साथिया भाग ५ (एकांत) - मराठी कथा

साथिया भाग ५,मराठी कथा - [Sathitya Part 5,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.
साथिया भाग ५ - मराठी कथा | Sathiya Part 5 - Marathi Katha

सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा


एकांत
वैदेही - जानेवारी २०२०

१ जानेवारीची पहाट; कडक थंडी पडली होती सर्वत्र धुकं होतं. दोन स्वेटर घालावे लागत होते. वैदेहीने सवयीने चहा केला आणि स्वयंपाक घराबाहेरच्या बागेत येऊन गरम कडकडीत चहाचा पहिला घोट घेतला. बागेतली तिची ही आवडती जागा होती. सकाळचा निवांत चहा, मग बाहेर एखादं मैल फेरफटका. मग घरातली आवराआवर आणि नंतर शाळा. हेच रुटीन आता सेट झालं होतं. संध्याकाळी घरी आलं की वाचन, काम, दुसऱ्या दिवशीच्या सेशनच्या नोट्स काढणे. पुन्हा एकदा थोडासा स्वयंपाक, वाचन मग झोप. टिव्हीसुध्दा ती बघत नसे. सिरियल्स तीला आवडायच्या नाहीत आणि ब्रेकींग न्युजच्या नावाखाली जे चोथा चरवण दाखवत त्याचा तिला कंटाळा येई. त्या पेक्षा शांतता बरी वाटे. एकांताची सवय झाली होती.

आज विश्वजीतचा वाढदिवस! तिला आठवलं... दर ३१ डीसेंबरला रात्रीच ती आणि अबोली केक बनवायच्या. रात्री अनिरुद्ध लॅपटॉपवर मस्त मुव्ही लावत असे. पॉपकॉर्न, पावभाजी कींवा बिर्याणी वैगरेचा बेत करे. रात्री बरोबर बारा वाजता विश्वजीत केक कापत असे. त्या रात्री तो त्यांच्याकडेच राही. एक तारखेला सकाळी वैदेहीकडून औक्षण झाल्यावर तो कोल्हापूरला दादासाहेबांच्या पाया पडायला जाई.

सात वर्षे झाली या एकांतवासात पण प्रत्येक ३१ डीसेंबरला तिला विश्वजीतची आठवण येई तसं म्हटलं तर मनाने ती कधी त्याच्यापासून दूर गेलीच नव्हती. ज्या मुलाबरोबर आयुष्यातली महत्त्वाची, आनंदाची, संघर्षाची, सफलतेची दहा वर्षे घालवली त्याला विसरणार तरी कसं?! कोल्हापूरची घटना घडली नसती तर आजही ती आणि विश्वजीत एकत्र काम करत राहीले असते, असं तीला कायम वाटे. एका घटनेने त्यांच्या दोघांच्या जगाची उलथापालथ करुन टाकली होती. त्या घटनेचा अर्थ, तीच्या वागण्याचा अर्थ लावण्यातच तिचे कीतीतरी दिवस गेले होते.

त्या पावसाळी, वादळी रात्री ती स्वतःला विसरुन गेली होती. अनिरुद्धच्या जाण्याने अवेळी आलेली विरक्ती आणि प्रौढत्व त्या पावसातच ओघळून गेलं होतं. विश्वजीतच्या स्पर्शाने तिचं तारुण्य काही क्षणांपुरतं परत आलं होतं. आपण एक आई आहोत, एक बायको आहोत, विश्वजीतची सल्लागार आहोत... कशाचाही संदर्भ उरला नव्हता. ती एक स्त्री होती, प्रेमाला, स्पर्शाला आणि सुखाला आसुसलेली... तिच्या मनाला आणि शरीराला फक्त एवढंच समजलं होतं आणि त्या रात्री ती तनामनाने या अत्युच्च सुखात, उत्कट भावनेत नाहुन निघाली होती.

पहाटे विश्वजीतची घट्ट मिठी सोडवताना तिला भान आलं आणि वास्तवाची जाणीव तिच्या अंगावर आदळली! हे आपण काय करुन बसलो... ह्या विचारां बरोबरच, तिला आपण अनिरुद्धच्या आठवणींशी प्रतारणा केल्यासारखं वाटलं. अनिरुद्धशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर मी हे सुख कसं अनूभवू शकते?! तीला स्वतःची शरम वाटली. विश्वजीत काय म्हणेल आता!? ज्या मुलाला मी संस्कारांचे, नैतिकतेचे धडे दिले त्याच्या बरोबर शय्यासोबत??? आयुष्यभर मी त्याच्या नजरेला नजर तरी देऊ शकेन का? एका विवाहीत पुरुषाबरोबर शरीरसंबंध? ते सुद्धा विद्यार्थ्याबरोबर??? वैदेहीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. बाबा तिला कायम सांगतं असत. शिक्षकांचं चारीत्र आणि वागणं हे स्फटीकासारखं पारदर्शी आणि धुतल्या तांदुळासारखं असलंच पाहिजे. मुलं आपल्या शिक्षकाचा आदर्श ठेवतात. त्यांचं आचरण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर शिक्षकांचं आचरणं शुध्द हवंच! तूझी अक्षम्य चूक झालीए वैदेही... तिचं अंतर्मन तिला म्हणालं.

पश्चाताप करत ती तडकाफडकी पुण्याला परत गेली. मनातल्या मनात तिने हा निश्चय केला की पुन्हा कुठल्याही प्रकारची जवळीक येता कामा नये आणि विश्वजीतची मोकळ्या मनाने माफी मागायची. पंधरा दिवस ती न बोलता शांत राहिली होती.

