Loading ...
/* Dont copy */

प्रकाशाची किमया उजागर होते - मातीतले कोहिनूर (गणेश तरतरे)

प्रकाशाची किमया उजागर होते (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक गणेश तरतरे यांचा प्रकाशाची किमया उजागर होते हा मराठी लेख.

प्रकाशाची किमया उजागर होते - मातीतले कोहिनूर (गणेश तरतरे)

गुणांना प्रयत्नांची मिळालेली योग्य दिशा आविष्काराची भाषा समृद्ध करते...

प्रकाशाची किमया उजागर होते

गणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत)


गुणांना प्रयत्नांची योग्य दिशा मिळाली की आविष्काराची भाषा अधिकच समृद्ध होते. अशीच काही अवस्था ‘प्रवीण देशमुख’ यांच्या छायाचित्रांची आहे. ‘चुडावा’ हे नांदेड पूर्णा रोड वरील छोटेस गाव, वडील कला शिक्षक असल्याने चित्रकलेचा परिचय लहानपणापासून झाला होता. ज्या घरात कलेच वातावरण असतं त्या घरात प्रसन्न, आनंद देणारं वातावरण असतं. प्रवीण अशाच संस्कारात वाढला.



कलेविषयी आकर्षण असणं स्वाभाविक होतं. पुढे कला शिक्षण घेत असताना कॅमेऱ्याची ओळख झाली. ‘नांदेड’ येथील ‘अभिनव कला महाविद्यालयातील’ दिवंगत प्राध्यापक ‘शिवाजी जाधव’ यांनी चित्रकलेबरोबर कॅमेऱ्याचे प्राथमिक कित्ते दिले. चित्र आणि छायाचित्र यांच्यात अतूट असं नातं आहे. दोन्ही कलांचा पृष्ठभाग, कॅनव्हास सारखा सपाट आहे, द्विमित आहे. हा त्यांच्यातील समांतर धागा होय.

छायाचित्राला कला न मानणारा एक वर्ग आहे. त्यांचे मत असे की छायाचित्र हे केवळ कॅमेऱ्याच्या तांत्रिक बाजूतून उपजत असतं परंतु छायाचित्रकलेला ‘कला’ मानणारा देखील वर्ग आहे, आम्ही याच मताचे आहोत. कॅमेरा केवळ टूल आहे, केवळ साधन आहे. सौंदर्यपूर्ण अभिव्यक्त होता येणं हे कला गुणाशिवाय शक्य नाही किंबहुना कलागुण असल्याखेरीज कॅमेरा वापरू नये. सभोवतालातून संपन्न, सुंदर दृष्य वेचता आले पाहिजे. छायाप्रकाश हा दृष्यकलेचा महत्वाचा घटक आहे. चित्र तयार होण्यासाठी छाया आणि प्रकाशाचा मेळ महत्वाचा असतो. छाया म्हणजे सावली, सावली आणि प्रकाश परस्पर पूरक संबधातून वस्तूचे यथायोग्य दर्शन होते. दृष्य कलेतील वास्तववादाचा मूळ आधार सावली आणि प्रकाशाचा संबंध मानावा लागेल.

फोटोग्राफीचं मुलतत्व देखील सावली आणि प्रकाशच आहे. यांचा अनुबंध कॅमेरा या टूलच्या माध्यमातून ज्याला चांगला जोपासता येतो तो चांगला फोटोग्राफर. अशाच फोटोग्राफरमध्ये प्रवीण यांची गणना केली जाईल, अशी योग्यता त्याच्यात नक्की आहे.

प्रवीणला खरं तर चित्रकलेची अधिक ओढ होती. चित्र काढता काढता कॅमेऱ्याचा छंद आणि व्यावसिकता अशी दुहेरी भूमिका कधी स्विकारली हे नेमक सांगता येत नाही. चित्रकलेचं ज्ञान फोटोग्राफीला समृद्ध करीत होतं. व्यावसिक छायाचित्रणातून आर्थिक साह्य आणि सृजनशील छायाचित्रकारीतून आत्मसंतुष्टी, समाधान मिळते. शेवटी कला ही भौतिक गरजा व जीवन समृद्ध करण्यासाठी आहे.

जहांगीर आर्ट गॅलरी’त बॉम्बे फोटोग्राफर्सच्या (२०१९) प्रदर्शनातील प्रवीणच छायाचित्र अजूनही आठवतं. क्लोजअपमध्ये लहान मुलाला आई जवळ उचलून घेत आहे व त्यांची सावली बाजूच्या भिंतीवर पडते, असं त्या चित्रातील प्रसंगाचं वर्णन करता येईल. सावलीत लपलेलं वात्सल्य हे त्या चित्राच मोल, सौंदर्यगुण वाढवतं. त्या प्रतिबिंबाचं गमक प्रवीणने नेमकेपणाने हेरलं आहे. त्याला नैसर्गिक प्रकाशाचं आकर्षण आहे. छायाप्रकाशाचे अनोखे मूड व रंगांना कैद करण्याचा सुंदर प्रयत्न त्यात केला आहे.

बॉम्बे फोटोग्राफर्सच्या (२०१९) प्रदर्शनातील प्रवीणचं छायाचित्र
बॉम्बे फोटोग्राफर्सच्या (२०१९) प्रदर्शनातील प्रवीणचं छायाचित्र

भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी असलेला स्वच्छ उत्साही प्रकाश, कोवळं ऊन आपल्या बरोबर नवचैतन्य घेऊन येतं असतो. दुपारच्या प्रकाशाची दाहक तीव्रता, संध्याकाळी रजकणा नी माखलेला, थकलेला परंतु समाधानी आकाशातील प्रकाश. याचं प्रमाणे विविध ऋतूतील प्रकाशाचे रूप, पोत अनुभवता येतं. या प्रत्येक रूपाचं खास असं आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. हा प्रकाश वस्तूवर पडला की त्याच्या अंगीभूत गुणांसह त्यावस्तूचे सौंदर्य द्विगुणीत करीत असतो. फोटोग्राफरला वस्तूच्या रुपाबरोबर प्रकाशाचा मूड हेरता आला की त्याचा अविष्कार गुण संपन्न होतो. प्रवीणच्या कलाकारीबाबत तसंच काहीसं आहे.

एखाद्या वस्तूची प्रतिमा चौकटीत स्थापित केली की, ती प्रतिमा आशय संपन्न होते. अर्थात फोटोग्राफरला रचनेचं भान असणे गरजेचं आहे. जात्यावर दळण दळत असलेल्या महिलेच्या चित्रात प्रवीणचं रचनाकौशल्य नीट पाहता येतं. मागे असलेला काळोख योगायोगाने तयार झालेला गडद उभा आयताकार, विषयवस्तूची प्रतिमा अधिक उजळ करतो. छायाचित्रात वस्तू आणि त्या अनुषंगाने येणारा विषय महत्वाचा असतोच. ग्रामीण दिनचर्येतील क्षणचित्रे असे प्रामुख्याने प्रवीणच्या चित्राचे विषय असतात. असे विषय अनेकांनी हाताळले आहेत, परंतु प्रवीणची छायाचित्रे सौंदर्यगुणांबरोबर ग्रामीण जीवनाच्या रसगंधाने माखलेली असतात.

जात्यावर दळण दळत असलेली महिला
जात्यावर दळण दळत असलेली महिला

छायाचित्रण ही एक तांत्रिक कला आहे. उच्च अभिरुची, सौंदर्य, कल्पकता, आदी बरोबर कॅमेऱ्याच्या तंत्राचे नीट ज्ञान आवश्यक असते. कॅमेरा हाताळल्याशिवाय त्यातील खाचखळगे माहित होत नाहीत. सुरुवातीच्या काळात ‘Pentax K1000’ या रोल कॅमेऱ्याबरोबर काही प्रयोग झाले. तो काळ ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट’ आणि ‘फिल्म’चा होता. कलर फोटोग्राफी बद्दल कुतूहल होते. डिजिटल कॅमेऱ्याचे प्रचलन नव्हते. पुढे वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या हाताळणीतून तंत्र आणि कौशल्याचा मिलाप होत गेला. प्रयोगातून सिद्धीकडे असा स्वतःच्या विकासाचा मार्ग प्रवीणने प्रशस्त केला.

