Loading ...

एक तुतारी - मराठी कविता (केशवसुत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांची एक तुतारी ही लोकप्रिय मराठी कविता.

एक तुतारी - मराठी कविता (केशवसुत)

एक तुतारी द्या मज आणुनी


एक तुतारी - मराठी कविता (केशवसुत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांची ‘एक तुतारी’ ही लोकप्रिय मराठी कविता.



एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज लागुनी

अवकाशाच्या ओसाडीतिले
पडसाद मुके जे आजवरी
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जीला जबरी
कोण तुतारी ती मज देईल

सारंगी ती, सतार सुंदर
वीणा, बीनहि, मृदंग, बाजा
सूरहि, सनई, अलगुज, माझ्या
कसची ही हो पडतिल काजा
एक तुतारी द्या तर सत्वर

रुढी, जुलूम यांची भेसुर
संतानें राक्षसी तुम्हाला
फाडुनि खाती, ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला
तुतारीनें ह्या सावध व्हा तर

अवडंबरलीं ढगे कितीतरि
रविकिरणांचा चूर होतसे
मोहर सगळा गळुनि जातसे
कीड पिकांवरि सर्वत्र दिसे
गाफीलगिरी तरिही जगावरि

चमत्कार! ते पुराण तेथुनि
सुंदर, सोज्वळ गोडे मोठे
अलिकडलें तें सगळें खोटे
म्हणती, धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनि

जुन्या नभी या ताजे तारक
जुन्या भूमिवर नवी टवटवी
जुना समुद्रहि नवरत्ने प्रसवी
जुन्यातून जी निष्पत्ति नवी
काय नव्हे ती श्रेयस्कारक

जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळुनि किंवा पुरुनि टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनि

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे; त्यावर नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा, चला तर

अटक कशाची बसला घालुनि
पूर्वज वदले त्यां गमले ते
ऐका खुशाल सादर चित्ते
परंतु सरका विशंक पुढते
निरोप त्यांचा ध्यानी घेउनि

निसर्ग निर्घृण, त्याला मुर्वत
नाहीं अगदीं पहा कशाची
कालासह जी क्रीडा त्याची
ती सकलाला समान जाची
चुरुनी टाकी प्रचंड पर्वत

त्यांशी भिडुनी, झटुनी, झगडत
उठवा अपुले इंच मनोरे
पुराण पडक्या सदनी कारे
भ्याड बसुनियां रडता पोरे
पुरुषार्थ नव्हे पडणे रखडत

संघशक्तीच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शे तुकडे झाले
स्वार्थानपेक्ष जीवी अपुले
पाहिजेत ते सत्वर भरलें
घ्या त्यात उड्या तर बेलाशक

धार धरिलिया प्यार जीवावर
रडतिल, रडोत, रांडा-पोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर

जाऊ बघते नाव लयाप्रत
तशांत बनला मऊ मेंढरे
अहह ! घेरिले आहे तिमिरे
परंतु होऊ नका बावरे
धीराला दे प्रसंग हिंमत

धर्माचे माजवुवूनि अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनिया हे जातात खुळे
नीतीचें पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या ह्या दंभावर ह्या बंडावर
शूरांनो ! या, त्वरा करा रे
समतेचा ध्वज उंच धरा रे
नीतीची द्वाही पसरा रे
तुतारिच्या या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा
प्रगतिस जर ते हाणी टोणा
झुगारुनि ते देऊनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे
उन्नत्तिचा ध्वज उंच धरा रे
वीरांनो ! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत “हर-हर”

पूर्वीपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती’
संप्रति दानव फार माजती
देवांवर झेंडा मिरवीती
देवांच्या मदतीस चला तर


केशवसुत यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची