हिंसा आणि अहिंसा - कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही पैकी कुठल्याही प्रकारे कोणाच्या मनाविरुद्ध केलेली त्रासदायक गोष्ट म्हणजे हिंसा.
इतरांना त्रास न देता आपले आयुष्य जगणे म्हणजे अहिंसा
कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही पैकी कुठल्याही प्रकारे कोणाच्या मनाविरुद्ध केलेली त्रासदायक गोष्ट म्हणजे ‘हिंसा’ आणि इतरांना त्रास न देता आपले आयुष्य जगणे म्हणजे ‘अहिंसा’. असे मला वाटते. यात सुदैवाने आपल्या देशात प्राणी आणि वनस्पतींना देखील समाविष्ट केले आहे. त्यावर अवलंब कितपत होतो ही वेगळी गोष्ट परंतु वेगवेगळ्या निमित्ताने त्याचे पालन लोक उत्सवांच्या रूपात करतात.
आजकाल बऱ्याच वेळा ‘हिंसा’ आणि ‘अहिंसा’ याविषयी अनेक मतभेद ऐकू येतात. परंतु चार मित्रांमधे वादात जिंकण्यासाठी केलेला युक्तिवाद खरेच योग्य आहे का? अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे तत्वज्ञानी कधी मोडकळीस आलेल्या देशात राहून तेथील हिंसक लोकांना बदलवून आले आहेत का? किमान आपल्या सोसायटीला लोकांना तरी अहिंसावादी केले आहे का? म्हणजे अहिंसेचे खरेखुरे उदाहरण दाखवायला असेल. मग आपल्या आसपास असणारे तत्वचिंतक अहिंसेविषयी कसे काय बोलू शकतात? बुद्धांनी देखील स्वसंरक्षण करण्यास परवानगी निश्चितच दिली असेल. मग अहिंसेचे आपल्याकडे एवढे स्तोम का? याला अहिंसा म्हणावे की समोरच्याचा बुद्धिभेद आणि पुरुषार्थाचे खच्चीकरण? तिबेट, चीन, आणि अफगाणिस्तानातील समृद्ध गौतम बुद्धांचा वारसा कसा संपविला गेला? आजही ठिकठिकाणच्या कलाकृतींबाबत तेच होत आहे. जग खरंच अहिंसेवर चालते की निसर्गनियमानुसार चालते? अशा वेळेस छत्रपतींचा, राणा प्रतापाचा, लचित बोरफुकन यांच्या मार्गाविषयी आपणास काय वाटते? बुद्ध जन्माला येण्यासाठी त्यांची कदर असणारा समाज तयार करणे आपले कर्तव्य नाही का? आणि त्याकरिता अहिंसेसोबत स्वसंरंक्षणही तितकेच गरजेचे नाही का? अनेक हिंदू , जैन बौद्ध लेणी व मंदिरे या देशात आणि आसपासच्या देशांत बनवली गेली. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, किर्गिझस्तान आणि पाकिस्तान येथील वारसा हळू हळू संपविला गेला. बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या काळातील सर्वोच्च उन्नती असलेला धम्माचा मार्ग आक्रमकांना तोंड का देऊ शकला नाही? उन्नत समाजासाठी साधू, भिक्कू जसे हवेत तसेच शेतकरी, सैनिक, समर्थ राजा असणे हि देखील गरज नक्कीच आहे. पोट भरल्यावर हिंस्त्र पशु देखील दुसऱ्याला मारीत नाही परंतु असंस्कृत लोक मात्र कवट्यांचे ढिगारे रचतात.
बुद्धांच्या काळात प्रश्न वेगळे होते. स्थळ, काळ आणि संस्कृती मुळे लोक देखील सुसंकृत होते. आज इतके शिकून देखील लोक हिंसक बनतात. हिंसेचे पाठराखण करतात. मग अशा वेळेस समाज, देश रक्षणासाठी अर्जुनासारखे किंकर्तव्यमूढ बनून धनुष्य टाकून द्यावे? का भगवान कृष्णाचा उपदेश स्वीकारून दुष्ट असेल तर त्या भावाचा देखील संहार करावा?
