तृष्णा भाग ३,मराठी कथा - [Trushna Part 3,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!
शह - काटशह
२००३ - पुणे
वैदेही आणि विश्वजीत दोघेही आता इर्शेला पेटले होते. कोणालाच माघार घ्यायची नव्हती, कोणालाच हरायचं नव्हतं. केवळ अनिरुद्ध शांत असल्याने तो सतत वैदेहीला पेशन्स ठेवायचा सल्ला देत होता. “वैदेही, थोडा पेशन्स ठेव. त्यांच्या मुर्खपणाकडे दुर्लक्ष कर, अगं एक दोन दिवस त्रास देतील, मग शांत होतील. ती मुलं लहान आहेत, पण आपण तर मॅच्युअर्ड आहोत ना?!”
“...आणि हे बघ! आपण दोघेही नोकरी करता बाहेर जातो. घरात अबोली आणि आई त्या दोघांना उद्या काही त्रास व्हायला नको.!”
वैदेहीला अनिरुद्धचं बोलणं पटत होतंही आणि नव्हतं देखील.
आपल्या वरचा अन्याय सहन करु नका या बाबांच्या संस्कारात ती मोठी झाली होती. शहाण्याने गप्प बसणं म्हणजे नालायकांना मोकळं मैदान देणं असं तिला वाटे. गाडी पेंटींगच्या घटनेनंतर पोरांनी वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायला सुरवात झाली होती. तिच्या घरासमोर गाडी लावणं जरी बंद झालं तरी इतर त्रास वाढले होते. कंपाऊंड मधे कचरा ओतणं, बियरच्या रीकाम्या बाटल्या रात्रीच्या वेळेस कंपाऊंड मधुन आत भिरकावणं, कंपाऊंड वॉलवर ग्राफिटी काढणं, वैदेही बाहेर पडली की तिच्या मागे गाडीने पाठलाग करणं, तिच्या स्कुटरला, जोरात येउन हुल मारणं...
वैदेही चार वेळा पोलीस स्टेशनला तक्रार करुन आली तरी फरक पडत नव्हता. पोलिस एक दोन वेळा गस्त घालून जात होते पण त्या वेळेस कोणीही पोरं हातास लागत नव्हती.
एवढं सगळं करुन वैदेही न हटता, न घाबरता ऑफीसला जाते आहे हे दिसल्यावर वेगळा त्रास सुरू झाला. घरातल्या फोनवर निनावी फोन यायला लागले. बिचाऱ्या आजींनी कींवा अबोलीने फोन घेतला की फोन कट व्हायचा. बरं फोन हुकवरुन काढून ठेवावा म्हंटलं तर महत्वाचे फोन सुध्दा कळणार नाहीत.
दिवसभरात चाळीस एक वेळा फोन यायचे... आजी बिचारी कंटाळून गेली होती. वैदेहीचा संयम सुटत चालला होता.
पोलिसांनी सुध्दा आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली होती.
कॉलेजच्या नविन प्रकल्पाच्या कोऑरडीनेशन मॅनेजमेंट कमिटीमधे वैदेही होती. त्यांच्या नवीन कॉलेजचा शुभारंभ, ग्लोबल students meet वैगरे कार्यक्रम, मंत्र्यांच्या आणि उच्चपदस्थ डेलिगेट्सच्या उपस्थितीत पार पडणार होते. त्या तयारीत वैदेही गुंतलेली होती त्यामुळे तीला धड काही करायला वेळही मिळत नव्हता. इकडे, विश्वजीतची लास्ट इयरची परीक्षा दोन महीन्यांचा अंतरावर होती. वर्षभर काहीही अभ्यास न केल्यामुळे पहिल्या पासून अभ्यासाला सुरवात करायला लागणार होती. असाईनमेन्टचे मार्क त्याने कसेबसे मॅनेज केले असते पण फायनल परीक्षांचे मार्क मात्र बाहेरचे परीक्षक देणार असल्याने निदान पास होण्यासाठी तरी अभ्यास करणं आवश्यक होतं. पास नापासचं त्याला काही वाटत नव्हतं पण नापास झालो तर दादासाहेबांना तोंड दाखवता येणार नाही हे त्याला पक्क ठाउक होतं.
पूर्ण दुनियेत दोनच लोकांना तो मानत होता. त्यांच्या मनाविरुद्ध तो कधी जाऊ शकला नव्हता. एक दादासाहेब आणि दुसरी त्याची आई. आईवर, तीच्या आठवणींवर त्याच निस्सीम प्रेम होतं. कींबहुना, स्त्री असावी तर आपल्या आईसारखीच... प्रेमळ, सुंदर, सुस्वभावी, शांत सुशील... ही कल्पना आणि तिची मूर्ती त्याच्या डोक्यात, मनात घट्ट बसली होती. विश्वजीत आठ वर्षांचा असतानाच ती गेली तरी तीच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण विश्वजीतच्या मनात कायमचा कोरला गेला होता.
आईच्या मृत्युनंतर दुःखी झालेले, विरक्त झालेले, एकटे पडलेले आणि तरीही आपले काम अव्याहत पणे करणारे दादासाहेब त्याला दिसत होते. दादासाहेबांनी विश्वजीतवर कधीही हात उगारला नव्हता, ते कधीच ओरडले नव्हते. राग अनावर झाला तरी ते त्याला जवळ बोलवून समजावून सांगत. तरी त्यांचा दरारा वाटे. विश्वजीत ग्रॅज्युएट व्हावा अशी दादासाहेबांची मनापासून इच्छा होती आणि आपल्या वडीलांच्या इच्छेचा मान न ठेवण्याइतका तरी तो नालायक नव्हता.
आज सुध्दा कॉलेज आटपून त्याने कोल्हापूरला जायला गाडी काढली. महिन्यातून एक शनिवार - रविवार तरी तो कोल्हापूरला घरी जात असे. दादासाहेबांनीच त्याला तसे सुचवले होते. म्हातारी आजी आता अंथरुणावर होती. तीला विश्वजीत घरी आला की आनंद होई. त्याच्या आवडीचे पदार्थ करायचे नोकरांना फर्मान निघे. विश्वजीतने गाडी दारात लावली, गड्याकडे चावी दिली. त्याला डीकीतली बॅग काढायला सांगून गाणं गुणगुणत तो वाड्यात शिरला. दादांचे सचिव जाधव त्याला मधेच भेटले. दादा घरातल्याच लायब्ररी - ऑफीसमधे आहेत समजल्यावर त्याने तिकडे मोर्चा वळवला... खोलीतून दादासाहेबांच्या बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. दारावर एकवार टकटक करुन त्याने हळूच दार उघडलं आणि समोरचं दृष्य बघुन त्याची पावलं आणि नजर तिकडेच गोठली, डोक्यात एकदम १२ टोले वाजावेत असं झालं, पल्स रेट वाढला, कारण... दादासाहेब कोचावर आरामात बसले होते, टीपॉयवर चहा बिस्किटे होती. त्याच्या टोयोटा फॉर्च्युनरची चावी टीपॉयवर दिसत होती आणि त्यांच्या समोरच्या कोचावर त्याची कट्टर दुश्मन आणि प्रतिस्पर्धी... वैदेही, दादासाहेबांशी गप्पा मारत होती!!
क्रमशः
अभिप्राय