डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मातीतले कोहिनूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - [Dr. Babasaheb Ambedkar] मोठे तत्वज्ञ,विद्वान,शिक्षणतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अवघ्या जगाला माहीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मातीतले कोहिनूर | Dr. Babasaheb Ambedkar - People

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताचे फार मोठे तत्वज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ञ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ञ होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू अवघ्या जगाला माहीत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ञ होतेच, त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत. तसेच सर्वांना ज्ञात आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग जो त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा. मात्र त्याबद्दल फार थोडे लिहिलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते. होय, त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही. मात्र मानसशास्त्रातील मोठे नियम, सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले.

बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे. सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांचं आयुष्य मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्या एक लक्षात येईल की त्यांना पालक म्हणून यशस्वी पालकत्वासाठी बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व फार दिशादर्शक ठरेल. हाच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलू आपण माझ्या समज प्रमाणे अभ्यासू. कारण माझ्यासारख्या मानसशास्त्राच्या विद्यार्थांसाठी फारच मार्गदर्शक व रंजक वाटते.


यशस्वी होण्यासाठीचे अंतर्मनिय इच्छा निर्मिती मागचे मानसशास्त्र
(For Success your will must be from your Sub Conscious mind)

लक्षात घ्या, मानसशास्त्राचा हा सिद्धांत बाबासाहेबांनी पुरेपुर पाळला कारण कुणालाही आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर सर्वप्रथम लागते ती यशस्वी होण्यासाठीची इच्छा. इच्छा हीच यशस्वी होण्याची जननी आहे. (Will is the Mother of all Success) हा मानसशास्त्रीय मुलभूत सिध्दांत आहे. जगामध्ये जी काही मोठी माणसे होऊन गेली ती केवळ त्यांना यशस्वी होण्याची इच्छा असल्यामुळे झाली इतरांच्या इच्छेमुळे नाही. बाबासाहेब हे सुद्धा यापैकी एक होते. मला दीन, दुबळ्या, दलित, वंचित, शोषित समाजासाठी काहीतरी करायचे आहे, त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचे आहे, समाजामध्ये त्यांना ताठमानेने जगता यावे यासाठी काहीतरी करायचे आहे ही मुळातच इच्छा बाबासाहेबांची स्वतःची होती त्यामुळे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लढले, टिकले आणि जिंकले सुद्धा.

पण या इच्छा निर्मिती मागचे बाबासाहेबांची मानसशास्त्रीय पायमुळं ही त्यांच्या बालपणात आढळतात. जेव्हा दलित व मागासवर्गीय समाजाला जगण्याचा व शिक्षणाचा अधिकार नव्हता त्याचा फार मोठा गहरा परिणाम बाबासाहेब यांच्या बालमनावर झाला होता. शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना एका विशिष्ट समाजाच्या मुलांना भिंतीच्या आत शिकवले जायचे तर दुसऱ्या समाजाच्या मुलांना भिंतीबाहेर शिकवले जायचे. त्याचे मुळ कारण काय आहे हे समजण्याइतपत त्यांना कळत असेल - नसेल माहित नाही पण शिक्षणाच्या मध्ये येणाऱ्या त्या तथाकथित भिंतीने त्या बालमनावर फार मोठा भावनिक आघात केला हे निश्चित आणि हेच इच्छानिर्मितीचे मुख्य कारण ठरले, तेही भावनिक. कारण तरुणांनी, पालकांनी आज एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी यशस्वी होण्यासाठी किंवा आयुष्यात फार मोठे भव्यदिव्य करण्यासाठी इच्छा अंतर्मनापासून यायला पाहिजेत. पण त्याचे कारण हे भावनिकच असायला पाहिजे तेव्हा माणूस फार मोठा होतो.

आजच्या पिढीचे किंवा पालकांचे यशस्वी होण्यासाठीचे कारण हे भावनिक नसून व्यावहारिक, सामाजिक तथा राजकीय आहे. त्यामुळे आज सर्वकाही असूनही आपण मानसिकदृष्ट्या पराभूत आहोत. मला हे माझ्या भावनिक कारणासाठी करायचे आहे असे म्हणणारे तरुण किंवा त्याला सहाय्य करणारे पालक या समाजात क्वचितच दिसतो. त्यामुळे भौतिक सुखे असूनही माणूस आत्महत्या करीत आहे कारण व्यावहारिक, सामाजिक किंवा राजकीय कारणे ही मनुष्याला कधीही बौद्धिक किंवा मानसिक स्थैर्य देत नाहीत. जिथे स्थैर्य नाही तिथे चलबिचल आहे आणि जिथे चलबिचल आहे तेथे आत्महत्या, हत्या, नैराश्य, दुःख, वेदना, सल यासारख्या मानसिक आजारांचे थैमान आहे. त्यामुळे बाबासाहेब यांनी त्यांच्या जगण्याच्या कृतीतून मानसशास्त्रीय पहिला सिध्दांत सिध्द केला की, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, मोठे व्हायचे असेल तर यशस्वी होण्यासाठी ची इच्छा ही अंतर्मनापासून असावी, त्या इच्छेमागे भावनिक कारण असावे. व्यावहारिक, सामाजिक, राजकीय कारण नसावे. कारण ही कारणे मनुष्याला मूळ ध्येयापासून दूर नेतात, यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण उत्तम आहे ते कसे ते आपण बघू.