अहिंसेविषयी बोलणारे लोक नेहमी श्रीमंत असतात आणि हिंसेचे समर्थन करणारे देखील. त्यात होरपळून जाणारा समाज मात्र नेहमी मेंढ्यांसारखा असतो. वरील श्रीमंत लोकांना पळून जाण्यासाठी विमाने आणि परदेश असतो. आपले काय? जेव्हा केव्हा युद्ध होते ते दोन राजांमध्ये होते . त्यात भाग घेणारे सैनिक हे पूर्णपणे मानसिकरीत्या कुठल्यातरी धर्माच्या भावनेने मेंदू काबीज केलेले असतात. धर्माच्या नावाखाली अधर्म फैलावतो. अत्याचार, बलात्कार आणि निसर्गाचा नाश केला जातो. हुतात्म्यांचा गौरव केला जातो . म्हणजे अजून लोक मरणासाठी तयार होतात. अहिंसेचा बोलबाला करवून घेणारे देशातील प्रजेला निष्क्रिय आणि गाफील ठेवतात. अति अहिंसा हि देखील एक प्रकारची विकृतीच होय. स्वसंरक्षण करणे हे छोटा पक्षी देखील जाणतो. या दोंन्ही टोकांच्या गोष्टीत स्वतःचा मेंदू गहाण टाकणारे लोक मात्र स्वतःचे स्वातंत्र्य गमावतात पर्यायाने देश आणि संस्कृतीदेखील. म्हणूनच म्हणतात दागिना बनविण्यासाठी सोन्यात देखील भेसळ करावी लागते. निकोप समाज बनण्यासाठी पाठीचा कणा ताठ असावा आणि भविष्यावर नजर ठेवताना इतिहास विसरू नये असे वाटते. कारण जर आपण स्वतःचा भूतकाळ विसरलो तर तेच लोक आपल्याला पुनःपुनः फसवितात . मग जर आपण गावाचा, राज्याचा आणि देशाचा भूतकाळ विसरलो तर खरेच पुढची पिढी या देशाला चांगले दिवस दाखवू शकेल का? सत्य मान्य करताना आपली जात, धर्म आणि कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील याचा विचार का करावा? सत्य हे जर सत्य असेल तर त्याची एवढी भीती का? कदाचित कोणाचा तरी स्वार्थ त्यात दडलेला असतो.
स्वतःचे मत असणे आणि अनुभव यात बराच फरक असतो. त्याकरिता फिरणे आणि लोकांशी संवाद साधने आले. आभासी दुनियेत जागृती आणि त्याहूनही अधिक विकृती निर्माण होण्याचीच शक्यता जास्त.
कदाचित मी चुकीचा असू शकतो परंतु तुमची उत्तर शोधण्यात मदत हवी आहे. कारण पुढील पिढीला नक्की आपण काय शिकवावे जेव्हा आपण स्वतःच उत्तर शोधत असतो? प्रत्येक काळात प्रश्न, संस्कृती, गरज आणि जागतिक गणिते बदलत असतात. छत्रपती किंवा बुद्धांसारखे थोर व्यक्तिमत्व जर परत आले तर ते निश्चितच तत्वज्ञान्यांसारखे हट्टी न राहता नवे डाव आणि नवे नियम निश्चित तयार करतील. आतला दिवा जागा ठेवावा आणि डोळसपणे जग आहे तसे पाहून जशास तसा व्यवहार करावा. यावेळी मला मराठी मातीतील जगद्गुरू तुकाराम महाराजांचा रोखठोक अभंग योग्य वाटतो.
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जीत असों निजोनियां जागे ।
जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥२॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी ।
नाठयाळा चे कांठी देऊं माथां ॥३॥
- तुकाराम
अभिप्राय