमेय थोडा बाजूला होतो. “ए शिवानी, टाईम कॅमेरा ऑन करून तू ही येना फोटोत.” स्वाती नावाची मैत्रीण शिवानीला सांगते. “पण स्टूपिड, इथे कुठे कॅमेरा ठेऊ?” शिवानी स्वातीला उत्तर देते.

अमेय हे त्यांचे बोलणे ऐकत असतो. “ओह excuse me, अं... तुम्ही आमचा ग्रूप फोटो काढता का?” शिवानी अमेयला विचारते व लगेच त्याच्या हातात आपला कॅमेरा देऊन आपल्या ग्रूपकडे धावत जाते. अमेय त्या ग्रूपचा फोटो काढू लागतो. अमेयचे मित्र त्याला ओरडून बोलवत असतात. “अरे थांब ना. हा एक फोटो काढतो.” अमेय त्याच्या मित्रांना सांगतो. “अगं शिवानी, त्याचे हात ही थंडीने कापत आहेत बघ.” स्वाती शिवानीला म्हणते.

आणि खरोखरच अमेयचे हात थंडीने कापत असतात व कॅमेराही थरथरत असतो. शेवटी शिवानी अमेयच्याजवळ जाते. “एक मिनिट, मी तुमची मदत करते.” शिवानी व अमेय एकमेकांच्या खूप जवळ उभे असतात. शिवानी अमेयशी अगदी बिनधास्त होऊन बोलत असते. “तुम्हाला फोटो काढता येत नाही का? कसा कॅमेरा पकडला आहात तुम्ही? ती गिटार थोडी बाजूला ठेवा.” असे म्हणून शिवानी अमेयच्या हातातील गिटार आपल्या हातात घेते व त्याच्या हातात कॅमेरा अगदी व्यवस्थित बसवते. “आता पुन्हा कॅमेरा हलू देऊ नका?” असे म्हणून ती पुन्हा आपल्या ग्रूपमध्ये जाते. “माझी गिटार?” अमेय शिवानीला म्हणतो. “राहू दे ना माझ्याकडे. मी खाणार नाही तिला.” शिवानी अमेयला हसत हसत बोलते.

शिवानी सर्व मुलींच्या ग्रूपमध्ये अमेयची गिटार घेऊन एकदम बिनधास्त पोज मध्ये बसते. अमेय त्यांचे दोन - तीन फोटो काढतो. शेवटी जय वैतागून अमेयजवळ येऊन त्याला म्हणतो कि “ओ फोटोग्राफर, आपल्याला गोव्याला जायचं आहे. चल किती उशीर करत आहेस तू.” “तू चल, मी येतो.” जय पुढे चालू लागतो. अमेय त्या मुलींजवळ जातो. “Excuse me madam.” “शिवानी, माझे नाव. उप्स! माझी रिंग...” असे म्हणून शिवानी तिची रिंग शोधू लागते.

“हा तुमचा कॅमेरा घ्या.” असे म्हणून अमेय शिवानीला तिचा कॅमेरा देतो. “माझी गिटार मला देता का?” “ओह, सॉरी. हे घ्या.” असे म्हणून शिवानी अमेयला त्याची गिटार देते. अमेयला शिवानीचा हा बिनधास्त स्वभाव आवडतो व तो तिथून आपल्या जिप्सिजवळ येतो. “काय यार, तुला सोडून जाणार होतो आता आम्ही. किती वेळ लावलास?” आकाश वैतागून अमेयला म्हणू लागला. “बरं. चल आता आलोय ना. जाऊया!” असे म्हणून ते सर्वजण पुढील प्रवासासाठी निघतात. जाताना अमेय गाडीच्या मिररमध्ये शिवानीला पाहू लागतो. शिवानी धबधब्याच्या पाण्यात खूप चुलबुली व खोडकर पध्दतीने आपल्या मैत्रीणींसोबत डांस करत असते. अमेयला हा तिचा खोडकरपणा खूप आवडतो. गोव्यातील कलंगुट बिच, वास्को, ओल्ड गोवा व पणजी इत्यादी स्पॉट पाहून चार दिवसांनी अमेय व बाकीचे मित्र आपआपल्या घरी परततात.

क्रमशःआंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)इंद्रजित नाझरे | Indrajeet Nazarer
इचलकरंजी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

1 टिप्पणी

  1. Very Nice..
    Interesting Facts and Words, emotions of this story.
    Superb 👌.
    Lovely.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.