पण झालं ते तिच्या अपेक्षेपेक्षा भलतच! विश्वजीत तिच्यात गुंतून पडला होता. त्या एका रात्रीच्या क्षणांवर प्रेम करत बसला होता. त्याची भावना, उत्कटता तिला समजत नव्हती असं नाही पण त्या भावनेचा स्विकार तिला शक्य नव्हता. विश्वजीत हट्टी आहे हे ती जाणून होती. त्याला जे हवं असतं ते तो मिळवतो, हे ती गेल्या दहा वर्षांत शिकली होती. परंतू त्याला जे हवं होतं त्यातून केवळ विनाश होता. त्याच्या संसाराची धुळधाण, तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे, त्याच्या राजकीय कारकीर्दीवर गालबोट, त्याच्या इमेजवर कायमचा कलंक...!? एक शिक्षक, एक सल्लागार एक सहकारी एक मैत्रिण म्हणून तीला हे कधिच मान्य नव्हतं.

विश्वजीतच्या डोक्यातून काहीही करुन हे विचार काढावेच लागतील... हेच तिला स्पष्ट समजलं होतं. पण विश्वजीत समजून घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी असह्य होऊन तीचा हात उगारला गेला. त्या रात्रभर वैदेही रडत होती. आपल्या एका चुकेने आपण विश्वजीतचं आयुष्य डीस्टर्ब केलं हि भावना त्रास द्यायला लागली.

काय करावं सुचेना तिला. निवडणूका तोंडावर आलेल्या. अशा वेळी रजा घेऊन घरी तरी कसं बसणार?! पण ही तीची दुविधा दुसऱ्या दिवशीच संपली.

सकाळी देवयानीला अचानक दरवाजात पाहुन ती सटपटली.

देवयानी गप्पा मारायला आली नव्हती हे तीला एका क्षणात समजलं होतं.

“हे बघ वैदेही!” देवयानीचा निर्वाणीचा सुर होता. “तुमच्या दोघांचं काय नातं मला माहीत नाही. कोल्हापूरला तुमच्या दोघांमधे काय झालं ते मला कळलं नाही आणि माहिती करुन घ्यायची ईच्छा पण नाही. मला एवढच माहिती आहे की त्या दिवशीपासून विश्वजीत माझ्याशी एक शब्दही बोलला नाही आणि त्याने मला स्पर्श सुध्दा केलेला नाही. आत्ताच मला माझ्या डॉक्टरकडून रीपोर्ट मिळालाय, I am pregnant! दोन महिने होऊन गेलेत. मी अजून घरी कोणाला सांगितलं नाहीए. तुला जर वाटत असेल की माझा आणि विश्वजीतचा संसार नीट व्हावा तर तू आमच्या दोघांमधून बाजूला हो! जो पर्यंत तु त्याच्या समोर आहेस तो मला बघणार पण नाही!” I hope you understand, what I mean???

धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल असं झालं होतं वैदेहीला.

आज पहिल्यांदाच कोणीतरी तिला ईतकं अपमानास्पद वागवलं होतं. एका वाक्यात तिच्या चारीत्र्याची लक्तरं टांगली होती.

आता ईथे रहाणं अशक्य होतं. अमेरीकेला जाण्याशिवाय, दृष्टीआड जाण्याशिवाय तीला काय पर्याय राहीला होता?

विश्वजीत तीला असा सोडणार नाही ह्याची पूर्ण कल्पना होती तीला. ईलेक्शन नंतर तो फोन करणारंच ही पूरेपूर खात्री होती. प्रकाशला, असा फोन आला तर काय उत्तर द्यायचं हे तीने पढवून ठेवलं होतं. तिच्या अपेक्षेप्रमाणेच घडलं होतं. तिच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर विश्वजीतने संबंध तोडले होते.

काही महिने अमेरिकेत काढल्यावर तिने भारताची वाट धरली. पण तीला परत पुण्याला जायचं नव्हतं.समाजकारण, राजकारणाशी संबंध नको होता. आधी बंगळूरला तीन वर्षे राहून ती आता पाचगणीला तिच्या मैत्रिणीच्याच एका इंटरनॅशनल बोर्डींग स्कुलमधे, दहावी अकरावीच्या मुलांना History and Literature शिकवत होती. शाळेजवळ एक छोटसं बैठ घर घेऊन तिकडेच राहणं तीने पसंत केलं होतं. तीचं रुटीन, तिचे विद्यार्थी, ती शांतता हा एकांत, हेच तीला आता सवयीचं झालं होतं.

फोन वाजला! वैदेही भानावर आली. तीच्या मुख्याध्यापिकेचा फोन होता. “वैदेही, पुढच्या दोन महिन्यात स्टेट लेव्हल, एल्युकेशन काँपिटीशन आणि वक्तृत्व स्पर्धा आहेत. सात ते चवदा वयोगटातील आपली काही सिलेक्टिव्ह मुलं पाठवतोय आपण. तु प्लीज त्यांच्या बरोबर Voice modulation आणि public speaking घेशील का??”

होकार देऊन, पटकन आवरुन वैदेही कल्चर हॉलकडे निघाली. हे तीचं आवडतं काम होतं. मुलं आलेली होती. प्रत्येक जणं आपापली भाषणं म्हणून दाखवत होते, वैदेही नोटीफीकेशन्स लिहीत होती.

सगळ्यांची भाषणं झाल्यावरच तिला पब्लिक speaking workshop सुरू करायचा होता. भाषणं झाली. सर्वांना जवळ बोलवून वैदेहीने प्रत्येकाची ओळख करुन घ्यायला सुरवात केली. दुसरी मधल्या एका चुणचुणीत मुलीने तीच्या गोड आणि सूस्पष्ट आवाजात न लाजता तिची ओळख करुन दिली..

“Hello mam! My name is वैदेही विश्वजीतराजे भोसले.!”

क्रमशः
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.