मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या

मातीची लेकरं आणि त्यांच्या काळ्या आईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम.
मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या | Marathwada Vishesh - Vel Amavasya
छायाचित्र: सायली कुलकर्णी

वेळामासाची सुट्टी

उस्मानाबादेत MD करायला लागून महिनाच झाला असेल. कुणीतरी OPD मध्ये सांगत आलं ‘वेळामासाची सुट्टीये उद्या’... बर्‍याच दिवसांनी सुट्टी मिळत असल्यानं जरा बरं वाटलं. पण सुट्टी कशाची आणि तो वेगवेगळ्या पध्दतीनं उच्चारला जाणारा ‘येळमास - येळवस - वेळमासा -येळामॉसा’ हे म्हणजे काय मला नक्की कळालं नव्हतं. नंतर ‘वेळ अमावस्या’ या सणाबद्दल समजलं.

कालच हा सण होता आणि त्या निमित्ताने गेल्यावर्षीच्या वेळामासाची आठवण झाली. उस्मानाबादला राहून वेळ अमावस्येला मेसवर जेवणं म्हणजे गुन्हाच! पेशंट, स्थानिक विद्यार्थी, महाविद्यालयाचे कर्मचारी आवर्जून निमंत्रण देत. पण दरवर्षी या ना त्या कारणाने वनभोजनाला जाणं जमलं नव्हतं. गेल्यावर्षीही MD च्या अंतिम वर्षाची प्रात्यक्षिक परीक्षा चार दिवसांवर आली होती. आमच्या तिथल्याच एका मैत्रीणीचा वेळामावस्येसाठी निमंत्रणाचा फोन आला. हा सण अनुभवायचा होता म्हणून आम्ही लगेच तिच्या शेतात जाऊन पोहचलो... आणि तो दिवस फार आनंदात गेला.

मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या | Marathwada Vishesh - Vel Amavasya
आंबिल, बाजरीचे उंडे आणि इतर पदार्थांची मेजवानी

हा सण कुठे साजरा केला जातो

मूळ कर्नाटकातला असणारा वेळ अमावस्या हा सण मराठवाड्यात आणि मुख्यत्वे लातूर - उस्मानाबादला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कानडी ‘येळ्ळ अमावस्या’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘वेळ अमावस्या’ शब्द रुढ झाला. ‘येळ्ळ’ म्हणजे सात. पेरणीनंतर येणारी ही सातवी अमावस्या... मार्गशीर्ष किंवा दर्श अमावस्या. काळ्या आईप्रती आपलं ऋण व्यक्त करणं हा या सणाचा उद्देश. या दिवशी जिल्हाधिकारी घोषित स्थानिक सुट्टी असते. पुण्या - मुंबईला नोकरी निमित्ताने आलेले लोकांचे लोंढे दिवाळीलाही जात नसतील इतक्या संख्येने वेळामावस्येला गावी जातात आणि गावात अघोषित संचारबंदी असावी अशी शांतता! सगळं बंद ठेवून लोक सकाळी लवकरच शेतात जातात.

मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या | Marathwada Vishesh - Vel Amavasya
रानमेवा

हा सण कसा साजरा करतात

वेळ अमावस्येला शेतात स्वयंपाक करुन शेतातच जेवण्याची प्रथा आहे. हल्ली स्वयंपाक घरी करुन शेतात घेऊन जातात. शेत नसणारे, सगे-सोयरे, पाहूणे यांना जेवणाची आमंत्रणं दिली जातात. झाडाखाली कडब्याची कोप करुन त्यात लक्ष्मीची पूजा केली जाते. या कोपेवर एक वस्त्र गुंडाळतात. पिकाच्या लोंब्या आणि खडे रंगवून पांडवांची पूजा मांडतात. फळांची आरास केली जाते. काळ्या आईची ओटी भरली जाते. एव्हाना ज्वारीच्या कणसात दाणे भरत आलेले असतात. ही धरणी मातेची लेकरं!... आणि म्हणून तिच्या डोहाळजेवणाचाच हा कार्यक्रम!


ग्राम देवतेला नैवेद्य दाखवून आंबिलाने भरलेला माठ शेतात आणतात. ज्वारीच्या पातीनं ते शेतात शिंपडतात. “हुलगे हुलगे - पावन पुलगे”, “होलग्या-होलग्या सालन पलग्या” अशा आरोळ्यांनी शिवारं दूमदूमून जातात. आंबिलाचा आणि वेगवेगळ्या पदार्थांचा नैवद्य दाखवला जातो. यामध्ये चवदार भज्जी (भजी नव्हे), गरमागरम बाजरीचे उंडे, ज्वारीची कडक भाकरी, सोलापूरी शेंगा चटणी, गव्हाची खीर, मसालेदार भरलेलं वांगं, खुसखुशीत गुळाची पोळी, पीठ पेरलेली मेथी, झणझणीत ठेचा असा फक्कड बेत असतो आणि हे सगळं पचवायला मानाचा पदार्थ - ‘ज्वारीचं आंबिल!’ ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून आलं-लसूण घातलेली तृप्त करणारी आंबिल म्हणजे अमृतानुभवच!

मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या | Marathwada Vishesh - Vel Amavasya
सहकार्‍यांसह सहभोजन

गावकरी मंडळी दिवसभर शेतातच थांबतात. येणार्‍या - जाणार्‍यांना आग्रहाने जेवायला बोलावतात. मग आग्रहाखातर किमान आंबिल तरी घ्यावीच लागते. या सणाला शुभेच्छा देत नाहीत... ‘आमच्याकडं भज्जी/आंबिल/ उंडेखायला येतावं ना?!’ याच शुभेच्छा! बरं तसं आमंत्रणाचीही गरज नसते. जात-धर्म विसरुन, ओळख-पाळख नसताना कुणीही कुणाच्याही शेतावर जाऊन जेवू शकतं! असं म्हणतात की या दिवशी कुणीही उपाशी जात नाही आणि केलेला स्वयंपाक कमीही पडत नाही!

दुपारी झाडाखाली वामकुक्षी घ्यायची. दिवसभर गप्पा, खेळ, उखाणे, गाणी आणि सोबतीला घाटं (हरभरे), बोरं, गाजरं, चिंचा, पेरु, शेंगा, ऊस यांवर ताव मारायचा. दिवस कसा जातो कळतही नाही. संध्याकाळी शेणाच्या गोवरीवर लहान सुगड्यात दूध उतू घालवतात. शेताभोवती टेंभा फिरवला जातो. ‘दुष्ट शक्तीचा नाश होऊन लक्ष्मी नांदो’ अशी प्रार्थना करुन गावकरी घराकडे परतात.

मराठवाडा विशेष - वेळ अमावस्या | Marathwada Vishesh - Vel Amavasya
पांडव पूजन, वेळ अमावस्या विशेष आंबिल, नवीन अंकुर

कडाक्याच्या थंडीत आपुलकीची ऊब देणारा हा मराठवाड्यातला सण कायम स्मरणात राहील!

प्रथम प्रकाशित:
१३ जानेवारी २०२१

सभासद, मराठीमाती डॉट कॉम

मराठी लेख आणि अनुभव कथन या विभागात लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.