देताना कधीच नी कसलाच,विचार केला नाही, तर, मग परतफेडीत प्रेमाचा हक्क, का सोडता आला नाही!?
देताना कधीच नी कसलाच
विचार केला नाही, तर
मग परतफेडीत प्रेमाचा हक्क
का सोडता आला नाही!?
त्यांचं असो वा नसो,
प्रेमात फरक का तो पडावा?
दाणा पाण्यासाठी बसणाऱ्या पाखरावर
कुणी हक्क तरी कसा सांगावा?
येतात ती भुकेसाठी,
जातात नवी तहान घेऊन
एक भागली, तर पुढची लगेच
बोलावू लागते आशा उमलवून
त्यांची आस पहावी,
की आपली ऊतू द्यावी?
अखंड ओतणाऱ्या धरणी मायेनं
का माझी कीव करावी?
माया मुळी अशीच खाशी,
सोबत मोफत येणारी!
न मागता, न ठरवता,
जिथे तिथे उचंबळणारी!
कसा घालावा बांध तिला
कुठवरचा काळ ठरवावा
खळखळणाऱ्या निर्झराला
कालव्यांनी का थांबवावा!?
बोल की गं माये
ही माया कशी मोजू?
तुला पाहुन शिकत नाही
कसं हे वेडं कोकरू?