ते एकवीस दिवस - अनुभव कथन

ते एकवीस दिवस,अनुभव कथन - [Te Ekvis Diwas,Anubhav Kathan] एकवीस दिवसात खरखुरं जगायला शिकवून गेलेला कोरोनाचा अनुभव.
ते एकवीस दिवस - अनुभव कथन | Te Ekvis Diwas - Anubhav Kathan

एकवीस दिवसात खरखुरं जगायला शिकवून गेलेला कोरोनाचा अनुभव


कृतज्ञता...
आपण आपल्यावरच खुष असतो कारण आपलं लाईफ सेट असतं!
Work from home, meter on, overseas calls, सगळं कसं बिनबोभाट सुरु असतं!...बाहेर करोनाचा झंझावात ऐकेकाला लोळवत असतो... आपण इकडे मस्त असतो आपल्या भल्या मोठ्या 3bhk च्या वातानुकूलित स्टडीत, एकामागोमाग झुम मिटींग्ज्‌ झडत असतात. बायको मधेच टेबलावर गरम गरम पोहे आणते; त्याचा समाचार घेतो. पोरं आपापल्या रुममधे online शिक्षण कींवा टाईमपास करत असतात, आई तिच्या रुममधे पोथी, जप करत बसलेली असते. बायको सकाळी संध्याकाळी काय स्वैपाक करायचा या चिंतेत. आपण त्यात काय पडत नाही! आपली टिम वाट बघत असते. लोकांच्या नोकर्‍या जातात, आपलं लाईफ सेट असतं. पाच आकडी पगार महिन्याच्या शेवटी अकाउंट मधे जमा! 3bhk घर, कंपनीने दिलेली गाडी. माझ्या कर्तबगारीचं मी कमावलेलं.

अगदीच जरा अंग मोकळं करायचं तर TV लावायचा! त्यावर पण साला सगळ्या कोरोनाच्या बातम्या! इतके मेले, तितके अ‍ॅडमिट झाले... प्रेतं जळतायतं, कुटुंबिय रडतायत! शीऽऽऽ! साला ह्या मिडीयावाल्यांच्या! मी मनातल्या मनात एक शिवी हासडतो...! बायकोने दिलेला वाफाळता कॉफीचा मग घेऊन पुन्हा आपल्या स्टडीमध्ये शिरतो. आज U.K आणि Germany दोघांबरोबर online calls असतात.

आज थोडी सर्दी झालेली असते. हवाबदल आहे! असली सर्दी तर कायमच होते, आपण काय औषध पण घेत नाही. घसा दुखतोय पण तो देखील हवेचाच. बायको झोपताना गरम पाणी मध घालून कप हातात देते. त्या रात्री AC त बऱ्यापैकी थंडी वाजते. एक क्रोसिन बस! की पुन्हा आपण तरतरीत, काम सुरु. झुम मिटींग... Overseas calls.

आज पुन्हा थोडी कणकण, सायनस भरलाय. नाक पण गळतय थोडं. फार काही नाही. डीकोल्ड गिळतो चहाबरोबर आणि कामाला लागतो. बंगळूरच्या टीममधला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये. मुंबईतले दोघे Quarantine मध्ये, दिल्लीतला बॉस तर घाबरून घरा बाहेरच पडत नाही! कसली ह्यांची Immunity! साला आपण रोज जॉगिंगला जातो. आज पण जाणार!

बायकोच्या हातचं पोळी भाजीचा कंटाळा आलाय. बाकी पिझ्झा वैगरे प्रकार करते ते बरे लागतात, पण मेथीची भाजी आणि भाकरी? कसली बेचव बनवलेय यार! परत बोलायची सोय नाही... लगेच म्हणेल, मग तु कर की एकदा! आणि आम्हाला खायला घाल! फेसबुकवर आमचेच मीत्र साले स्वतः बनवलेल्या डीशचे फोटो टाकतात! लगेच बायकोला निमित्त मिळतं, “घे! बघ त्या तुझ्या मीत्राने काय सुरेख चिकन बनवलंय. आपण असल्या फालतू स्वैपाक वैगरेच्या फंद्यात कधी पडत नाही! असली बायकी कामं ना कधी केली! ना यापुढे करणार.

आज रात्री एकदम जाग येते, एसी मधे हुडहुडी भरते. धडपडत उठुन थर्मामिटर लावतो. ताप १०३, बायकोला उठवतो. ती घाबरलेली. तापाची एक सणसणीत गोळी घेतो, ती पटकन गरम हळद दुध करुन आणते. सकाळी मी व्यवस्थित, पण बायको ऐकत नाही. जबरदस्तीने वाफारा घ्यायला लावते. त्यात निलगिरी वैगरे टाकून. पण आज निलगिरीचा वास नेहमी सारखा नाही.

