आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने डॉ. मंजूषा कुलकर्णी यांची मराठी कविता
एकदा स्त्री होऊनी बघ
ईश्वराची ती कला
ती अशी अनुपम कृती जी
जननी होते सकला
ती गुणांची खाण मोठी
दडली रत्ने अगणित
प्रेम निस्सीम ते तिचे
पारख तिजला सहजीच
आई ती, दे जन्म तनुला
पोसते निज पायसे
ती असे जर जवळी आपुल्या
देवही संगत असे
तिच भगिनी तिच सखीही
तिच नाती पारखी
तिच नांदे प्रेमवत्सल
तिच प्रेरक सारखी
त्या तिच्या प्रेमास नाही
तोड जगती कोणती
सारे सारे निभवूनीही
श्रेय ना तिज, कोण ती?
ती आहे तर काळजीचे
नाही कारण कोणते
ती आहे तर प्रेम नित्य
कोण तिजला जाणते?
स्फूर्ती ती वात्सल्यमूर्ती
तिच साथ नि संगती
तिच शक्ती तिच भक्ती
युक्ती मुक्ती तिच ती
काय हवे तिज प्रेम केवळ
स्नेहवश असते सदा
आदराची भूक तिजला
सन्मानाची संपदा
जीवनाला रंग देते
जीवनाचे अंग ती
जीवनाच्या संगी असता
जीवनी आनंद ती
ती कुणी ना देहधारी
तत्त्व असते स्त्री पुन्हा
प्रकृती ती संस्कृती ती
मंत्र माया ती पुन्हा
दुर्दम्य इच्छा, विमल स्वच्छा
पारदर्शी दर्पण
तिच त्यागी, अनुरागी
तिच तेज, समर्पण
मार्ग दावी ती सुयोग्य
तिच सुंदर शांभवी
तिच धनदा तीच वरदा
ज्ञानदा ती जान्हवी
त्राण आहे तिच सारे
प्राण असते ती खरी
आण आहे मान आहे
जाण पाहे तिज खरी
ती आहे तर घर आहे
मंदिरातही तिच ती
ती आहे तर सुख आहे
यश कीर्ती तिच ती
स्वामिनी ती दामिनी ती
यामिनी मनभाविनी
मोहिनी ती रागिणी ती
मानिनी अनभाविनी
दे तिला प्रेमळ शब्द
प्रेम निखळही तेवढे
मन होऊ दे विशाल
असते तिचे ते जेवढे
ऋण तिचे ना न्यून होते
जन्मोजन्मी राहते
तिच भोवती अन सभोवती
तिच प्रेमे पाहते
त्या तिच्या ऋणबंधनातच
राहू आपण नित्यही
ते तिला सुख देऊ सारे
तत्त्व स्त्री हे सत्यही
- डॉ. मंजुषा कुलकर्णी