आभाळातून चोरतोय रंग इंद्र धनूचे आज...
तुझ्या निरागस नजरेत अलगद उतरावसं वाटतं
तुझ्या रेशमी कुरळ्या केसांशी खेळावसं वाटतं
वेळ हातातून निसटतेय माझ्या जणू रेत जशी
पण त्याच रेतीच्या कणात तुला शोधावसं वाटतं
तुझ्या नावी माझा प्रत्येक श्वास करावसं वाटतं
तुझ्या समोर क्षितिजही झुकवावसं वाटतं
आभाळातून चोरतोय रंग; इंद्र धनूचे आज
कारण, कोऱ्या आभाळात तुझं नाव रंगवावसं वाटतं
तुला माझ्या कवितेचा छंद म्हणावसं वाटतं
तुझ्या शितलतेला चैतन्याचं नाव द्यावसं वाटतं
तू कितीही दे सतत माझ्या प्रेमाला नकार
पण त्याच नकारात होकाराचा शोध घ्यावासं वाटतं
गुलाबी हवेची दिशा आज बदललीय वाटतं
प्रेमाची मोहिनी आता तुझ्यावरही चढलीय वाटतं
मग छळतेस मला का अशी? जशी घेतेस सूड जुना
पूर्व जन्मी मी कृष्ण आणि तू मीरा होतीस वाटतं?
आता हृदयाची दोर आपल्या पुन्हा जुळावसं वाटतं
वेड्या मनाचं स्वप्न माझं; खरं व्हावसं वाटतं
कधीतरी बेधडक घेऊन मग हात तुझा माझ्या हातात
माझ्या ह्या साऱ्या भावनांची साथ तुला ऐकवावसं वाटतं
- चैतन्य म्हस्के