
माणदेशातलं ‘खेडं’ महाकवी ग. दि. माडगूळकर यांचं गाव म्हणून जगाच्या नकाशावर अजरामर होऊन गेलं आहे
‘माडगूळे’ सांगली जिल्ह्यातलं दिड एक हजार लोकवस्तीचं गाव. विशेष अशी ओळख नसणारं हे माणदेशातलं ‘खेडं’ महाकवी ग. दि. माडगूळकर यांचं गाव म्हणून जगाच्या नकाशावर अजरामर होऊन गेलं आहे.
गदिमा यांच्या या गावाविषयी म्हणतात...
तिळही नाही खेड्याला या पहिला इतिहास
शिल्पकलेची ताम्रपटाची कशास मग आस ?
पुढे याच कवितेत ते म्हणतात...
नसौ नाहि तर या खेड्याला पहिला इतिहास
सुपूत त्याचे उजळू आम्ही नव्या भविष्यास
हे आपल्या अमूल्य साहित्यकृतीतून सार्थ करणारे पपा आजोबा (ग. दि. माडगूळकर), तात्या आजोबा (व्यंकटेश माडगूळकर) यांचं हे गाव. गदिमांची नात म्हणून या गावाशी अभिमानाचं नातं आहे. तसचं माझं आजोळ म्हणून आपुलकीची भावना आहे. श्यामकाका माडगूळकर... माझ्या आईचे वडील आणि गदिमांचे सख्खे बंधू...! असे हे माडगूळे आणि माडगूळकर यांच्याशी असणारे ऋणानुबंध म्हणजे माझं परम भाग्यच...! बालपणात डोकावताना माडगूळच्या स्मृतींशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्या आठवणी रुंजी घालतात. त्यांचाच हा मागोवा - माडगूळे Days..!!
ST मधून काटेरी बाभूळ दिसायला लागली की ७-८ तासाच्या प्रवासाचा शीण नाहीसा व्हायचा. घामाघूम होऊन ST तून उतरताच मामा समोर दिसायचा. आम्हाला एकदा त्याच्या ताब्यात दिलं की आई ‘सुटकेचा’ निश्वास सोडायची. मग एखादं रसवंतीगृह गाठायचं न् लिटरभर ऊसाचा रस ऑर्डर करायचा. (हो...लिटर... तिथे ग्लासभर रस अन् किलोवर फळं आजही मिळत नाहीत.) तोपर्यंत मामा STD बूथ वरुन बाबांना पोहचल्याचा फोन करुन ‘चंपक’, ‘ठकठक’ अशी मासिकं घेऊन यायचा. घरी पोहचताच अंगणातून ओरडायचो ‘आब्बाss आम्ही आलो.’ आम्हाला न पेलवणार्या बॅगा घ्यायला आजोबा लगबगीनं यायचे. कौतुक आणि उत्साह यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहायचा. दोनच दिवसात मामे - मावस भावंडांचा जथ्या आजोळी दाखल व्हायचा आणि घराचं गोकूळ व्हायचं.
