कवितेचा चष्मा - मराठी कविता

कवितेचा चष्मा, मराठी कविता - [Kavitecha Chashma, Marathi Kavita] तो मोठमोठ्याने सभागृहात हजारो पब्लीक समोर उभे राहून, मोठमोठ्याने कविता वाचायचा.

तो मोठमोठ्याने सभागृहात हजारो पब्लीक समोर उभे राहून, मोठमोठ्याने कविता वाचायचा

तो मोठमोठ्याने सभागृहात हजारो पब्लीक समोर उभे राहून
मोठमोठ्याने कविता वाचायचा
लोकही तेवढ्याच उत्साहाने टाळ्या वाजवायचे
‘वा क्या बात है !’ म्हणायचे

मग तर त्याचा उत्साह आणखीनच वाढायचा
मग तो अगदी बेंबीच्या देठापासून गाऊ लागायचा कविता
समीक्षक सुद्धा म्हणायचे त्याची कविता खरोखरंच आत्म्याच्या
झाडावरील नैसर्गिक फुलासारखी आहे

तिला कुठल्याही कृत्रीमतेचा गंध नाही
किंवा खत घालून-घालून नुस्तच झाड वाढावं
तशी वाढतही नाही त्याची कविता विनाकारण
हे सारं ऐकून त्याला खूप-खूप बरं वाटायचं
त्याच विचारात तो घरी यायचा
त्याला पाहताच त्याची बायको तोंड वाकडं करायची
रडणारं लेकरु त्याच्या मांडीवर आपटत म्हणायची
नुस्त्या कविता करून पोट भरत नाही हो
...काही तरी करा हो
तेव्हा तो मात्र पहात रहायचा
फक्त खिडकीतून बाहेर

त्याच्या डोळ्यावर असायचा
कवितेचा चष्मा चढवलेला... नेहमीच
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.