बायको ऐकत नाही. कंपल्सरी डॉक्टरांना फोन. मग Antibiotics सुरू! एकदा RTPCR करुन घ्या. अहो कशाला उगीच? मी एकदम व्यवस्थित असतो. पण डॉक्टर करुन घ्या सांगतात, बायको ऐकत नाही. Oxygen levels चेक करु म्हणते. टेस्टचे रीपोर्ट चार दिवस तरी येणार नाही असं कळतं.

बायको मला स्टडी मधेच जेवण आणुन देते. आईला आणि मुलांना ती माझ्या बहिणीकडे पाठवून देते. आता खोलीत मी आणि माझा लॅपटॉप. बायको सकाळ दुपार संध्याकाळ... नाश्ता, चहा, जेवण, हळद दुध... टेबलावर..! पण आता कशाची चव लागत नाही. अन्न जात नाही. हात पाय बसून बसून जाम दुखतात. आता व्यायाम नाही... म्हणून सुस्ती वाटते, पेंगुळलेल्या सारखं वाटतं. म्हणून Oxygen level पण खाली गेलेली. खोलीतल्या खोलीत चाललं तर थोडा दम लागला...

Report, positive! ठीक आहे यार! अजून थोडे दिवस एका खोलीत काढेन. वेबसिरीज बघेन, I know, I will be fine...

आज रात्री छातीवर एकदम प्रेशर आल्यासारखं वाटलं. श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय का? नाही, खोली छोटी आहे, खिडकी बंद आहे म्हणून कदाचित! पहाटे बायकोला सांगतो. Oxygen level आता पहिल्यांदाच 90 च्या खाली गेलेली.

बायको घाबरलेली. डॉक्टरांना फोन. डॉक्टर म्हणतायत अ‍ॅडमिट व्हा. बायको तेव्हा पासून सारखे फोन लावतेय... जवळच्या, ओळखीच्या हॉस्पिटलमधले बेड्स फुऽऽऽल! कुठेही जागा नाही.

मित्रांचे फोन, बिल्डींग मधले कुठेकुठे ओळख लावतात, एका ठीकाणी जागा मिळतेय म्हणतात. आता मी झोपूनच आहे.

बायको पटापट बॅग भरतेय... आईला बहिणीला फोन लावतेय... दोन तास झाले फोन लावतोय पण Ambulance नाही... शेवटी बिल्डींग मधल्या दोन पोरांनी उचलून गाडीत टाकलंय मला. बायको केविलवाणी गाडीच्या काचेला हात लाऊन निरोप घेतेय... कीती वेळ झाला समजत नाही यार...

पोरांनी गाडी सूऽऽऽसाट सोडलिए... एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे... पुन्हा तेच उत्तर, पुन्हा तोच नकार...!

शेवटी कोणीतरी उचललाय... कोण ते समजत नाही... पूर्ण शरीरावर PPE Kit घातलेलं कोणीतरी... कॉरीडॉरच्या लाईट शिवाय समजत नाही. नाकावर Oxygen लावलाय... पहिल्या पेक्षा श्वास बरा झालाय. पण घसा दुखतोय...

आता, कुठल्या तरी टीफीनचं खाणं. चव लागत नाही. पोळी भात... तोंडात चोथ्या सारखा फीरतोय. मोबाईल आहे हातात... बायको व्हिडीयो कॉल करतेय... ती मला समजावते, धीर देते...! मला फारसं बोलता येत नाही... मला बघून तिचा चेहरा रडवेला झालेला असतो. मुलं हाय करतात, आई मात्र अखंड नामस्मरणाला बसलेली आहे.

आज, इंजिक्शन आणायला हवाय, डॉक्टर सांगतात. आत्ताच देतोय पण पुरेसा स्टॉक नाही. बायकोला मेसेज केलाय. संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी इंजिक्शन मिळालेलं नाही...

आलेल्या मेसेज वरुन कोण कायकाय धावपळ करताय ते कळतंय. बायको समजावते! तुम्ही नका काळजी करु. खूप जण मदत करतायत हो! सकाळ पासून धावपळ करतायत तुमच्या इंजिक्शन करता. ओळखीतून, black market कुठून तरी नक्की मिळेल.

दुसर्‍या दिवशी चार पाच इंजिक्शन... वेगवेगळ्या प्रकारची. Oxygen level अजून कमी झालीये म्हणतात. बायकोचा व्हीडीओ कॉल... मला आता बोलवत नाही... शब्द उमटत नाहीत. ती कायकाय बोलत असते... धीर देत असते. मी फक्त हात हलवतो... उसनं हसू तोंडावर आणतो.

दिवसांची गिनती संपलेली... जिवंत माणसांच्या जगातली भावना गोठलेली. आजूबाजूला फक्त मृत्यूचं थैमान, नळ्या लावलेल्या, पेशंट कण्हल्यासारखा आवाज, वास डोक्यात भरलेला. तोंडावर नळ्या, हाताला सलाईन, खाणं जात नाही... डोळे मिटलेले का बंद तेही समजत नाही... फक्त पांढरा उजेड असतो समोर पसरलेला... एखाद्या थिएटरचा पांढरा पडदा असावा तसा...

