मी मंदिरात नाही - मराठी कविता

मी मंदिरात नाही मराठी कविता - तुम्ही मला मंदिरात भेटायला येऊ नका कारण मी मंदिरात नाही.
मी मंदिरात नाही - मराठी कविता

मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी...

माझ्या अभिषेकाला दूध तुप
मध आणू नका
ते द्यायचेच असेल तर गरीब वस्तीतल्या एखाद्या कुपोषित तान्हुल्याला द्या
मी तिथेच भेटेन तुम्हाला
तुम्ही मला मंदिरात भेटायला येऊ नका
...कारण मी मंदिरात नाही

तुम्हाला मला नैवेद्य द्यायचा असेल तर जरूर द्या
पण मंदिरात नाही
एखाद्या दिनवाण्या भुकेल्याला पोट भरून खाऊ घाला
मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी
...कारण मी मंदिरात नाही

तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर जरूर करा
मी आहे अनाथ आणि दिन दुबळ्यामध्ये
मी तुम्हाला तिथेच भेटेन
...कारण मी मंदिरात नाही

मला कुठलेही वस्त्र देऊ नका
त्या वस्त्राचा वापर एखाद्या माझ्या उघड्या वस्त्रहीन मुलाला द्या
मी तिथेच भेटेन तुम्हाला
कारण मी कुठल्याही मंदिरात नाही

दिव्यांचा झगमट नक्कीच करा
पण मंदिरात नाही
मी आहे अंधकारात जगत असलेल्या माझ्या अंध मुलांमध्ये
त्यांच्या आयुष्याला प्रकाश द्या
मी आहे तिथे तुम्हाला दुवा द्यायला
...कारण मी मंदिरात नाही

मला भेटायला नक्की या
पण पानं फुल घेऊन नको
मुक्या प्राण्यांना एक पेंडी चारा घेऊन या
तेव्हा माझे दर्शन होईल तुम्हाला
...कारण मी मंदिरात नाही

मला नमस्कार करायचा असेल तर नक्की करा
मी आहे तुमच्या कुटुंबातल्या वरिष्ठांमध्ये
त्या आई वडिलांना नमस्कार करा
मी तिथेच भेटेन तुम्हाला
...कारण मी मंदिरात नसतोच कधीही!

- अमरश्री वाघ

1 टिप्पणी

  1. खूप छान
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.