या रस्त्यावरती गाव चिमुकले होते, झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते, त्या बालपणीच्या रम्य स्मृतीचे पान
या रस्त्यावरती गाव चिमुकले होते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
त्या बालपणीच्या रम्य स्मृतीचे पान
या थांब्यावरती नकळत उघडत जाते
या इथेच होती उंच वेस गावाची
दगडाची, तरिही प्रेमाची मायेची
तिजसवे अघोषित नाते जुळले होते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
या इथे झाड गाभूळ चिंचेचे होते
या इथे बोर अन् पेरूचेही होते
या झाडांवरती पोपट विहरत होते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
गावात छान दगडाचे वाडे होते
प्राजक्त सड्यांचे सुगंधी अंगण होते
वृंदावन तुळशी, परिसर पवित्र होते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
ते उन्हाळ्यातले गच्चीवरती निजणे
थंडीत करून शेकोटी खिदळत बसणे
पावसात झेलत थेंब टपोरे पडते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
तो शेव मुरमुर्यातला सुखाचा वाटा
त्या लालट चंचा, आवळे नफा न तोटा
ते जांभूळ काळे, बोर शेंबडे स्मरते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
हे गाव जणू की कुटुंब एकच होते
सुख दुःखी सारे किलमिष विसरत होते
ते माणुसकीचे अनन्य दर्शन होते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
व्यवहारासाठी नाते कुठेच नव्हते
रुपयावर कुठले स्नेह बेतले नव्हते
की निसर्ग सोडून कुणीच वागत नव्हते
झुळझुळते निर्मळ झरे सुखाचे होते
- प्रफुल्ल चिकेरूर