गप्पांचे फड अन् पत्यांचे डाव रंगायचे. आम्हा भावंडांची भांडणं, दंगा अंताक्षरी यांनी घर दणाणून जायचं. मोजक्याच TV असणार्या घरांपैकी आमचं घर एक होतं. सोपा भरुन पोरं TV बघायला गर्दी करत आणि त्यांच्याकडून काकांची (आमचे आजोबा) नातवंड आणि माहेरवाशीणी आल्याचं गावभर होत असे. मग रोज कुणीतरी हौसेने बोरं, करवंद, डाळींब, कलिंगड, पापड - कुरडया, आंबे असं काहीतरी घेऊन गाठ घ्यायला येई. चांगल्या २-२ खोल्या भरुन घरचे आंबे असतानाही त्या आंब्यांचं अप्रुप वेगळंच होतं. सतत येणार्या जाणार्यांचा राबता अन् गॅसवर एका बाजूला कायम उकळणारं चहाचं आधण अजून आठवतं. मामी आत्मीयतेने सगळ्यांचं करायची. ती माणसं हवीहवीशी वाटायची. शेवाळी इरकल नेसलेली, कौतुकानं कानशीलावर बोटं मोडणारी पारु आजी, आम्हा मुलांना टॉवेलचा फेटा करुन बांधणारे दादा आजोबा, भावंडांच्या युद्धप्रसंगात एकाच गटातल्या दोघांना उचलून सायकलवरुन मारुतीच्या देवळात नेऊन ठेवणारा साधू मामा, बांगड्या भरायला येणारी पपा मावशी, क्रिकेट बॉल एवढा चिंचेचा गोळा देणारी गंगा मावशी, पार्लेचं चॉकलेट खिशात घालून फिरणारा अन् दिवसभरात भेटेल तितक्या वेळा चॉकलेट मामा, चेअरमन दादा, चंदूमामा, महादा मामा, सुनेल बापू (ते स्नेहलला सुनेल म्हणत), जैन दादा, बायडीमावशी, छबलू आप्पा, ही मंडळी गावतली नाही तर घरातली वाटायची.
अगदी लहानसं खेडं असल्यानं गावात फारसं काही मिळायचं नाही काही आणायचं तर तालुक्याला - आटपाडीला जावं लागे. मग आमच्या चुरमुरे, पेप्सीकोला, पत्यांचे कॅट अशा मागण्यांच्या यादीला ‘तालुक्याला गेल्यावर आणू’ असे सांगितलं जायचं. शेतातल्या ढेकळातून चालताना कोणी पडलं आणि भोकाड पसरलं की मामा विनोदाने म्हणायचा, ‘तालुक्याला गेल्यावर तुला २ गुडघे आणू’. या यादीत नसलेली पण कधीच न चुकलेली कुंदाची बर्फी आजोबा स्वतः जावून आणत. आठवडे बाजारातून आणलेल्या सामानाची अंगणात भेळ केली जायची. वाड्याच्या मागच्या अंगणाला फाटक - कुंपण असा प्रकार नसल्यानं गप्पांचा आवाज रस्त्यापर्यंत जायचा. हातातल्या काठीने शेळ्या हाकत डोक्यावरची टोपली सावरत मान वळवून कुणी मावशी म्हणायची, “तायं ! कधी आलायसा?” अंगणात येऊन बसल्यावर विचारत असे - “अन् पोरं?” मग घरात पत्ते खेळणारी आमची सेना उशांखाली पत्ते लपवून अंगणात हजर होई. एक ओळख परेड होत असे. मग ती मावशी कनवटीतून २रु. काढून पेपरमिंटच्या गोळ्यांसाठी हातावर ठेवायची. तितक्यात कुठेतरी दूरवर भोंगा ऎकू यायचा आणि गारेऽऽगाऽऽर ही आरोळी पूर्ण व्हायच्या आत आम्ही त्या सायकलवरच्या विक्रेत्यापाशी पोहचायचो.
दिनक्रम ठरलेला असायचा. मुळात सकाळच ‘दुपारी’ व्हायची...! उन्हात पाणी ठेवून तापवायचं अन् कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ असा निवांत कार्यक्रम असायचा किंवा मग मळ्यात जाऊन हौदात डुंबणं, कांदा - भाकरी - ठेचा, दहीभात अशा फक्कड बेतावर ताव मारुन आमच्या वजनाच्या निम्म्या वजनाची कलिंगड घेऊन घरी परतायचो. त्या कलिंगडाच्या फोडी खाताना आमचे चेहरे सुद्धा दिसत नसत. आयांना भुणभुण न करता खेळण्याबद्दल २रु. चे बक्षीस जाहीर केले जाई. पण आजोबा ट्रंकेतल्या पत्र्याच्या डब्यातून नाणी काढून सरसकट सर्वांना वाटत. मात्र खोड्या न् चुकांची कबुली गोंदवलेकर महाराज किंवा पपा आजोबा (गदिमा) यांच्या फोटोसमोर द्यावी लागत असे. शांत दुपारी वार्याच्या झुळूकेनं झोप लागायची. तितक्यात आजोबांना बडबडगीताच्या ओळी सुचायच्या अन् भारदस्त आवाजात ते ऎकवायचे - “सुपारी गेली गडगडत...सायलोबा बसले बडबडत...!” त्यांच्या आमच्यावरच्या अशा विडंबनाने तेव्हा आम्ही रुसायचो. मग चहाचा Round व्हायचा. (कदाचित दिवसभरातला ४था - ५वा.) दिवेलागणीला शुभंकरोति, रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र म्हटलं जायचं. त्यातील...
