तीन प्रतिक्रिया - मराठी कविता

तीन प्रतिक्रिया, मराठी कविता - [Teen Pratikriya, Marathi Kavita] एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला एक जण भेटला ओळखीचा वाटला.
तीन प्रतिक्रिया - मराठी कविता | Teen Pratikriya - Marathi Kavita

एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून

एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”

त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत...
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणाला,
“दिसत नसले जरी
मृत्यूच्या गावात घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही”

विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतला... सावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लगलेले
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला,
“जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे”
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.