त्यावर मग दिसायला लागतात... प्रतिमा... त्यांना क्रम नसतो. आगंतुक सारख्या त्या उमटत जातात त्या पडद्यावर...

लहानपणचे मित्र, त्यांच्या बरोबर घालवलेला वेळ, बाबांबरोबर चौपाटीवर वाळुत खेळं, आईच्या हातचा खमंग शीरा, तिच्या हाताचा प्रेमळ स्पर्श..., बायको बरोबरचे हनिमूनचे दिवस... त्या magical nights, पहिल्या पोराचा जन्मल्या नंतरचं रडणं..., पोरीने पहिलं वहिलं बाबा म्हंटला तो क्षण...! क्षणांची मालिका सुरु होते... गत स्मृतिंचे ते क्षण ओघळतात... आपण पहात असतो पण ते पकडून ठेऊ शकत नाही. आपण त्यामधे असतो पण... आता आपण ते परक्या सारखे पहात जातो, आपल्या अस्तित्वाचे ते क्षण आपण पकडायला जातो आणि ते निसटतात... विरुन जातात. आपल्या बरोबर साथ फक्त त्या पांढर्‍या शुभ्र प्रकाशाची असते.

आपल्या आजूबाजूला पसरलेला पांढरा श्वेत प्रकाश आता कमी होतोय... पुन्हा एकदा माणसांच्या हालचाली जाणवतात. PPE Kit घातलेली माणसं. You made it young man...! एक नर्स मला Thumbs up करुन सांगते. इंजेक्शनचा डोस संपलेला असतो. ICU मधून मी बाहेरच्या वॉर्डात येतो. माणसांच्या दुनियेत. श्वासांना अजूनही सपोर्टची गरज लागते पण थोडा - थोडा वेळ मी ब्रेक घेतो. व्हिडीओ कॉल वरती बायको, मुलं, आई, बहीण... मित्र, शेजारी... सगळे आलटून - पालटून! बायकोचे डोळे जागरणाने, चिंतेने सुजलेले दिसतात, पोरं बावरलेली, आई थकलेली!

कोणी - कोणी धावपळ केली, इंजिक्शन करता, प्लाझ्मा करता बायको सांगत असते. मी कधी आयुष्यात ज्या लोकांशी बोललो नव्हतो, ओळख दाखवलेली नसते त्यांनी माझ्या करता अफाट मेहेनत केलेली असते... सांगताना बायको गहिवरते. मी काहीच बोलु शकत नाही. घसा दाटून आलेला असतो. माझे शब्द हरवलेले असतात. मी मौनात जातो. अंतर्मुख होतो.

मला आता माझं काम, जॉब, overseas calls, पगार यातलं काहीही आठवत नसतं, काही खुणावत नसतं. मला माझी माणसं हवी असतात. पोरां बरोबर वेळ घालवायचा असतो, त्यांना घेऊन मस्त ट्रीपला जायचं असतं. बायको करता एखादी मस्त डीश बनवून तिला हसताना बघायचं असतं. घरकामात तिला मदत करायची असते. थकलेल्या आईच्या बेडवर बसुन तिची चौकशी करायची असते, तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तिच्या कडून थोपटून घ्यायचं असतं. माझ्या शेजारी - पाजारी, अनोळखी मदतगारांना Thank you म्हणायचं असतं. माझ्या जुन्या मित्रपरिवाराला फोन करुन त्यांची खबरबात घ्यायची असते. माझ्या करता अहोरात्र झटणाऱ्या नर्स, डॉक्टरांच्या पाया पडायचं असतं. ज्यांच्या घरातले कोरोनामुळे गेले अशा गोर गरिबांकरता मदतीचा हात पुढे करायचा असतो!

कधीकाळी नोकरी, पगार, ऐशोआराम ह्यामधे सेट असलेल्या मला आता... आयुष्याची अनिश्चितता जाणवलेली असते...!

लहानपणापासून प्रत्येक गोष्ट गृहीत धरणाऱ्या मला, प्रत्येक श्वासाची कींमत समजलेली असते. आत्तापर्यंत कधीही मनाला न शिवलेली आणि उमगलेली अशी कृतज्ञतेची भावना... मनात दाटलेली असते. ते निसटलेले क्षण मला पुन्हा जगायला प्रवृत्त करतात. मला आता माझं मिळालेलं आयुष्य नव्याने जगावं वाटतं. प्रत्येक क्षण celebrate करत. प्रत्येक क्षणांमधे आयुष्यभराचं सुख आणि समाधान शोधत जगायचं असतं.

कोरोनाने मला ह्या एकवीस दिवसात... खरखुरं जगायला शिकवलेलं असतं.


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.