समजा आज तुम्ही कुठल्याही तरूणाला प्रश्न केला की, तुला का शिकायचे आहे? तर सहज सेकंदात उत्तर येईल की शिक्षण घेतल्यावर पदवी मिळते, पदवी नंतर नोकरी व नोकरी नंतर पैसा हे साधे गणित तो मांडतो. हीच गोष्ट पालकांचीही असते. हेच त्यांचेही उत्तर असते. आता बाबासाहेब यांचे ज्ञानार्जनाचे कारण जर पैशात असते तर बाबासाहेब पहिल्या पदवीतच संपले असते. ते पहिल्या पदवीतच इंग्रजांचे गुलाम झाले असते. एक पदवी, एक नोकरी - पैसा, संपले बाबासाहेब. नंतरच्या ३१ पदव्या त्यांनी मिळविल्या नसत्या, म्हणजे पैशाचा विचार हा त्याच्या ज्ञानातला अडथळा असता. दूसरी गोष्ट म्हणजे कुणाचा पराभव करण्यासाठी जर त्यांनी पदवी घेतली असती तर ते संपले असते. आजच्या युगात आपण त्याला तथाकथीत Competition म्हणतो. म्हणजे तुमच्या ध्येयाचे मूळ कारण सोडून बाबासाहेब भटकले असते तर अमर झाले नसते. तात्पर्य समजून घ्या.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कुणाची Competition करण्याची गरज नाही. आपण विद्वान फक्त आपल्या भावनिक कारणास्तव व्हायला पाहिजे, पैशासाठी किंवा कुणाला पराभूत करण्यासाठी नव्हे हा वैज्ञानिक मानसशास्त्रीय सिध्दांत बाबासाहेब यांनी जीवनात अमलात आणला. आजच्या पिढीने बाबासाहेब यांना या दृष्टीने बघणे आवश्यक आहे. तुम्ही प्रथम तुमचे ध्येय ठरवा. त्यानंतर ते मिळवण्यासाठीचे तुमचे वैयक्तिक भावनिक कारण शोधा, तुमचे अंतर्मन यशाकडे आपोआपच चालू लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपली तुलना कुणाशीही न करता आपण यशस्वी होण्यासाठी भावनिक कारणाने स्वार्थी व्हा. आम्ही पैशाने स्वार्थी होतो, कर्माने/कर्तृत्ववाने नाही. बाबासाहेब कर्तृत्ववाने स्वार्थी होते म्हणून आजच्या पिढीला नैराश्याने ग्रासले आहे. बाबासाहेब त्या दृष्टिकोणातून प्रेरणा आहेत. प्रेरणा त्यांच्याकडून अशी घ्या तेव्हाच तुम्ही १८ -१८ तास अभ्यास करू शकाल. पालकांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन करताना पैशासाठी किंवा जागतिक स्पर्धेसाठी ज्ञानार्जन करावे असा उलटा सल्ला देऊ नये उलट ज्ञान हे भावनेच्या परिपूर्णतेसाठी आवश्यक आहे हे त्यांच्या अंतर्मनावर बिंबवावे म्हणजे ते एक पदवी, एक नोकरी - पैसा या पलीकडे जगाकडे डोळस दृष्टीने बघतील व ज्ञानी होतील. ज्ञानी झाल्यावर पैसा, प्रसिद्धी, समृद्धी, बंगला, गाडी ह्या दुय्यम गोष्टी आपोआप येतात त्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही. त्यांचा मुख्य हेतू ज्ञानार्जन असावा असे संस्कार प्रत्येक पालकाने मुलावर करणे आवश्यक आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचे पहिले सार आहे.


तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ठराविक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा
"If you want success you must have a narrow Minded"

बाबासाहेब यांच्या भाषणातील हे एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे. या वाक्यामध्ये त्यांनी अतिशय समर्पक व मोजक्या शब्दात यशस्वी होण्यासाठीच्या मानसशास्त्राची फार मोठी माहिती सांगितली. लक्षात घ्या यशस्वी होण्यासाठी तुम्ही ठराविक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा या त्यांच्या विचारांमध्ये फार मोठे मानसशास्त्र आहे. याला आपण ‘फोकस’ असे म्हणतो. यशस्वी होण्यासाठी फोकस होणे आवश्यक आहे. एकाच गोष्टीवर फोकस करण्यासाठी ची मानसशास्त्रीय प्रक्रिया ही अंतर्मनापासून (From Subconcious Mind) असते. आपल्या आयुष्यात विचार करणे ही प्रक्रिया बाह्यमनापासून (From Conscious Mind) तर कृती ही अंतर्मनापासून होत असते. आजच्या युगामध्ये माझी Concentration Power किंवा एकाग्रता कमी झाली आहे असे आपण नेहमी ऐकतो. मात्र याचे उत्तर बाबासाहेब यांनी त्यांच्या वरील वाक्याच्या सारामध्ये सांगितलं आहे. आपण जे ऐकतो, वाचतो, विचार करतो ही सर्व बाह्यमनाची कार्य आहेत तर कृती ही अंतर्मनापासून होते. आपण बाह्यमनाने १०० विचार करू शकतो मात्र एका जागेवर बसून एकच कृती करू शकतो. विचारांमध्ये आपण विमानाने जगभर फिरू शकतो मात्र कृतीतून आपण एक वेळ खुर्चीवर बसून असतो. वरील वाक्याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवा की, आपल्या ज्ञानार्जनासाठी आवश्यक असलेल्या एकाग्रतेसाठी बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे एका वेळेस एकच काम करण्याची सवय लागली पाहिजे. जेव्हा आपण बाह्यमानापासून विचार करतो तेव्हा अनेक विचार मनात येऊ शकतात मात्र कृती एकाच वेळेस एकच कृती होते. आपले बाह्यमन चंचल असते तर अंतर्मन स्थिर. मानसिक आणि बौद्धिक स्थिरतेसाठी आपण अंनंतर्मनावर कार्य केले पाहिजे असे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. ते त्यांनी कृतीतून सिध्दही केले. कारण ते एका वेळेस एकच काम फार निष्ठेने करायचे. परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल म्हणूनच एक ब्रेडचा तुकडा व माश्यांचा तुकडा खाऊन त्यांनी ८ वर्षाचा अभ्यासक्रम त्यांची सव्वा दोन वर्षांत पूर्ण केला व आयुष्यात ३२ पदव्या प्राप्त केल्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कृतीतून वरील मांडलेला मानसशास्त्रीय सिध्दांत त्यांनी सिद्ध केला तोही अंतर्मनापासून म्हणजे कृतीतून.

त्याच संदर्भात मी पुढे बोलेन की, एकाग्रतेसाठी आयुष्यात वर्तमानात जगणे आवश्यक असते. माणसाला दोन गोष्टींचे फार दुःख असते, एक तर भविष्याची चिंता (Fear of Future) आणि दुसरं म्हणजे भूतकाळातील पश्चाताप (Regrets of Past) बाबासाहेबांना ह्या दोन्ही गोष्टीचा लवलेशही नव्हता. कारण मी जे आज काम करतोय तेवढंच माझं आहे असे मानणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. उद्या काय होईल याची चिंता त्यांना नव्हती तर ते भूतकाळ फार उगाळत बसले नाही किंवा मिळालेल्या एक - दोन पदव्यावर समाधानी झाले नाहीत. म्हणजे मानसिक दृष्टीने बाबासाहेब हे फार कणखर व परिपक्व होते हे सिद्ध होते आणि नकळतपणे एकाग्रतेविषयी अनेक गोष्टी त्यानी कृतीतून दाखविल्या. त्यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक मानसशास्त्रतज्ञाला सुद्धा अभ्यासासाठी हवंहवंस वाटते.

वरील दोन्ही उदाहरणावरून बाबासाहेब उत्तम मानसशास्त्रज्ञ होते हे सिद्ध होते. तसेच अनेक मानसशास्त्रज्ञ सिध्दांत मांडतात किंवा सांगतात किंवा शिकवतात. मात्र बाबासाहेब हे सर्व कृतीतून उतरवत होते म्हणून मला बाबासाहेब हे उत्तम मानसशास्त्रज्ञ वाटले म्हणून हा लेख प्रपंच आपणासमोर मांडला.

- डॉ. अमोल आत्माराम देशमुख.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.