दिनकरा - मराठी कविता

दिनकरा,मराठी कविता - [Dinkara,Marathi Kavita] आभाळातल्या रंगपंचमीवरची प्रज्ञा वझे-घारपुरे यांची मराठी कविता.
दिनकरा - मराठी कविता | Dinkara - Marathi Kavita

आभाळातल्या रंगपंचमीवरची प्रज्ञा वझे-घारपुरे यांची मराठी कविता


आभाळात दिसणारे रंग वाचत राहाणे हा जूनाच छंद. अनेकदा आभाळाकडे निर्विकार बघत राहिल्याने बरं वाटतं, अनेकांसारखाच आपणही अजून एक असा क्षुद्र जीव असलो तरीही, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे, या भावनेनेही असावं कदाचित ते बरं वाटणं...तू असाच रंग सांडत रहा,
मी अशीच ते वाचत राहीन

तुझी भाषा ढिम्म कळत नाही,
तरी मी तिचे अर्थ लावत राहीन

तुझी चालू दे रंग-सप्तमी
मी प्रयत्नांची शर्थ करीन

नाहीच जमलं तर अगम्य म्हणून
चल, देवत्व बहाल करीन

शेवटी हे नातं आपलं
एकमेकांना आधाराचं

तुला, माझ्या डोळ्यांचं
नि मला, तुझ्या असण्याचं

या शून्य अवकाशातही
जो भरून राहिला रितेपणा

तो मांडून धुळवड रंगांची
तू भगवा पांघरून उभा


प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure
बंगळूर, कर्नाटक (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बिझीनेस मॅनेजमेंट विषयात पदविधर असलेल्या प्रज्ञा यांना लहान मुंलांविषयीच्या लेखनात रस आहे त्यावर त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.