समालखा (हरियाणा) येथील ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ, पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो भक्तांचा सहभाग.

पुण्यासह महाराष्ट्रातून हजारो भक्तांचा सहभाग
निरंकारी संत समागम
आत्मिकता व मानवतेतूनच घडू शकतो परिपूर्ण मनुष्य.
- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
समालखा, १७ नोव्हेंबर २०२२ “आत्मिकता व मानवतेतूनच परिपूर्ण मनुष्य घडू शकतो” असे मार्मिक उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा विधिवत शुभारंभ करताना मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले.
हा चार दिवसीय समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथील विशाल मैदानांवर आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये देश-विदेशातील समाजाच्या विविध स्तरातील भाविक भक्तगण तसेच प्रभुप्रेमी सज्जन लाखोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुणे व महाराष्ट्रातूनही आलेल्या हजारो भक्तगणांचा समावेश आहे.
![]() |
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ |
सद्गुरु माताजींनी आपल्या संदेशामध्ये सांगितले, की मागील जवळपास दोन वर्षानंतर आज इथे देश-विदेशातून संतजन-भक्तजन एकत्र आले आहेत. कारण कोविड महामारीच्या कालावधीत माणसाला एकमेकाशी भेटणे सुद्धा अशक्य झाले होते. तथापि, संत सदोदित मानवतेच्या सेवेसाठी तत्पर असतात याचेच प्रमाण देत कोरोना महामारीच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, निरंकारी सत्संग भवनांचे कोविड केअर सेंटर्समध्ये रूपांतरण, कोविड लसीकरणासाठी विशेष शिबिरे तसेच गरजू नागरिकांना सहाय्य अशा विविध उपक्रमांद्वारे मानव सेवेचे कार्य निरंकारी संतांनी केले आहे.
सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की कोरोना महामारी व्यतिरिक्त जगाच्या काही भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानेदेखील लोकांच्या मनामध्ये द्वेषभावना वाढलेली आहे ज्यामुळे मानवा-मानवामध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत. या भिंती केवळ प्रेमरूपी पुल उभारूनच जमिनदोस्त केल्या जाऊ शकतात. तेव्हाच एकत्वाच्या भावनेतून आपुलकी निर्माण होईल आणि मनुष्य शांतीसुखाचे जीवन जगू शकेल.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख करुन सद्गुरु माताजी म्हणाल्या, की हे मिशनदेखील याच वर्षी ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम साजरा करत आहे. देशस्वातंत्र्यातून आपल्याला भौतिक स्वातंत्र्याचा लाभ निश्चितच झालेला आहे तथापि, जर आत्मिक रुपातील स्वातंत्र्य हवे असेल तर आत्म्याचे नाते परमात्म्याशी जोडल्याशिवाय ते अशक्य आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मानवी गुणांनी युक्त जीवन जगता येईल आणि मुक्तीचा मार्गही प्रशस्त होईल.
![]() |
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ |
तत्पूर्वी आज दुपारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि त्यांचे जीवनसाथी राजपिता रमितजी यांचे समागम स्थळावर आगमन होताच समागम समन्वय समितीच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यानंतर या दिव्य जोडीला एका फुलांनी सुसज्जित केलेल्या खुल्या वाहनामध्ये विराजमान करुन मुख्य मंचाकडे नेण्यात आले. या प्रसंगी भाविक भक्तगण ही दिव्य जोडीच्या निकट दर्शनाने आत्मविभोर होऊन गेले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळताना पहायला मिळाले.
अवघे समागम प्रांगण सद्गुरुच्या जयघोषांनी दुमदुमून गेले. ज्यामुळे एक अलौकिक वातावरणाची छटा सर्वत्र पसरली. या भक्तीने ओतप्रोत अशा वातावरणाने भारुन गेलेले भक्तगण परमानंदाची अनुभूती घेत होते. स्वाभाविकपणेच उपस्थित लक्षावधी भक्तगणांनी या दिव्य जोडीला मोठ्या श्रद्धेने अभिवादन केले. भक्तगणांच्या अभिवादनाचा स्वीकार करत या दिव्य जोडीनेही आपल्या दैवी स्मितहास्य मुद्रेने सर्व भक्तांना आपले आशीर्वाद दिले.
सेवादल रॅली
निरंकारी संत समागमाच्या इतिहासामध्ये प्रथमच एक पूर्ण दिवस सेवादलासाठी समर्पित करण्यात आला. त्या अनुषंगाने बुधवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी एका रोमहर्षक सेवादल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सेवादल बंधु-भगिनींनी शारीरिक कवायत, खेळ, मानवी मनोरे तसेच मल्लखांब यांसारखे धाडसी क्रीडा प्रकारही प्रस्तुत केले. याशिवाय वक्ता, गीतकार, कवी सज्जनांनी समागमाचा मुख्य विषय ‘आत्मिकता व मानवता’ यावर आधारित विविध कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये व्याख्यान, कविता, ‘संपूर्ण अवतार बाणी’तील पदांचे गायन, समूह गीतं तसेच लघुनाटिका इत्यादींचा समावेश होता.
![]() |
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ |
सेवादल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सेवादल सदस्यांना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सेवेच्या भावनेने युक्त होऊन केलेली सेवा खऱ्या अर्थाने सेवा म्हटली जाते. सेवेची संधी ही केवळ सद्गुरुंची कृपाच असते, तो काही कोणाचा अधिकार नसतो. तसेच कोणतीही सेवा लहान अथवा मोठी नसते. सेवेद्वारे आपल्याला सुंदर जीवन जगण्याची कला आपसुकच प्राप्त होत असते. सेवा आपले व्यक्तित्व उंचावण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. सेवादार भक्त जेव्हा सर्वांभूती सृष्टिनिर्मात्याचे रूप पाहून आपल्या कर्तव्यांचे पालन करत असतो तेव्हा त्याचे प्रत्येक कर्म ही सेवाच बनून जाते.
वा..खूप छान...धन्यवाद
उत्तर द्याहटवा