कधी काळी भेटलेली ही माणसं, काही समजलेली आणि काही न उमजलेले
कधी काळी भेटलेली ही माणसंकाही समजलेली आणि
काही न उमजलेले
कधी दुकानात काही मकानात भावलेली
मनात राहिलेली आणि मनातून उतरलेली सुद्धा
मठात काकडा आरतीला आलेली
रामाच्या, विठ्ठलाच्या
बालाजीच्या मंदिरात
अजान ऐकून लगबगीनं मशिद जवळ करणारी
अशी ही भेटली
सरकारी कचेऱ्यात
लाईट बिल भरताना
तिकीट काढताना
तलाठ्याच्या चावडीवर
पोस्टातली, कोर्टातली
देखील आहे त्यात
शाळेच्या बाकावर
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये
बसमध्ये, रेल्वेत,लोकलात
हा त्यांचा माहित असलेला पत्ता
कधी गल्लीत, कधी दिल्लीत
त्यातली काही जवळ असून दूर आहे
आणि दूरचे काळजात तग धरून आहे
आठवतात कधी सोईनं
कधी भीती दाखवतात
कधी रागावतात, ओरडतात
कधी मायेन चेहऱ्यावर हात फिरवतात
अंधारात भेटली ती समजली
काही उजेडात देखील न उमजली
पाठराखण करतात हरी काका सारखी
शिकवतात रघुनाथ गुरुजीं सारखं
जपतात काशिनाथ मामा सारखं
लाड करतात वत्सला मायो सारखं
आणि सरस्वता बायो सारखं
कुणी भेटली होती
कॉलेज मध्ये घेऊन जाणाऱ्या
रस्त्याच्या वळणावरील झाडा खाली
काही वेळा पुरती
अवकाशात माझ्या सगळे
अवती भवती आहेत
सर्वांच्या भेटी आता
साठवलेल्या आठवणीत होतात
कधी काळी भेटलेली ही माणसं
काही समजलेली आणि
काही न उमजलेले