बेरोजगारी ही मानवनिर्मित भीषण समस्या राष्ट्रप्रगतीला विघातक ठरत आहे
(बेरोजगारी एक भीषण समस्या?) भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तराहून अधिक वर्षे झाली. भारतीयांनी विविध क्षेत्रात प्रगती केली. या काळात आपल्या भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक समस्यांना भारत एकजुटीने सामोरा गेला आणि कठीण परिस्थितीवर त्याने मात केली. पण मानवनिर्मित समस्या मात्र राष्ट्रप्रगतीला विघातक ठरत आहेत. त्यापैकी एक भीषण समस्या म्हणजे बेरोजगारी.
आज भारतात कोट्यावधी माणसे सुशिक्षित - अशिक्षित, कुशल - अकुशल कारागीर, स्त्री - पुरुष बेकार आहेत. उद्योग, नोकरीधंदा करण्याची इच्छा असूनही त्यांच्या पदरी निराशा येते. एके काळी असा समाज होता की, शिक्षण घेतले तर आपल्याला नोकरी मिळत होती. आज काय दिसते? लक्षावधी सुशिक्षित, पदवीधर बेकार आहेत का? याचे उत्तर सतत वाढत जाणारी आपली अफाट लोकसंख्या हे आहे.
स्वातंत्रोत्तर काळात शिकणार्यांचे प्रमाण वाढले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला नोकरी मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण सुशिक्षितांच्या तुलनेत नोकर्यांची संख्या सतत वाढत आहे. अशा या भीषण अवस्थेत बेकार तरुण बेभान होतो. रिकामे डोके सैतानाचे घर असते. या उक्तीनुसार, या बेकारांतून गुन्हेगार निर्माण होत असतो. अलीकडे तर असे लक्षात आले की, सीमेवरच्या दहशतवाद्यांमध्ये आणि शहरातील टॊळी युद्धात हे बेकार तरुण सामील होतात. यालाही बेरोजकारीच कारणीभूत आहे.
ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काममिळत नसेल तर अशा स्थितीला सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. ही बेकारी दहावी, बारावी पास झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते.
नोकरी-योग्य शिक्षणासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व उच्च शिक्षणासाठी आकारण्यात येणार्या भरमसाठ शुल्कामुळे योग्य शिक्षण घेणे प्रत्येकालाच शक्य नाही.
तांत्रिक बेरोजगारी
उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेरोजगारी निर्माण होते त्या बेरोजगारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन उपादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरुन कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेरोजगारी निर्माण होते.
चक्रीय बेरोजगारी
तेजीच्या अवस्थेनंतर येणार्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणार्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. मंदीच्या काळात प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक क्रिया मंदावतात त्यामुळे उद्योगांचे मालक उत्पादन कमी करतात. परिणामी कामगारांना कामावरुन कमी केले जाते.
सरकारी उपाययोजना
बेरोजगारी मिटविण्यासाठी शासनाची रोजगार हमी योजना, धान्य वितरण योजना किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांचा लाभ सध्यातरी सर्वच गरीब कुटुंबियांना पुर्णतः मिळतो असं दिसत नाही. अशा या शासकीय सुविधांचा लाभ जर गरीब कुटुंबियांना मिळाला तर नक्कीच परिस्थिती सुधारु शकेल पण प्रत्यक्ष मात्र लाभार्थींऐवजी इतर लोकच या योजनांचा लाभ घेतात. तसेच काही वेळा या योजना गरिबांपर्यंत पोहचू न शकल्यामुळे त्यांना या सर्व सुविधांचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी सरकारनेही नक्कीच काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत आणि या योजनांची माहिती गरिबापर्यंत पोहचवली पाहिजे. तरच या वाढत्या बेरोजगारांच्या संख्येला आळा बसेल. तसेच या बेरोजगारांच्या आत्महत्येची संख्या कमी होईल.
चला निर्धाराने लढूया, बेकारीला घालवू या!
- उमेश कानतोडे