Loading ...
/* Dont copy */

थांगपत्ता - मराठी पुस्तक

थांगपत्ता, मराठी पुस्तक - [Thangpatta, Marathi Book] ओळख आणि व्यक्तित्वाचा शोध घेणारी मराठी कादंबरी.

थांगपत्ता - मराठी पुस्तक | Thangpatta - Marathi Book

ओळख आणि व्यक्तित्वाचा शोध घेणारी मराठी कादंबरी


समसमान महत्त्वाची वेगवेगळी पात्रे, गुंतागुंतीचे कथानक, आटोपशीर मांडणी अशा वैशिष्ट्यांसह तुलनेने अल्पपरिचित अशा विचलित मनोविभ्रम (Dissociative fugue) या मनोरोगाने त्रस्त असणाऱ्या नायिकेची कथा थांगपत्ता या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते.

‘अस्तित्वाला जखडून असलेली ओळख शोधण्याची धडपड’ अशा एका वाक्यात लेखिका रोहिणी तुकदेव कादंबरीच्या पहिल्याच पृष्ठावर आशयाकडे दिशा निर्देश करतात. पुढे थेट कादंबरीला सुरूवात होते.

रोहिणी तुकदेव यांचा साहित्याचा अभ्यास आपण त्यांच्या प्रकाशित पुस्तकाच्या नावांच्या यादीवरून बांधू शकतो. मराठी कादंबरीच्या प्रारंभिक वळणावर त्यांनी संशोधन केले आहे. तर, कादंबरीच्या विषयाला सुसंगत अशा स्वरूपाच्या संस्थात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग आहे हे विशेषत्वाने उल्लेखित करावेसे वाटते. त्यांची ही पक्की वैचारिक बैठक कादंबरीच्या मांडणीत जागोजागी जाणवते.

पाठ न सोडणाऱ्या स्वप्न दृश्यावर कादंबरी सुरू होते आणि स्वप्नवत वाटावे अशा रीतीने नायिकेच्या निघून जाण्यावर कादंबरी संपते.

कधी तृतीयपुरुषी निवेदन कधी प्रथमपुरुषी स्वगतमाला कधी प्रत्यक्ष संवाद, नाट्यपूर्ण घटना यातून कथानक पुढे सरकत राहाते. कादंबरीची पहिली सातआठ पाने वाचून होतात तोवर कथा चांगलीच पकड घेते.

कथा नायिकेच्या, अमृताच्या अचानक घरातून निघून जाण्यानंतर तिच्यावर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगापासून ते पुढे ती सामोरी गेली त्या वैविध्यपूर्ण प्रसंगांमधून ‘विचलित मनोविभ्रमाचे’ या आजाराचे पैलू उलगडत जातात. पण ही कादंबरी निव्वळ त्या आजाराभोवती फिरत राहात नाही. तर, मनोव्यापारांचा उलगडा करताकरता नातेसंबंधांवर भाष्य करते. समाजातल्या एका उपेक्षित घटकाची तोंडओळख करून देतो. सामाजिक सुधारणेच्या उद्दिष्टयाने प्रेरित झालेल्या एका संस्थेच्या कारभाराचा परिचय करून देते. तंत्रज्ञानाच्या जोरावर हळूहळू सतत आपल्यावर कोणीतरी कसे लक्ष ठेवून आहे याचीही जाणीव करून देते. कांचनताई, डॉक्टर, वीणा, कलावती, मैथिली नेहा या आणि इतर पात्राचीही त्यांचीत्यांची गोष्ट आहे जी मधूनमधून उलगडते.

धूसर भूतकाळाचे ओझे वागवत नायिका जगण्याचा मार्ग निवडताना आपली ओळख पुसून नव्याने जगण्याचा निर्धार करते; त्या नव्या ओळखी भोवती बांधलेली गोष्ट, इतर पात्रांची स्वतंत्र उपकथानके या सगळ्याचा तोल सांभाळण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. काही ठिकाणी मात्र, ‘हे इतक्या झटपट घडू शकेल का?’ अशी शंका वाचकांच्या मनात निर्माण व्हायला वाव आहे पण त्यामुळे मूळ आशयाचा तोल बिघडत नाही. काही ठिकाणी वर्णने टाळून संबंधित घटना, प्रसंग अधिक विस्तारले असते तर अधिक परिणाम साधला असता असेही वाटते.

एका मानसिक आजारामुळे एका स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा उलथापालथ होते तेव्हा त्याचे स्वतंत्र शारीरिक, भावनिक परिणाम घडत असतात जे त्या स्त्रीला उध्वस्त करू शकतात. या मागे तिचे स्त्री असणे जितके कारणीभूत असते त्यापेक्षा अधिक आपली सामाजिक मानसिकता कारणीभूत असते. याची टोचणी कादंबरीत ठळकपणे जाणवते जी पुरेशी अस्वस्थ करणारी आहे.

अमृताची गुंजा होणे, गुंजाची माया होणे, एका अवघड वळणावर गुंजाचा गोंडस भूतकाळ पोक्त होऊन अनेक प्रश्न घेऊन समोर उभा ठाकणे. निरुपाय आजारावर मात करायचा प्रयत्न करतानाच कोलमडून पाडणारे प्रसंग अमृताच्या आयुष्यात निर्माण होणे, भूतकाळ न आठवणे, अशा व्यामिश्र परिस्थितीतही जगण्याचा संघर्ष सुरू ठेवणाऱ्या या नायिकेची ही कथा ‘थांगपत्ता’ वाचता वाचता मनाला बेचैन करते आणि ‘पुढे काय झाले असेल?’ हा प्रश्न मनात रेंगाळता ठेऊन खटकन संपते.

सामान्यतः छापील पृष्ठ वाचून संपल्यावर ती कथा मनात किती रेंगाळते, त्यातून पुढे मनात काही प्रश्न निर्माण होतात का? ही कादंबरीची बलस्थाने मानली जातात. हा गुण या कथेत नक्कीच आहे. निष्कर्षापर्यंत न नेता एका मानसशास्त्रीय समस्येची भावनिक, सामाजिक आणि विशेषतः स्त्री जीवनाच्या दृष्टिकोनातून मांडणी करणारी रोहिणी तुकदेव यांची थांगपत्ता ही कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.

- अक्षय प्रभाकर वाटवे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची