मृण्मयी, अमेय व शिवानी या तीन सुखवस्तू तरूणांची एक पूर्ण प्रेमकथा आंधळे प्रेम
आंधळे प्रेम
त्या दिवशी अमेय खूप खूष असतो व या आनंदात तो क्लासला दोन दिवसांची सुटी जाहीर करतो. अमेयचा तो शनिवारचा दिवस उद्याचे नियोजन लावण्यात जातो. रविवारचा दिवस उजाडतो. अमेय आज छान आवरून परफ्युम वैगेरे वापरून एक कुल बॉय होऊन शिवानीच्या मेसेजची वाट पाहू लागतो. तेवढयात त्याला शिवानी मेसेजसोबत एक लोकेशन पाठविते. त्या लोकेशनवर जाऊन अमेय तिला पिकअप करतो व ते दोघेही महाबळेश्वरला जायला निघतात. आज शिवानीचीही खूप सुंदर वेशभूषा असते. तिने आज पारंपारिक आईस्क्रिम रंगाचा पंजाबी ड्रेस, त्याला साजेशी केशरचना यामध्ये जणू ती एक अप्सराच दिसत असते. अमेय वातावरणाला साजेस एक गाणं सुरू करतो.
सुरूवातीला दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. अमेय म्हणतो की महाबळेश्वरला गेल्यावरच तो विषय काढू. शिवानी मात्र वेगवेगळ्या अँगलने स्वतः चा सेल्फी घेत असते. दोन तासांचे ड्रायव्हिंग पूर्ण करून अमेय व शिवानी महाबळेश्वरच्या एका व्हिजिट स्थळावर येऊन थांबतात. अमेय गाडीतून खाली उतरतो. शिवानीही खाली उतरते. चारी बाजूला खूपच सुंदर वातावरण तयार झालेले असते. आजूबाजूला धुके आणि थंड असे वातावरण तयार झालेले असते. “बोला मिस्टर फोटोग्राफर, तुम्ही एका मुलीला लॉंग ड्राईव्हवर आणलेले आहे.” शिवानी अमेयला म्हणते. यावर अमेय खुदकन हसून जातो. शिवानी स्वतः च्या चेहऱ्यावर प्रश्नांकीत भाव आणते. आता अमेय क्षणाचाही विलंब न लावता. शिवानीसमोर एक रिंग आणि गुलाबाचे फूल बाहेर काढतो आणि तिला “विल यू मॅरी मी?” असे विचारतो. यावर शिवानीला खूप हसू येते. ती आपला एक हात तोंडावर ठेऊन हसू आवरू लागते.
लाईफ पार्टनर
“मी उत्तर देते तुला पण तु माझ्यामध्ये असे काय पाहिलंस कि मी तुला लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे?” असा प्रश्न शिवानी अमेयला विचारते. यावर अमेय तिला म्हणतो की “तुझे हे मनमोकळेपणाने बोलणे, बिनधास्त वागणे आणि तुझी सुंदरता मला खूप आवडली.” “पण दिसते तसे नसते. मी याहून जरी वेगळी असेल तर...?” शिवानी अमेयला म्हणते. “जर मी तुझा अपेक्षा भंग केला तर?” असा प्रश्न ती त्याला विचारते. यावर अमेय एकच वाक्य तिला बोलतो की, “माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे की तू मला कधीच निराश करणार नाहीस.” एखादा श्रीमंत देखणा मुलगा आपल्यावर इतका विश्वास आणि एवढे प्रेम दाखवत आहे हे पाहून शिवानी इंम्प्रेस होते आणि त्याचे प्रेम स्विकारते. ते दोघेही महाबळेश्वरमध्ये फुल एंजॉय करून स्वतःच्या घरी परततात. दोघेही खूप खूष असतात. दोघांचे प्रेम फुलत जाते. दोघेही एकमेकांचा आदर ठेवू लागतात दोघेही एकमेकांना पुरेसा वेळही देऊ लागतात. एकंदरीत दोघेही स्वतः सोबत खूप खुश रहात असतात.
एके दिवशी मृण्मयी सायंकाळच्या बॅचला येते. लॉंग रिदम पूर्ण करून ती बाहेर पडते. तेवढयात पाऊसही सुरू होतो. मृण्मयी बेसमेंटमध्ये उभी राहते. अमेय गाडी घेऊन तिच्याजवळ येतो. तिला लिफ्टसाठी विचारतो. मृण्मयी हसून गाडीत बसते. जोरात पाऊस सुरू असतो. मृण्मयीचे घर येते. ती गाडीतून खाली उतरते व अमेयच्या गाडीत मुद्दाम आपली गिटार विसरते. अमेयला माहीत नसते. तो गाडी आपल्या घराच्या दिशेने घेतो. रात्री अमेय शॉवर घेऊन आपले केस पुसत असताना त्याला एक अनोळखी नंबरवरून फोन येतो. अमेय तो फोन घेतो. “हॅलो सर, मी मृण्मयी बोलतेय.” “हां, बोला. इतक्या रात्री कसा फोन केला?” अमेय मृण्मयीला विचारतो. “सर माझी गिटार तुमच्या गाडीत राहिली आहे. प्लीज मला आता मिळेल का ती?” मृण्मयी अमेयला म्हणते. अमेय घड्याळ पाहतो व मृण्मयीला म्हणतो की “आता इतक्या रात्री?” “सर या ना घेऊन प्लीज. मी घराबाहेरही पडलेली आहे.” यावर अमेय तिला “ठीक आहे” असे म्हणतो व आवरून गाडी बंगल्याच्या बाहेर काढतो.
काय बोलायचे आहे?
थोड्या वेळात तो तिच्या घराबाहेर पोहोचतो. मृण्मयी तिथे उभी असते. ती आता येताना ही अगदी छान आवरून आलेली असते. अमेय गाडीतून उतरतो. गिटार बाहेर काढतो व मृण्मयीच्या हातात गिटार सोपवतो. अमेय तिथून जाणार असतो तेवढ्यात मृण्मयी त्याच्या पुढे येऊन थांबते. अमेय तिला पाहून दचकतो. “सर एक मिनिट. मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.” यावर अमेय तिला “काय बोलायचे आहे?” असे विचारतो. अमेयला थोडी पुसटशी कल्पना येते की मृण्मयीच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळे आहे. तो तेव्हाच स्वतः ला सावरतो व घरातून आईचा फोन आला आहे हे सांगून तिथून लगेचच काढता पाय घेतो. मृण्मयी त्याला थांबविण्याचा प्रयत्न करते पण अमेय तिथून निघून जातो.
क्रमशः
आंधळे प्रेम - मराठी कथा (कथेचे सर्व भाग)
- आंधळे प्रेम भाग १
- आंधळे प्रेम भाग २
- आंधळे प्रेम भाग ३
- आंधळे प्रेम भाग ४
- आंधळे प्रेम भाग ५
- आंधळे प्रेम भाग ६