तु वेडी आहेस का? - मराठी कविता

तु वेडी आहेस का?, मराठी कविता - [Tu Vedi Aahes Ka, Marathi Kavita] गाडी बाजुला लावून मी पावसात भिजते, कपाटात पडून छत्री दर वर्षी झिजते.
तु वेडी आहेस का? - मराठी कविता | Tu Vedi Aahes Ka - Marathi Kavita

कपाटात पडून छत्री दर वर्षी झिजते..

गाडीच्या काचेवर पावसाची पहिली सर दिसते
गाडी बाजुला लावून मी पावसात भिजते
कपाटात पडून छत्री दर वर्षी झिजते
तेव्हा मला लोकं विचारतात
तु वेडी आहेस का?

रेडियोवर एक सुंदर गाणं लागतं
वेडं मन कुठल्यातरी दुसऱ्याच जगात धावतं
उगाच हसू ओठांवर मोरासारखं नाचतं
तेव्हा लोकं मला विचारतात
तु वेडी आहेस का?

छोटी छोटी मुलं पाहून शाळेचे दिवस आठवतात
युनिफॉर्म, बॅग, बॉटल घेऊन पुन्हा शाळेत पाठवतात
काही आठवणींना सांगा शब्द कुठे सापडतात
तेव्हा लोक मला विचारतात
तु वेडी आहेस का?

टि. वी. लावला की प्रचंड जाळपोळ पहाते
आग विनाश आणि रक्ताचे झरे वाहते
डोळ्यात पाणि, थंड हात, सुन्न पडून रहाते
तेव्हा लोक मला विचारतात
तु वेडी आहेस का?

आई-मुलं, भाऊ-बहीण, आपले आपले भांडतात
मर्यादेचा उंबरठा सहजपणे ओलांडतात
मस्तकावरील घामाचे थेंब अश्रुं सह सांडतात
तेव्हा लोक मला विचारतात
तु वेडी आहेस का?

माणुसकीचे बिगुल घेऊन वणवण मी फिरते
माणुस हवा की माणुसकी? या प्रश्नापुढे स्थिरते
उत्तर मिळे न जेव्हा, स्वतःशीच किरकिरते
तेव्हा लोक मला विचारतात
तु वेडी आहेस का?

- समर्पण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.