श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा ।
भयकृद् भयनाशना गिरिधरा ।
दृष्टदैत्यसंहारकरा।
अशा अवघड ओळी मोठयानं उच्चारण्यात वेगळीच मजा होती. आजोबाचं ऎकून नकळत पाठ झालेल्या त्या स्तोत्रांचा घोष आजही स्मरतो त्यानंतर मग गावातल्या ज्योतिबाला, खंडोबाला किंवा मग अगत्यानं आमंत्रण देऊन गेलेल्या कुणाच्या रानात चक्कर व्हायची. अंगणात रात्रीच्या जेवणाची अंगत - पंगत अन् अंगणातच चांदणं बघत झोप. सकाळी ४ माणसं पलिकडं झोपलेली बहीण, कधी मांजर तर कधी चक्क मोर शेजारी असायचा. आजोबा पूजा आटोपून तुळशीला पाणी घालायला यायचे आणि मोठ्यानं म्हणायचे, “वेंकटरमणा...” तशी आम्ही मुलं बेंबीच्या देठापासून “गोविंदा” असं ओरडून ताडकन उठायचो.
साहित्यावर चर्चा करणारे आजोबा - आई, लाड पुरवणारे आबाकाका - मंदाजी, वाचनीय वाचून दाखवणारी मुग्धामामी, चालू घडामोडींचं ज्ञान देणारा मुक्तुमामा, बालपणीचे किस्से साधना मावशी, ‘राजदूत’ चालवणारी सप्पू मावशी, इंजेक्शनची भिती दाखवणारा मिल्या, भांडणात मध्यस्थी करणारा योगूमामा, गमती करणारी स्वाती मावशी, आमच्यातली होऊन खेळणारी रुपा मावशी यांच्या बरोबर केलेली धमाल कायम स्मरणात राहील.
आडाची भिती, मृगजळाचं कुतुहल, पांगार्याच्या बियांचे चटके, ओढ्यातले मासे, पत्र्यावरची माकडं, ज्योत्याचं अंगण, बुक्कीनं फोडलेले कांदे, मोराची पिसं, बैलगाडीतला फेरफटका, मारुतीचा पार, स्पीकरवरची गाणी, चैत्रागौरीचं हळदी - कुंकू, पोतराज - बहुरुपी, बाभळीचे काटे, सराटे, डाळींबाच्या बागा, बॉबी - लिमलेटच्या गोळ्या, बोरकुटाची चव, मिरची कांडपयंत्राचा आवाज, गोठ्याचा गंध, वळवाच्या पावसातल्या गारा, अशा अनेक आठवणी मनात घर करुन आहेत. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पर्वणीच असायची. बालपणाचे संस्कार अन् नात्यांची श्रीमंती सुख देऊन जाते.
निरागस आणि समृद्ध बालपण होतं ते... हा आठवणींचा ठेवा समाधानाची भावना देतो. पुढे आम्ही मोठे झालो आणि सर्वांच्या परीक्षा - सुट्ट्या यांचा काही ताळमेळ जुळेना. हळूहळू महिनाभराची सुट्टी दोन दिवसांची झाली अन् गोकूळ फक्त आठवणीतच राहीलं...!