बा. भ. बोरकर - बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा. भ. बोरकर, बाळकृष्ण भगवंत बोरकर - [Ba. Bha. Borkar] महाराष्ट्र ज्यांना आनंदयात्री कवी म्हणून ओळखतो असे कादंबरीकार बा. भ. बोरकर.

महाराष्ट्र ज्यांना आनंदयात्री कवी म्हणून ओळखतो असे कादंबरीकार बा. भ. बोरकर

बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)


बा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० - मृत्यू: ८ जुलै १९८४) सर्व महाराष्ट्र ज्यांना ‘आनंदयात्री कवी’ म्हणून ओळखतो असे कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार. बा. भ. बोरकर यांचा जन्म गोव्यातील कुडचडे या गावी झाला. बोरकरांचे मूळ गाव बोरी. त्यांचे प्रार्थमिक शिक्षण पोर्तुगीज शाळेत झाले. १९२८ साली ते धारवडच्या शाळेतून मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी कर्नाटक कॉलेजला प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण झेपणार नाही त्यामुळे कॉलेज सोडून ते नोकरीच्या शोधात मुंबईला आले. परंतु मुंबईच्या जीवनाशी त्यांचे सूर जुळले नाहीत. पुन्हा गोव्याला परत येऊन वॉस्कोच्या इंग्रजी शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. कवितेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती.

बोरकरांचा पहिला कविता संग्रह ‘प्रतिभा’ हा १९३० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचा भा. रा. तांबे(भास्कर रामचंद्र तांबे) आणि वि. स. खांडेकर(विष्णू सखाराम खांडेकर) यांच्याशी परिचय झाला. ‘ज्योत्स्ना’ या मासिकातून त्यांच्या कवितांना प्रसिद्धी मिळाली.

 • १९३७: जीवन संगीत
 • १९४७: दूधसागर
 • १९५०: आनंदभैरवी
 • १९६०: चित्रवीणा

हे त्यांचे काही काव्यसंग्रह. त्यानंतर एक उत्कृष्ट दर्जाचे कवी म्हणून त्यांची कीर्ती होत गेली. पुढे

 • १९६५: गितार
 • १९७०: चैत्रपुनव
 • १९७२: चांदणवेल
 • १९८१: कांचनसंध्या
 • १९८२: अनुरागिणी
 • १९८४: चिन्मयी

आणि ‘लावण्यरेखा’(अप्रकाशित) आदी काव्यसंग्रह निर्माण झाले. त्यांच्या कवितेवर भा. रा. तांबे यांचा प्रभाव दिसतो. त्यांची कविता निसर्ग संपन्न जशी आहे तसाच तिच्यात दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो. अक्षरगण वृत्ते, मात्रा, जातीवृत्ते यांवर त्यांची हुकूमत आहे. शब्द भांडार समृद्ध असल्यामुळे नादमय रचनांनी बोरकरांनी अनेक वर्षे रसिकांना मुग्ध केले.

कवितेशिवाय कादंबरी, कथा, ललित लेख, चरित्रात्मक प्रबंध इत्यादी लेखनही त्यांनी केले.

 • कागदी होड्या
 • घुमटातले पारवे
 • चांदण्याचे कवडसे
 • पावलापुरता प्रकाश
 • मावळता चंद्र
 • अंधारातली वाट
 • भावीण
 • प्रियकामा
 • प्रियदर्शनी
 • समुद्राकाठची रात्र
 • सासाय

इत्यादी त्यांची ललित लेखांची पुस्तके आहेत. स्टीफन झ्वाइगच्या कादंबर्‍यांचा तसेच महात्मा गांधींच्या संबंधित काही पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. रविंद्रनाथांवर त्यांनी काही पुस्तके लिहिली. त्यांच्या कोकणी भाषेतही १० साहित्यकृती आहेत.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.