यंत्रानं मोठा सायरन दिला, कोंबडा खडबडून जागा झाला, आरवलं तर माणूस...
यंत्रानं मोठा सायरन दिला
कोंबडा खडबडून जागा झाला
आरवलं तर माणूस हसेल
म्हणून पुन्हा झोपी गेला
यंत्र धुराडी हसू लागला
पायी चालू म्हणणार्याला
माणूस क्षुद्र म्हणू लागला
चक्रावरच्या गाडीत बसून
गुर्मी, ताठा करू लागला
यंत्र धुराडी हसू लागला
नांगरधारी शेतकर्याला
माणूस वेडा म्हणू लागला
ट्रॅक्टर कुठे नांगर कुठे
भाषण ठोकून हिणवू लागला
यंत्र धुराडी हसू लागला
भोजन म्हणजे यज्ञ म्हणताच
माणूस टिंगल करू लागला
मायक्रोवेव्हच्या गळ्यात पडून
फास्टफूडच्या नादी लागला
यंत्र धुराडी हसू लागला
- प्रफुल्ल चिकेरूर