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोग्राफी
ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोग्राफी

प्रवीणच्या छायाचित्रांचे आणखी काही गुण आहेत. नैसर्गिक प्रकाशाची विविध रूपे वस्तूच्या निमीत्ताने अनुभवणे, अनेक वेळा त्याच्या चित्रात वस्तू नाममात्र असते आणि छायाप्रकाशाचा नाट्यमय खेळ हाच चित्राचा परिपूर्ण भाग होऊन जातो.

प्रकाशाला स्वत:चा आकार, रूप नाही, तो ज्या वस्तू वर पडतो तेव्हा त्या वस्तूच रूप प्रकाश स्वतः धारण करत असतो. अशा वेळी वस्तू शिवाय प्रकाशाचं अनोखं रूप कैद करणं कठीण असतं. त्याच्या कलाकृती आपलं नात वस्तू रुपात लपलेल्या कथानकाशी न सांगता प्रकाशाने धारण केलेल्या आकारातील सौंदर्यमुल्यांचा पुरस्कार करीत असतात. अशा कलाकृती निथळ सौंदर्याच्या कसोटीवर तपासाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. आणि विशुद्ध सौंदर्याची भाषा खऱ्या अर्थाने येथून सुरु होते. अशा वेळी प्रवीणच्या कलाकृती आपलं नातं बेमालूमपणे अमूर्ततेशी सांगत असतात. पर्यायाने प्रवीणची चित्रे विषयापेक्षा निथळ सौंदर्याला महत्व देणारी आहेत.

प्रवीणच्या चित्रांचा आस्वाद घेत असताना त्यातील अकल्पनीय लयीचा अनुभव मिळतो. ही लय केवळ कलाकृतीच्या चौकटी पुरता मर्यादित नाही तर ती कलाकाराच्या आविष्काराचा सुंदर स्त्रोत आहे. प्राकृतिक भासमान, रंग छाया प्रकाशावर हवी होत नाहीत, आणि विशिष्ठ पोताच्या सहचरामूळे चित्रभर फिरणाऱ्या लयीचा अनुभव मिळतो.

मानवी देह हा ईश्वराचा सर्वांग सुंदर अविष्कार आहे. त्याच्या सौंदर्याची समीक्षा करू नये, ते कठीण आहे. त्या रूपाचा सौंदर्यानुभव ईश्वरीय सत्यशिवसुंदर अशा अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. अशी वस्तूरूपातील मानवी देह प्रवीणच्या छायाचित्रात ग्रामीण जीवनाषया बरोबर मोह, माया, काम, प्रेम, वात्सल्य घेऊन येतात.

नुकतेच संपन्न झालेल्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ च्या १२९ व्या वार्षिक प्रदर्शनात प्रवीणच्या छायाचित्राला ‘लेट मनोहर गांगण पारितोषिक’ प्राप्त झाले. व्यक्तिचित्रण या शीर्षकातील चित्रात प्रकाश धारण केलेली एक स्त्री आहे. हा प्रकाश तिने अलंकार म्हणून धारण केलेला आहे असा अनुभव मिळतो. अल्ट्रामरीन ब्लूच्या गहराईला सूर्याच्या पिवळाईची सोनेरी किनार मोहिनीच्या सुंदरतेत अधिकच भर घालते. प्रकाश समूहाच्या त्रिकोणीय रचनेतून अवकाशाकडे उत्तुंग गतिमानता प्रत्ययास येते.

पारितोषिक प्राप्त व्यक्तिचित्रण
पारितोषिक प्राप्त व्यक्तिचित्रण

प्रवीण अनेक पुरस्कारांचा धनी आहे. ग्रामीण भागात राहून फोटोग्राफी क्षेत्रातील अनेक घडामोडी, स्पर्धा, कार्यशाळा, तंत्र, प्रदर्शने आदी विषयी व्यवसाय व कला सांभाळून सजग राहण कठीण असते. परंतु प्रवीण त्या संदर्भात देखील जागरूक आहे. त्याकरिता अधिकाधिक प्रयत्नशील असतो.

एकंदरीत प्रवीणची छायाचित्रे सभोवताल, रांगडेपणा, सामाजिक बंध, निसर्ग, मिथक, कथा, स्पष्ट करीत असतात. ती खऱ्या अर्थाने ग्रामीण जनजीवनाचा भावपटल मांडणारी आहेत. त्याचबरोबर त्याच्या छायाचित्रात प्रकाशाची किमया उजागर होते.

गणेश तरतरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची