आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या म्हणजे वेगवेगळ्या रूपात प्रकाश ऊर्जा देणाऱ्या अग्नीचे आभार मानण्याचा सण.

प्रकाश ऊर्जा देणाऱ्या या अग्नीचे आपण आभार मानायला हवे ना?
आषाढ अमावस्या - दीप अमावस्या - दारु पिऊन, नशा करुन, मांसाहार करुन गटारात लोळण घेण्याचा हा इव्हेंट नाही. श्रावणापासून पुढील चार महिने मांसाहार दारु पिणे बंद असा एक प्रघात पाळला जातो; आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस.
आता श्रावण महिना सुरु होणार मांसाहार पोट फुटेपर्यंत करा, प्यायची तेवढी दारू प्या, गटारात लोळण घ्या. यामुळे ही गटारी अमावस्या झाली आणि यासाठीच वैशिष्ट्यपूर्ण झाली हे दुर्दैव. पण खरंतर दिव्याची मनोभावे पूजा करण्याचा हा दिवस आहे...
ही दिव्याची पूजा वगैरे कशासाठी?
संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असते, तेव्हा ‘शुभंकरोति’ म्हणून तुळशीजवळ दिवा लावायची पद्धत जवळजवळ संपुष्टात आली आहे. २१ व्या शतकात एका बटणाने अख्ख घर प्रकाशाने उजळून जातं. इथे अग्नी दिसत नाही; Direct प्रकाश दिसतो तरी अग्नीचं अस्तित्व आहेच ना? वीजनिर्मिती होते म्हणजे पाणी या पंचतत्वापासून ऊर्जा तयार होते.
काही अघटित घडलं तर अग्नीतत्वाचाच भडका दिसतो ना? म्हणूनच ज्योत दिसत नसली तरी या प्रकाश निर्माण करणाऱ्या अग्नीला आपण आजही नमस्कार करायला हवा! प्रकाश मिळवण्याची पद्धत बदलली तरी मनोभाव महत्त्वाचा कसा? तर हा असा... त्यामुळे बटण दाबून दिवा लागला की रोज नमस्कार करायला हवा आणि दीप अमावस्येला एक ठरवलेला दिवस म्हणून हे नक्की करायला हवं.
असा लख्ख प्रकाश असला तरी समईची, पणतीची ज्योत खूप शांत, पवित्र, मंगलमय वाटते यावर कोणाचं दुमत नसेल!
दीप अमावस्येला आषाढ महिना संपतो. श्रावणात ऊन पावसाचा खेळ असतो, सण सुरु होतात आणि भाद्रपदात आभाळ पुन्हा अंधारुन येतं, पाऊस कोसळतो, दिवसही लहान होतो, अंधार लवकर पडू लागतो त्यामुळे पुर्वी कामाच्या वेळात अंधार संपवायला या दिव्याची गरज भासत असे. म्हणून संध्याकाळी लवकर दिवा लावायला सुरवात करण्यासाठी हा दिवस ठरवला गेला.
धुळीत माखलेले, दिवाळीनंतर बांधून ठेवलेले लामणदिवे, समई, निरांजन घासून पुसून ठेवायचे आणि दीप अमावस्येला लावण्यासाठी तयार ठेवायचे. या दिवशी पाटावर सर्व दिवे ठेवत, पाटाभोवती रांगोळी काढत, फुल वाहत, हळदकुंकू वाहत, नैवेद्य दाखवत आणि सर्व दिवे प्रज्वलित करुन वातावरण प्रकाशमान करत. काही ठिकाणी कणकेचे किंवा ओल्या मातीचे दिवे बनवतात. थोडक्यात आपापल्या कुवतीनुसार सण साजरा करतात. इथे बाकीचे सोपस्कार महत्वाचे नाहीतच तर कृतज्ञता हा भाव मनात असणं महत्वाचं आहे.
आपल्या उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक वस्तूची, सजीवाची जाणीव ठेवायची, आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची. हा आपल्या जीवन पद्धतीने दिलेला विचार आहे; हा एक संस्कार आहे.
अंधार नाहीसा करणारी ही ज्योत पंचतत्वातील अग्नीचं सुद्धा रुप आहे.
प्रत्येकाला अंतिम अद्वैताची ओढ आहेच
काहींना याचं ज्ञान होतं, काहींना नाही. बाह्य मनाला याची जाणीव नसेल पण काटक्यांवर काटक्या किंवा दगडावर दगड घासून खूप कष्टाने आणि काळाने अग्नी प्रज्वलीत होतो. थोडक्यात तो लाकडाच्या, दगडाच्या आत कुठेतरी सूक्ष्म रुपात असतो. तसाच तो आपल्यामधील सूक्ष्म देहात आहेच. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात असणाऱ्या अग्नीचे आभार मानण्याचा हा सण आहे.
डोळ्यांना दिसतो तोच अग्नी असं खरंतर नाही! अन्न पचवण्यासाठी लागणारा जठराग्नी, राग निर्माण करणारा क्रोधाग्नी, द्वेष पेरणारा द्वेषाग्नी, वाहन, यंत्र अगदी प्रत्येक अणू रेणुत अग्निच आहे. याच्याच साक्षीने प्रेमाग्नी फुलतो, नाती जुळतात, वाढतात.
अग्नीची ज्योत कायम उर्ध्वगामी असते, गुरूत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने जाणारी, मुक्त होण्यासाठी वरच्या दिशेने झेपावतो हाच अग्नी.
दया, प्रेम आणि कृतज्ञता यामधील अग्नी अहंकाराला भस्मसात करतो म्हणून भस्म लावणं हे प्रतिकात्मक असलं तरी त्यामागील उद्देश अहंभाव संपवणं हा आहे. या ज्योतीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण आपल्यामध्ये तीच प्राणज्योत आहे म्हणून आपले अस्तित्व आहे.
पंचतत्वातील हे अग्नीतत्व रोगराई नष्ट करते, अंधार, नकारात्मक लहरी नष्ट करते. अशा प्रकाश ऊर्जा देणाऱ्या या अग्नीचे आपण आभार मानायला हवे ना?
या २१ शतकात आपलं आयुष्य नुसतं धावतंय, या यंत्रयुगात आपण निसर्गशक्ती पासून दूर जात आहोत पण काहीही झालं तरी प्रत्येक गोष्ट पंचतत्वातूनच जन्म घेते आणि पंचतत्वातच विलीन होते; या पंचतत्वांबद्दल मनात कायम कृतज्ञतेची भावना हवीच. पण हि भावना साजरी करता यावी, आपलं प्रेम व्यक्त करता यावं यासाठी काही खास दिवस आपल्याकडे राखून ठेवले आहेत.
वेगवेगळे पाश्चात्य देशातले days साजरे करताना जस cool वाटतं तसंच आपले हे सण मनोभावे साजरे करायला शिकूया. या दीप अमावस्येला कृतज्ञतेचा भाव ठेवून दिव्यांची म्हणजेच अग्नी या तत्वाची पूजा करुया, कोणताही बडेजाव, रंगरंगोटी न करता देवासमोर किंवा कोठेही दिवा लावून मनात कृतज्ञतेचा, आभारी असण्याचा भाव ठेवून ही पूजा करता येईल! मनोभावे नमस्कार करा, हीच मानसपूजा खरंतर महत्वाची आहे; पण ती मात्र नक्की करा.
- रेश्मा जोशी (पुणे)
लेख फारच छान आहे.
उत्तर द्याहटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
हटवाKiti Chan lihilay... Lekhachi mandni phar Chan Keli aahe... Ya prakarche aankhi lekh dyave. Lot's of love and thanks from Germany.
उत्तर द्याहटवाआपल्या सुचनांचा आम्ही नक्की विचार करू.
हटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद!